Wednesday, 9 January 2019

देशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.


#Once_Again_Ambedkar
देशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करा.
                                         ---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.                       

देशाचा व व्यवस्थेचा कुठलाही धर्म राहणार नाही हे भारतीय संविधानाने घोषीत केले असले तरी माणसाला धर्म असतो हे त्याच संविधानाने मान्य केले आहे. त्यामुळे "व्यवस्था ही ज्या माणसांच्या हातात येते तेव्हा त्या माणसाचा धर्म त्या व्यवस्थेला येतो." हे निर्विवाद सत्य कुणी नाकारू शकते का ? आज प्रत्येक माणुस धर्मातच जन्मतो. त्यामुळे त्याच्यावर त्याच धर्माचे संस्कार बालपणापासून पडत असतात. मग आयुष्यभर तो त्याच संस्कारांना उराशी बाळगून जगत असतो. त्याच्या संवेदना, बांधीलकी, आपुलकी, न्याय हेसुद्धा त्याच धर्माच्या चौकटीत बंधीस्त असते. (तुरळक अपवाद वगळता.) जातिव्यवस्थेसारखे लांछन ज्या समाजव्यवस्थेत फोफावलेले आहे त्या समाजव्यवस्थेत धर्म हे विषच ठरते. कितीही कायद्याच्या, समानतेच्या व समान न्यायाच्या बाजू उचलून धरल्या तरीही माणुस धर्मसंस्कारानेच संचालित होतो. मग न्यायालयातला न्यायाधीश असो की देशाचा पंतप्रधान किंवा पोलिस असो की अधिकारी, बाबू असो की चपरासी त्याच्या न्यायदानाचे व कार्याचे पहीले मेरीट (प्राधान्य) जात व धर्म हेच असते. कारण त्यांच्या संवेदना जातीत व धर्मात बंधिस्त आहेत. हे जर रोजच्या आकलनातले वास्तव सत्य असेल तर समान न्यायाच्या वल्गना करून आम्ही आपलीच फसगत करीत आहोत. असे वाटत नाही का ?
जाती-धर्म टिकवून आम्ही प्रशासनिक भरती करीत असू तर न्यायाची अपेक्षा माणसांकडून करायची की त्याच्या जाती-धर्माकडून करायची ? हा यक्षप्रश्न माझ्यापुढे पडतो. तो प्रश्न तुमच्यापुढेही असेल असे गृहीत धरण्यास हरकत नाही. कारण न्याय हा देणा-यांच्या जातीय-धार्मिक संवेदनांवरूनच ठरेलेला असेल. एवढे निश्चितच. व्यवस्था बदलाच्या व परिवर्तनाच्या लढाया आम्ही कुठल्या आधारावर लढतोय ? समान न्यायाची अपेक्षा कुठल्या आधारावर करतोय ? माणसांवर विश्वास ठेऊन की त्याच्या जातीय-धार्मिक संवेदनांवर विश्वास ठेऊन ? हे अन्यायाचे उघड पण छुपे प्रतिमान नाही का ?
रोहीत वेमुलाची आत्महत्या नव्हती तर तो एक राजकीय खुनाचा बळी ठरला. तर भीमा कोरेगाव येथे झालेला हल्ला हा देखील पूर्वनियोजित राजकीय षड्यंत्राचाच भाग होता. हे आता निर्विवाद सत्य आहे. तो एका सरकारी/राजकीय खूनाचा व हल्ल्याचा प्रकार होता. काहींना राजकीय भांडवल मिळाले तर काहींना सत्तेचा पुरस्कार रोहीतमुळे मिळाला व पुढे मिळणार. पण या सर्वात दलित समाजाला काय मिळाले ? तर शून्य...आणि फक्त शून्य...असे खून अनेक झालेत व पुढेही होत राहतील. त्यांच्या राजकीय सत्तेचा तो मार्ग आहे. पण दलित समाज मात्र राजकीय अक्कलशून्यतेने ग्रासला असल्याने तो कायम पिडीत राहील. खून करणारे सत्तेत बसतील तर ज्यांचा खून होईल ते कायम जमिनीतच गाडले जातील. राजकीय खून करणारे आज सत्तेत आहेत तर ज्या दलित समाजातल्या माणसांचा खून झाला ते कायम आंदोलनात उतरून निवडणूकांत विकले गेले. कुणी विकले या समाजाला ? कुणी राजकीय सौदा केला खूनाचा ? कोण जबाबदार या राजकीय खूनाला ? अन्यायाचे भांडवल करून कुणी कुणी आपले सामाजिक भांडवल करून घेतले ? व त्या आंदोलनातल्या गर्दीचा सौदा करून निवडणूकीतल्या खाऊचा पैसा कुणी गोळा केला ? कोण कोण आहेत ते समाजकारणी ? कोणकोणत्या आहेत त्या सामाजिक संघटना ? स्वत:ला दलित व दलितांच्या कैवारी म्हणून घेणाऱ्या त्या संघटना कोणत्या ? कोण त्याचे म्होरके ? का केला जातो दलितांवर होणाऱ्या अन्यायाचा सौदा ? कोण जबाबदार दलितांवर होणाऱ्या अन्यायाला व त्यांच्या खूनाला ? उत्तर शोधावेच लागेल.
रमाई हत्याकांड झाले, खैरलांजी झाली, बुद्धगया बॉम्बस्फोट झाले, जवखेडा झाला, शिर्डी झाली, हैद्राबादचा रोहीतचा खून झाला आणि १ जानेवारी २०१७ ला भीमा कोरेगाव येथे जमलेल्या लाखो वंचित समूहावर हल्ला झाला. अजून भविष्यात ही यादी वाढत जाणार. व दलित समाज मुक मोर्चे, शांती मार्च, सर्वपक्षीय / सर्वसंघटनांचे मोर्चे निघत राहणार. या मोर्चांमध्ये राजकीय नेतृत्वावर आगपाखड होणार, निषेध होणार व या मोर्चाचे नेतृत्व करणारे ढोंगी समाजकारणी या मोर्चातल्या गर्दीचा सौदा निवडणुकीत करणार व पून्हा राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला बदनाम करून पून्हा एक हल्ला होण्याची वाट बघत राहणार. पून्हा सर्वपक्षीय / सर्वसंघटनांचे मोर्चे काढणार, मोर्चाच्या नावावर पैसे गोळा करणार, त्या मोर्चाचे नेतृत्व करू पाहणार व पून्हा नेत्यांना बदनाम करून मोकळा होणार. हे चक्र असेल सुरू राहणार जोपर्यंत दलितांमध्ये राजकीय अक्कलशून्यता आहे. अन्याय - अत्याचाराचे भांडवल करून मोर्चेकरी झालेले समाजकारणी समाजाचा सौदा करतात. आजपर्यंत सामाजिक आंदोलनाचे नेतृत्व केले ते ढीसाळ समाजकारणी ढोंग्यांनी. निकाल काय तर २०१४ च्या निवडणुकांमध्ये हे लाखभर लोकांच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे त्या लाख लोकांच्या मताचा सौदा करून मोकळे झाले व दलितांचे पक्ष व उमेदवार हजाराच्या पुढे गेले नाहीत. व पून्हा सत्तेवर यांनी कुणाला बसविले तर त्याच अन्यायकर्त्यांना.
दलितांवर झालेल्या अन्याय अत्याचाराचे भांडवल जितके रिपब्लिकन नेत्यांनी केले नाही त्यापेक्षा जास्त या बेगडी समाजकारण्यांनी व छोट्या छोट्या संघटनांचे दुकान काढून बसलेल्या समाजकारण्यांनी केले आहे. नेत्यांविरूद्ध द्वेष व आपल्याप्रती सहानुभूती  मिळवून यांनी समाजाच्या भावना विकल्या. सामान्य माणसाने केलेला विद्रोह विकला. दलितांना झालेल्या जखमाही यांनीच विकल्या. अशा समाजद्रोही समाजकारण्यांपासून दलित समाज सावध होणार की नाही ?
चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत असलेले आंबेडकरी विचार ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी धोक्याचे ठरले आहे. भाषणातून लोकांनी सांगितलेले बाबासाहेब समाजाने प्रमाण मानले असल्याने खरे बाबासाहेब मांडणा-यांना त्रास होणार आहे. तो त्रास घेण्याची तयारी जर काहींनी आपल्या खांद्यावर घेतली तर दुकानदा-या चालविण्यासाठी आणि आपापसात फाटाफूट पाडण्यासाठी थाटण्यात आलेले संघटनरुपी दुकाने बंद होतील. आणि एक नवीन प्रवाह या चळवळीसाठी तयार करता येईल. अभ्यासू, तरुण आणि तात्त्विक विचारांची बैठक असणारी माणसे एकत्र करून आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. काहीच्या भावनिक आंदोलनाला बळी पडलेला तरुण वर्गाला त्या भावनिक संमोहनातून बाहेर काढावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुणांची कल्पनाशक्ती आणि तार्किक बुद्धी वेठीस धरण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणांना योग्य काय आणि अयोग्य काय हे आंबेडकरी विचारांच्या आधारे तपासून पाहताच येत नाही. त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या तरुण वर्गाचा विश्वास संपादन करावे लागणार आहे. कधी प्रखर होऊन तर कधी सौम्य मार्गाने. कारण यांनी स्वतः कधी बाबासाहेबाच्या विचारांचे वाचन केलेले नाही. पण कॅडर च्या माध्यमातून ऐकलेल्या बाबासाहेबांना यांनी इतके प्रचलित केले की जणू यांच्या मुखातूनच बाबासाहेब बोलत आहेत. हा प्रतीक्रांतीचा पहिला मजलाच आम्हाला उडवावा लागणार आहे. बाकीचे मजले असेच धराशाही होतील.
दुसरा एक तरुणांचा वर्ग आहे जो आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त आहे. तो आर्थिक व्यवहाराच्या जगात घर आणि नौकरीमध्ये व्यस्त झालेला आहे. ज्याला वाटते की आता कुठे समाजात भेदाभेद आहे. जो स्वतःला सुरक्षित समझतो आहे. जो चळवळीतील आंदोलनाला निरर्थक संबोधतो आहे. जो चळवळीपासून दूर जातो आहे. जो रोजगाराच्या विवंचनेत, आर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत विचार व चळवळीसोबत जुळत नाही. अश्या तरुण वर्गाला सोबत घेण्यासाठी काही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्त्रोतांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहे. या चळवळीतील काहींच्या हातात सद्यस्थितीत ब-यापैकी साधन संसाधने एकवटली आहेत. या संसाधनांचा वापर उद्याच्या पिढीसाठी स्त्रोतांची निर्मिती करण्यासाठी करावा लागणार आहे. तेव्हाच या चळवळीत हा तरुण वर्ग स्वतःला सुरक्षित समजेल. समाजाची एकजूट त्यातून साध्य होईल. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही या चळवळीत काम करणा-या तरुण-सुशिक्षित-विचारवंत-आर्थिक संपन्नता मिळविलेल्या लोकांची आहे. त्यांची एकजूट झाली तर समाजाला एकत्र करायला वेळ लागणार नाही.
आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या आहेतविचार आत्मसात करीत असतांना त्याची सत्यासत्यता पळताळून  पाहणे; शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्त्रोतांचे बळकटीकरण करणे; आधुनिक संसाधनांचा वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण घेणे व देणे. सोबतच ही आधुनिक संसाधने आपल्या हातात घेता येतील असा प्रयत्न करणे; भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सरकारी योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचविणे. शासकीय अनुदानाचा वापर करून समाजाचे आर्थिक सबलीकरण करता यावे यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे; वाढत चाललेली राजकीय उदासीनता घालविण्यासाठी राजकीय प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम प्रयत्न करणे; धम्मातील वाढती प्रदूषणे आणि प्रतीक्रांतीची छुपी आक्रमणे याच्या जाळ्यात हा समाज मोठ्या प्रमाणात अडकला आहे. त्याला त्यातून बाहेर काढून त्यांच्यात प्रतीक्रांतीची पाऊले ओळखण्याची कुवत निर्माण करण्यासाठी आंबेडकरी विचारातील महत्वाची आचारसंहिता समाजापर्यंत पोहोचविणे. निदान इतक्या काही गोष्टी जरी आम्हाला प्राथमिक स्तरावर करता  आल्या तर निश्चितच सद्यकालीन परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही.
हल्ली चळवळीत नवतरूण उतरतांना पाहून आनंद होतो. जरी ते बोटावर मोजण्याइतके तरूण असतील पण त्यांच्यातील समाजाविषयी व चळवळीविषयी दिसणारी तळमळ वाख्खानण्यासारखी आहे. चळवळ गतिमान राहील याचा विश्वास आहे. परंतू सोबतच चिंतेची बाब ही की, या नवतरूण पिढीचे अतिउत्साही व अतिभावनिक आंदोलनाने समाजाला व चळवळीला दूरगामी परिणाम भोगावे लागू शकते. कारण या नवतरूणांना दिशा देणारा त्यांच्यातलाच थोडा उच्चशिक्षीत किंवा अतिउत्साही नवशिखा नेतृत्वधारी या  नवतरुणांना चुकीच्या मार्गाने आंदोलनास भाग पाडून सामाजिक विद्वेष पसरविण्यास कारणीभूत ठरू शकतो. विवेकाने व भविष्याचा वेध घेऊन केलेले आंदोलन समाजात चैतन्य निर्माण करू शकते तर अविवेकाने केलेले आंदोलन मोठ्या कष्टाने उभ्या केल्या गेलेल्या चळवळीला व समाजाला धोकादायक परिस्थितीत आणू शकते. निदान याची समज आपल्या नवतरूणांत येणे गरजेचे आहे.
विरोधकांच्या कुठल्या कृतीला विरोध करायचा व कुठे करू नये ? किती प्रतिक्रीयावादी व्हायचे की प्रतिक्रीयावादी न बनता आपला  उद्देश व हेतू साध्य करायचा ? याचा विचार करणे आज गरजेचे आहे. फक्त भावनिक विरोधाने समाजहीत सुरक्षित ठेवता येत नाही. तर तत्कालिन परिस्थीतीचा आढावा घेऊन परिस्थितीसापेक्ष व्युहरचना आकारण्यातून चळवळीला सुरक्षित करता येईल. म्हणून सर्व नवतरूण मित्रांना विनंती आहे की, कुठलाही सामाजिक आंदोलनाचा किंवा प्रतिक्रीयावादी आंदोलनाची व्यूहनिती रचतांना चळवळीतील अनुभवसंपन्न कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्यावा. कारण त्यांनी केलेल्या चुकासुद्धा तुम्हाला मार्गदर्शक व प्रोरणादायी ठरू शकतात. ज्यामुळे तुम्हाला तुमचे आंदोलन यशस्वी करण्यात मदत होईल. त्यामुळे भावनिकतेतून निर्णय न घेता सारासार विचारानेच आंदोलनाची आखणी करा ! तुमच्या तळमळीत, तुमच्या प्रामाणिक हेतूसोबत, तुमच्या चळवळीच्या गांभिर्यासोबत, शिवाय तुमच्या आंदोलनातही आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. फक्त घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका हीच विनंती.
१ जानेवारी भीमा कोरेगावच्या जातीय दंगलीला आज १ वर्ष पूर्ण होईल. या संपूर्ण १ वर्षात जातीय राजकारण ढवळून निघाले असणार. परीस्थितीय सामाजिक बदल दिसून येणार. अन्याय-अत्याचार झाल्याची जाणीव जिवंत असणार. झालेल्या जखमाही ताज्या असणार. संघटीत राहिले पाहिजे याची नितांत गरज भासत असणार. न्याय मिळविण्याकडे लक्ष असेल. अन्यायाला वाचा फुटेल याची आस असेल. परंतु अन्याय करणारे राज्यकर्ते आणि सत्ताधारी कायम असतील. त्यांना कायम ठेवून आम्ही परिवर्तनाची अपेक्षा करू शकत नाही. आम्हाला न्याय पाहिजे असेल तर देशाच्या व राज्याच्या राजकारणाचा सातबारा फेरफार करावा लागेल. देशाच्या व राज्याच्या राजकारणाच्या सातबाऱ्यावर भाजप किंवा कॉंग्रेस या आलटून पालटून नावे येणाऱ्या पक्षांना हद्दपार करून वंचितांच्या नावे या राजकारणाच्या सातबाऱ्याचे फेरफार करावे लागणार आहे. देशाच्या व राज्याच्या सातबाऱ्यावर वंचितांच्या नावाचे फेरफार करून जोपर्यंत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील ‘वंचित बहुजन आघाडी’ला सत्तेत बसवत नाही तोपर्यंत न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. तेव्हा येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये देशाच्या व राज्याच्या राजकारणाच्या सातबाऱ्याचे फेरफार करण्यास सज्ज व्हा.
                                                                                                                 adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.


#Once_Again_Ambedkar
तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

"वैयक्तिक कर्तबगारी हि आदरणीय असते, पण पुष्कळ वेळा ती अनुकरणीय नसते ; म्हणूनच वैयक्तिक कर्तबगारी सामुदायिक कर्तबगारी यांच्यात तुलना करता सामुदायिक कर्तबगारी शेकडो पटींनी श्रेयस्कर ठरते. वैयक्तिक कर्तबगारी आकाशाएवढी उंच असली तरी साधारण उंचीच्या सामुदायिक कर्तबगारीच्या पासंगालाही ती पुरणार नाही." (अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. फेब्रुवारी १९२९, खंड - २० - पान . ३५) बाबासाहेबांवर होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी हा लेख तेव्हाच्या बहिष्कृत भारतात संपादकांनी लिहिला होता. अतिशय बोध घ्यावा अशी काही वाक्य मी इथे दिलेली आहेत. कारण हल्ली इथे मात्र वैयक्तिक कर्तबगारीने रान माजविले आहे. प्रत्येकाला मी किती श्रेष्ठ आणि किती समाजाचा उद्धारक हे सिद्ध करायचे आहे. ज्यांनी साधा दगडही कधी फोडला नाही. त्यांनी समाजाचे आम्हीच उद्धारक म्हणून बुद्धिभेद केला आहे. आणि मेंढरांची जमात त्याला बळी पडून वैयक्तिक कर्तबगारीचा उदोउदो करीत सुटले आहे. १९७२ नंतर ज्यांनी समाजासाठी त्याग केला ते आज समाजापासून तुटले आहेत. आणि ज्यांनी समाजाला विकून (जाती जोडो आणि वैचारिक आंदोलनाच्या नावाखाली) स्वतःची पोळी भाजून घेतली. ते आता महापुरुषांच्या रांगेत बसू लागली आहेत. सायकल वरून फिरायची लायकी नसणारे, बुद्धीने दिवाळखोर असणारे, आणि साध्या मण्याची गाटी घालायची लायकी नव्हती ते हि-याचे दागिने घालणारे समाजालाच वाडीत टाकायला निघालेत. आणि जे समाजासाठी झटले, लढले, मेले, आणि आताही तडपत आहेत ते मेंढरांच्या कळपात कुठेच नाहीत ? हे सर्व आम्ही मेंढरांची जमात बनल्यामुळे झाले आहे. जर आम्ही वैयक्तिक आणि सामुदायिक कर्तबगारी ओळखली असती तर आज ही परिस्थिती पाहायला मिळाली नसतीत्यामूळे सामूदायिक कर्तबगारी लक्षात घेऊन वाटचाल करा.
मानवी जिवनातील व्यक्तीगत मर्यादा ओळखता आल्या की सामाजिक परिस्थितीवर मात करण्याची कला अवगत होते. प्रबोधन/सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यक्तीगत मर्यादांना बलस्थान समजून तेच सामाजिक परिवेशात उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे सामूहीक उर्जा असूनही या चळवळी सातत्याने अपयशी ठरत आहेत.  व्यवस्थात्मक जिवनात सामाजिक कार्य तळीस न्यायचे असेल तर व्यक्तीला प्राप्त झालेले सामाजिक, राजकिय, धार्मिक, सांस्कृतिक, साहीत्यिक याम स्विकारावे लागते. त्यांचा अंगीकार करून वाटचाल करावी लागते. कारण हे सामाजिक व्यक्तीत्वाचे मूलभूत अंग आहे. जसे शरिराचे सर्व भाग कार्यरत असले तर शरिर सुदृढ राहून व्यक्ती विकासात पोषक ठरतो. शरिराच एक भाग जरी निकामी किंवा अकार्यरत असला तर त्याला अपंगत्व बहाल होते. तसेच समाजिक व्यक्तीत्वाचे आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक यापैकी एकाचा जरी आपण तिटकारा करीत असू किंवा अस्विकार करीत असू तर सामाजिक व्यक्तीत्व अपंग, पंगू बनते. त्यामूळेच समाजही अपंगत्वाकडे वळायला लागते. अपंग समाज चळवळ चालवू शकत नाही.
व्यक्तीवादाच्या आम्ही घातलेल्या मर्यादा बाजूला सारून व्यवस्थात्मक जिवनाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास कूठल्याच गोष्टींचा तिटकारा येत नाही. सामाजिक कार्यसिद्धीला मदत होते. फक्त सामाजिक, फक्त राजकीय, फक्त धार्मिक म्हणणे ही व्यवस्थेपासून पळवाट आहे.  व्यक्तिगत मर्यादा निदर्शक होय. ते सामाजिक अपंगत्वाचे लक्षण होय. हा प्रबोधन/सुधारणावादी चळवळी समोरचा सर्वात महत्वाचा धोका लक्षात घेऊन आपण वाटचाल करूला. विजय नक्कीच मिळेल. जात संपविणे हे आमचे ध्येय असायला हवे होते. पण आपण जात संपविता जातीतच वर्गाची निर्मिती केली. तर दूसरीकडे वर्ग संपविणे ज्यांची जबाबदारी होती त्यांनी वर्ग संपविता वर्गातच जातीची निर्मिती केली. पूरोगामी विचार नेमका इथेच माघारला. एकसंघ समाज निर्मिती हे पहिले ध्येय असावे. तेव्हाच आम्ही सर्व पातळ्यांवर लढू शकतो. अन्यथा सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.
आंबेडकरी चळवळ लयाला जाण्यास परकीय शत्रूंपेक्षा जास्त अंतर्गत शत्रू कारणीभूत आहेत. हवसे गवसे नवस्यांपासून ते थेट जूणे जाणते भाषणबाज, बिनबुडाचे विचारवंत, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, थोर लेखक-कवी सामा़जिक कार्यकर्ता असण्याचे बोंबा ठोकणारे . सारेच. या लोकांना ना विचार ना आचार, कुणीही बोलवा, कुठेही बोलवा हमखास जाणार. कुठलाही विषय असो छातीठोक बेंबीच्या देठापासून आंबेडकर सांगणार. जसे काही यांच्याच कानात बाबासाहेब सर्व काही सांगून गेलेत. यांना ना राजकीय पक्षाची काळजी, यांना ना सामाजिक भान, यांना ना चळवळीचे गांभिर्य, कशाचीच ना चिंता ना पर्वा, फक्त काळजी स्वतःचे मोठेपण टिकविण्याची मिरविण्याची. हेच सर्व जेव्हा समाजात येतात तेव्हा आंबेडकरी राजकीय पक्षाला नेत्यावर टिका करणार. दुसऱ्या पक्षाच्या स्टेजवर जाऊन त्यांचा ऊदोउदो करणार. समाजातल्या लोकांना हे करा ते करा असे फुकटचे सल्ले देणार स्वतःहा मात्र लाचार होऊन प्रस्थापितांसमोर पायघड्या घालणार. आज या सर्वांची अवस्था नर्तकी नर्तकांसारखी झालेली आहे. पैसे देऊन कुठल्याही गीतावर नाचायला सांगा ते नाचणार. तशीच यांची अवस्था. कुठेही जाऊन ढुंगण हालवून येणार. विचारधारेचे द्वंद्व, मतभेद, अन्याय अत्याचार सामान्य माणसाला सांगण्यासाठी मात्र यांच्या वर्तणुकीत नर्तकीचेच गूण. कुठल्या स्टेज वर जायचे, त्यातून समाजाला काय संदेश द्यायचा, चळवळीवर काय परिणाम होईल, सामान्य माणसे काय बोध घेणार यांच्याकडून कशाचीच पर्वा नाही यांना. राजकीय तडजोडू नेत्यांनी केल्या तर अख्खी मिरची पूडचा कारखाना यांच्या नाका-तोंडात गेल्यासारखे समाजात बोंबलणार नेत्याविषयी समाजात द्वेष पसरविणार. पण हे कुठल्याही संघटनेच्या, विचारांच्या स्टेजवर गेले तर यांना कुणीच काही म्हणायचे नाही ऊलट त्यांचा सन्मान किती वाढला हे दाखवून समाजातून त्याची किंमत वसूल करणार. रेड लॉईट मधल्या देहविक्रय करणाऱ्या  स्त्रियांनाही स्वाभिमान आहे पण यांना नाही. अशा सामाजातल्या किड्यांना किती दिवस पोसायचे हे ठरविणे आता गरजेचे आहे. तुम्ही चढत असलेल्या विविध-विभिन्न स्टेजवरील तुम्ही बसलेल्या जागेच्या खाली फटाके फोडायला समाजाला वेळ लागणार नाही. ती वेळ येण्याआधी सावध होऊन कुठलाही एक मार्ग निवडा, एक निश्चित भूमिका घेऊन ती वठवा. "सारे भारतीय माझे बांधव म्हणा !" पण सारे भारतीय पक्ष, संघटना, विचारधारा माझ्या म्हणू नका ! हीच कळकळीची विनंती.
तूमच्यातल्या आमच्यातल्या घरभेद्यांची ओळख होणे आज गरजेचे आहे. बिजेपी आरएसएस किंवा तत्सम संघटनांशी जूळलेले लोक म्हणतात नेता नको.  नेते कशाला ? नेतृत्व कशाला पाहीजे ? नेत्यांविषयी संभ्रम बदनामीकारक सतत बोलणारे व लिहिणारे. सामाजिक कार्याच्या नावाखाली धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून राजकीय लोकांकडून रसद मागणे व स्व आंबेडकरी राजकारणाविषयी समाजात द्वेष पसरविणारे हे लोक आहेत. हीच माणसे साहीत्यिक धार्मिक प्रदूषण पसरविण्यात पटाईत असतात.
काँग्रेस तत्सम संघटनांशी जूळलेले लोक म्हणतात, आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून आणू शकत नाही. लोकशाही टिकून ठेवायची असेल तर संविधानविरोधी पक्ष सत्तेवर येऊ नये. हिंदूत्ववादी पक्ष सत्तेत आल्यास देशाला धोका आहे म्हणून तूमच्या मतांचे विभाजन करु नका. म्हणून कॉंग्रेस ला मत द्या असे म्हणतात. मार्क्सवादी तत्सम डाव्या विचाराशी जूळलेले लोक म्हणतात संविधानाने, कायद्याने काही होणार नाही म्हणून शस्त्र घेऊन लढणारे हे लोक कधी कधी जशास तसे ची भाषा बोलतात.  प्रसंगी संविधान काय कामाचे असेही म्हणतात. जातीची ओळख टिकवू पाहणारे. धर्माची ओळख टिकवून ठेवणारे. फक्त भांडवलशाहीविरूद्ध रस्ते रंगविणारे. सत्ताधारी भांडवलदार यांच्याविरोधात सदैव आंदोलन उभारणारे. परंतु संविधानिक लोकशाहीने राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी कुठलीही स्पष्ट भूमिका घेत नाही.
बिएसपी, बामसेफ तत्सम संघटनांशी जूळलेले लोक म्हणतात सत्ता आल्यावर आम्ही सर्व काही करू. सत्ता आवश्यक आहे. दलित पंतप्रधान, मूख्यमंत्री बनल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. कूठल्याही कार्यक्रमात माणसांपेक्षा सर्व समाजसूधारकांना फोटोरूपी स्थान देणारे. बाबासाहेबांना कमी करून तत्सम महापूरूष उभे करणारे. बाबासाहेबांना प्रश्नांकीत करणारे. जिवंत व्यक्तींचे पूतळे उभारणारे. सामाजिक अन्याय अत्याचार प्रसंगी सत्ता पाहीजेच असा नारा लावणारे. परंतु आंदोलनांवर विश्वास दाखविणारे. रिपब्लिकन विचारांशी जूळलेले लोक मात्र यापेक्षा वेगळे वागतांना दिसतात. socio-politics हे प्रमाण माननारे. सत्तेची वाट बघता सामाजिक कार्यावर विश्वास ठेवणारे. सर्व समदूःखी बहूजन वर्गाला सोबत घेऊन राजकीय प्रतिनिधीत्व देणारे. सामाजिक परिवर्तनावर विश्वास ठेवून सातत्याने त्यासंबंधी कार्यक्रमाची आखणी करणारे. वर्तमानाला अभिप्रेत सामाजिक बदल सत्ताधा-यांपूढे ठेवणारे. वैचारीक नेतृत्वावर विश्वास ठेवणारे. समाजाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे यावर विश्वास असणारे. वैचारिक आंदोलनातून समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळवून देणारे. संविधानावर विश्वास ठेऊन सरकारच्या असंवैधानिक अकल्याणकारी नितीवर सातत्याने प्रहार करणारे. हे लोक आहेत परंतु इच्छाशक्ती व सामुहिक नियोजनाच्या अभावाने व एक विचार एक नेतृत्व असा वैचारिक अभाव असल्याने पाहिजे तसे राजकीय व सामाजिक यश हे प्राप्त करू शकलेले नाहीत.
हल्ली आंबेडकरी अनुयायी म्हणविणारे काही फक्त जन्माने (दलित) आंबेडकरी ठरलेल्या लोकांमध्ये आंबेडकरी आंदेलने किंवा कुठलाही समकक्ष निगडीत कार्यक्रम हेटाळणीचा टवाळगिरीचा किंवा टिकाटीपणीचा विषय बनला आहे. हे सर्व करतांना आपण बाबासाहेबांचा अपमान करतो याची जाणिव ठेवता हे विद्वान चारचौघात बाबासाहेबांच्या स्मारकाविषयी, किंवा तत्सम आंदोलनाची हेटाळणी करतांना पाहून वाईट वाटते. कुठली गोष्ट चारचौघात करायची कुठली करू नये. हे या सुडो आंबेडकरी लोकांना कळत नाही. आपल्यातले हे विदूषक खरंच या चळवळीचा सत्यानाश करीत आहेत. स्वतःला सुशिक्षितपणाचा शिक्का मारून घेतलेले हे लोक, जेव्हा चळवळीला टप-यांवर नेऊन ठेवतात; तेव्हा -या कार्यकर्त्यांच्या बलिदानाचा त्यागाचा पूढच्या पिढीत विसर पडतो. हा सर्व तमाशा पाहतांना इतर लोक या परिवर्तनवादी न्यायाच्या चळवळीपासून स्वतःला दूर ठेवतात. चळवळीची हानी यामुळेच झाली आहे. या तमाशगिरांना थांबवा.
समाज नेतृत्वाशिवाय चालू शकत नाही ज्यांना नेता नाही, तो समाजाची फसवणूक करतो स्वतःची सूद्धा. वर्तमान समाजाला खंबीर पायावर उभे राहायचे असेल तर राजकीय सामाजिक नेतृत्व करणारा नेता आवश्यक आहे. आजपर्यंतच्या इतिहासात ज्या समाजाकडे राजकीय सामाजिक नेतृत्व करणारा नेता होता त्याच समाजाचे वर्चस्व समाजव्यवस्थेवर होते....आजही हेच आहे... तूम्हाला आम्हाला समाजाला नेत्याची गरज आहे. नेता आहे अस्तीत्वात तो निवडण्याची स्विकारण्याची गरज आहे. ज्या दिवशी एक नेता एक पक्ष स्विकार करू त्या दिवशी समाज चळवळ पूढे जाईल. नेता स्विकारतांना थोडी मेहनत घ्यावी लागेल. आज अस्तीत्वात असलेले सर्व नेते १९८० च्या दशकात त्यानंतर आलेले आहेत.  या सर्वांमध्ये चळवळीला सर्वात जास्त योगदान कूणी दिले ? सामाजिक आंदोलने कूणी केली ? सामाजिक प्रश्नांवर कुणी लढा दिला ? सत्तेची लाचारी पत्करता स्वाभीमान कुणी जपला ? आज व्यवस्थेला, मिडीयाला प्रतिगामी शक्तींना कोणत्या नेत्याची भिती वाटते  ? हे सर्व करतांना कोणत्या नेत्याला सर्वात जास्त बदनाम केल्या जाते ? या प्रश्नांचा शोध घ्या. उत्तर सापडेल. उत्तर नाही सापडले तर मंडल कमिशन कुणाच्या प्रयत्नाने लागू झाले ? संविधान समिक्षेच्या विरोधात संसदेत कोण डरकाळी फोडत होता ? लवासा प्रश्न कूणी मांडला ? खाजगी विज कंपनी एन्रान ला कूणी हाकलले ? शेतकरी आत्महत्येवर सऱकारला कोर्टात कुणी खेचले ? न्याय कुणी मिळवून दिला ? आजही समाजाच्या प्रश्नावर सर्वात जास्त मोर्चांमध्ये कोणत्या नेत्याचा चेहरा दिसतो ? शोध घ्या. नेता निवडायला सोपे जाईल. उत्तर मिळेल. प्रश्न पडणार नाही.
स्वयंकेन्द्री माणसे आणि स्वयंकेन्द्री समाज कधीच परिवर्तन घडवू शकत नाही. २१ व्या शतकाची नाडी आता वेगाने बदलाकडे वळत चालली आहे. त्यामुळे पारंपारिकतेचा त्याग हाच एकमेव पर्याय आधुनिक पिढीसमोर आहे. तर दुसरीकडे नेतृत्वाच्या भुकेचे डोहाळे लागलेले दिल्लीकडे तोंड करून ढेकर देतांना दिसून येत आहेत. दिल्लीतली मेजवानी गल्लीतल्या नेत्यांची भूक भागवेल अशी अपेक्षा असेल तर ते केवळ स्वप्नरंजन ठरेल. अजूनही दिल्लीतल्या साहेबांना गल्लीपर्यंत पोहचविणारी साधने तुमच्याकडे नाहीत हे लक्षात घ्या. आणि जे आहेत ते पोट भरण्यासाठी सर्वच नेतृत्वाची भूक लागलेल्यांना मेजवानी द्यायला निघाले आहेत. परिवर्तनवादी युवक यातून काय बोध घेतो त्यावर निर्भर आहे. शेवटी एकच सांगतो तुमचा उद्धार तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करण्यातच आहे. दिल्लीतले परिवर्तन गल्लीत पाहायला मिळतील हे २१ व्या शतकाची शपथ घेऊन सांगतो.
ओल्या मातीत जेव्हा माझा बाप गाडला गेला.
हिरवळ होती चहूकडे, झाडाची पानेही हिरवीगार होती,
पण त्याच झाडाच्या फांदीला माझा बाप फाशीला लटकला होता.
                                                                                                                   ---संदीप
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275