शस्त्रधारी
मनुवादी
आरएसएस चा
देशद्रोही बुरखा
---डॉ. संदीप
नंदेश्वर, नागपूर.
भारत आज संविधानवादी विरुद्ध मनुवादी अशा संघर्षातून जात
आहे. ज्यांना संविधानाने ओळख दिली. हक्क दिले. अधिकार दिले. स्वातंत्र्य दिले. अशा
सर्व मानवांचा समुच्चय संविधानवाद्यांमध्ये आहे.
संविधानामुळे मिळालेल्या हक्क, अधिकार, स्वातंत्र्यामुळे ज्यांच्या जातीय,
धार्मिक व वर्गीय वर्चस्वाला धोका निर्माण झाला आहे ते मनुवादी इथल्या संविधानाला
संपवून परत एकदा अन्यायाची मनुवादी व्यवस्था देशावर लादू पाहत आहे. येणाऱ्या
काळाचा संघर्ष मनुवादी हे धर्म आणि मनू तत्वाला हाताशी घेऊन करणार आहेत तर सर्वसामान्य
भारतीय नागरिकांना या संघर्षाचा मुकाबला भारतीय संविधान व संविधानातील मानवी
मूल्यांना हाताशी घेऊन करावा लागणार आहे. आरएसएस व भाजपा च्या माध्यमातून उभा केला
जाणारा धार्मिक, जातीय संघर्ष भारतीयांच्या हिताचा नाही. २१ व्या शतकातील युवा
भारताला धार्मिक युद्धात लोटू पाहणाऱ्या आरएसएस ने युवा मनांमध्ये विष कालविणे
सुरु केले आहे. आरक्षणवादी समूह विरुद्ध अनारक्षणवादी समूह, लाभार्थी समूह विरुद्ध
अलाभार्थी समूह अशीही लढाई सुरु केली गेली आहे. या लढाईचे स्वरूप ओळखून पुढील
रणनीती आखावी लागणार आहे. आरएसएस च्या या इप्सित ध्येयाला ओळखण्यात फक्त प्रकाश आंबेडकर
यशस्वी ठरलेत. त्यामुळेच आज मा. प्रकाश आंबेडकर हे मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात
लढण्यासाठी तमाम संविधानवाद्यांना एकत्र येण्याची अपिल वारंवार करतांना दिसून येत
आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या आव्हानांमुळेच आज आरएसएस ची देशभक्ती
उघडी पडू लागली आहे. त्यामुळे आता सर्व भारतीयांना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात
घेऊन व आरएसएस ची बेगडी देशभक्ती उघडी पाडून पुढील मार्गक्रमणाचा अजेंडा देशासमोर
मांडणे गरजेचे आहे.
आज भारतातील आंबेडकरवादी,
मार्क्सवादी, समाजवादी, गांधीवादी
विचारसरणीचे लोक समाजव्यवस्थेतील समग्र
परिवर्तनाचा शंखनाद करीत आहेत. समाजातल्या शेवटच्या
घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही आहेत. अन्यायमुक्त
समाजाच्या उभारणीसाठी / निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे
धार्मिक उन्माद आणून काही लोक सामाजिक व्यवस्था
तोडू पाहत आहेत. विषमतावादी व्यवस्था टिकवू पाहत आहेत. मुलतत्ववादाची
मुक्ताफळे उधळून कायद्याचे राज्य मोडू पाहत आहेत. भारतीयसंविधानाने
दिलेले नैसर्गिक व कायद्याचे स्वातंत्र्य पायदळी तुडवून धार्मिक उन्माद
पेरीत आहेत.
आणि यांच्या साथीला आहेत सामाजीक मानसिकता विचलित करणारे धर्मांध. खोटे
तेच खरे हे पटवून देणारी सर्व साधने त्यांच्याकडेच आहेत. त्यामुळे हजारो माणसांच्या
कत्तली करणारे विकासपुरुष बनून पुढे येत आहेत. मानवी विकासाच्या मुलभूत तत्वांना
पायदळी तुडवून / जिवंत माणसांना पायदळी तुडवून रक्ताच्या धारातून फुललेले यांचे
बगीचे विकासाचे मॉडेल बनतात.
खरे
देशभक्त कोण आणि खरे देशद्रोही कोण ? हे ओळखण्यात भारतीय समाज,
भारतीय माणूस, भारत सरकार, प्रशासन व्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे. संविधानावर प्रेम करणारी, मानवतावादी विचारसरणीचा
पुरस्कार करणारी माणसे देशद्रोही ठरविली जात आहेत. तर दुसरीकडे एक धर्म, एक धर्मराष्ट्र,
मूलतत्ववाद इ. चा पुरस्कार करणारे देशप्रेमी घोषित करून देशाचे नेतृत्व करणारे
म्हणून समोर केले जात आहेत. यालाच देशातील सर्व जनतेचे सामाजिक नेतृत्व म्हणायचे
का ? हेच देशाचे नेतृत्व आहे का ? एकीकडे भारतीय संविधानातून ‘आम्ही सर्व भारतीय’ ही
भावना वृद्धिंगत होत असतांना दुसरीकडे आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही इस्लामवादी,
किंवा आम्ही अमुक धर्मवादी अश्या धार्मिक भावनांना मोठ्या त्वेषाने प्रदर्शित
केल्या जात आहे. भारतीयत्व आज या देशाला आणि देशातल्या नागरिकांना आहे कि नाही ?
असा प्रश्न निर्माण होत आहे. नेमका हा देश कोणता ? या देशातले नागरिक कोण ? अश्या
प्रश्नार्थक परिस्थितीत आम्ही वावरतो आहोत.
देशांतर्गत भाजपा / आरएसएस च्या हालचाली सत्तेच्या वाटत असल्या; राजकीय वाटत असल्या; तरी राजकारणाच्या पडद्यामागचा चेहरा
वेगळा आहे. तय्यारी वेगळी आहे. प्लान वेगळा
आहे. दिसायला या राजकीय वाटत असल्या तरी त्या राजकीय नसून येणा-या काळातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक,
आर्थिक आणि वर्चस्ववादी व्यवस्थेच्या निर्मितीसाठीची रंगीत तालीम आहे.
सुजाण भारतीय नागरिक जी व्यवस्था अपेक्षित करतो आहे, त्यापेक्षा वेगळ्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठीचा
हा आराखडा मांडला जात आहे.
त्या आराखड्याचा निर्माता-निर्देशक, डायरेक्टर ठरविला जात आहे. सुजाण भारतीय नागरिकांनी त्याकडे
दुर्लक्ष करावे म्हणून त्याला वेगळ्या
पद्धतीने प्रदर्शित केले जात आहे. हा प्रोमो आहे.
येणा-या काळात प्रदर्शित होणा-या व्यवस्थेचा. मुळात पिक्चर काही वेगळाच असणार आहे. अगदी तसाच जिथे
तुम्ही गुलाम व्हाल. वादळापूर्वीच्या शांततेचा
भंग न करता उद्याच्या येणा-या त्सुनामी थांबविण्यासाठी पर्यायी
धोरण आम्हाला ठरवावे लागेल.
संघाच्या सर्वच
बैठका ह्या खुल्या नसतात.
खुली प्रशिक्षण केंद्र हा फक्त दिखावा आहे. पडद्यामागच्या
बैठका ह्या वेगळ्या असतात. आणि ह्या बैठका कुठे चालतात के पर्यायाने
प्रज्ञासिंग ठाकूर हिने दाखवून दिल्या आहेत. आम्हाला सांगावे
लागू नये. संघाच्या खुल्या शिबिरात देशभक्ती दाखविणे आणि कर्मवीरपिठाच्या
मागून, मठांच्या मागून देवभक्ती दाखविणे. हे आता चांगलेच प्रकाशझोतात आलेले आहे. परंतु आम्हाला
या मुलतत्ववादाचा समूळ नायनाट करायचा आहे. तो मुलतत्ववाद कुठल्या
धर्माशी निगडीत आहे ? याच्याशी सुजाण भारतीय नागरिकाला काही देणे
घेणे नाही. दहशतवाद आणि त्याच्याशी जुळला गेलेला मुलतत्ववाद मुळापासून
उपटून फेकणे हेच एकमेव ध्येय. मतांसाठी लाचार होण्याची वेळ निघून
गेली. आता उत्तर पाहिजे. उच्चाटन पाहिजे.
समोर मांडलेल्या व मांडू पाहणा-या परिस्थितीचे
कल्याणकारीत्व स्पष्ट होऊन ते सिद्ध व्हायला पाहिजे.
पुरोगामित्वाचा
चेहरा घेऊन जगणारे संघ कार्यकर्ते संघाचा पुरोगामित्वाचा चेहरा मांडण्यात पटाईत असतात. वरकरणी कुणालाही संघाचा अभिमान वाटावा असाच तो चेहरा समोर मांडला जातो.
पण संघाच्या सर्वोच्च पदी, विश्व हिंदू परिषदेच्या
सर्वोच्च पदी आणि चार कर्मवीर पिठाच्या सर्वोच्च पदी याच संघाचा पुरोगामित्वाचा चेहरा
टराटरा फाटून मुलतत्ववादामध्ये परिवर्तित होतो. तिथे कुठेही पुरोगामित्वाला
थारा नाही. भारतीय संविधानाला थारा नाही. समतेच्या तत्वाला थारा नाही. धर्मनिरपेक्षता यांच्या
रक्तात नाही. मंदिरातून होणा-या अर्थकारणावर
उड्या मारणा-या संघाचा विद्रोही-विक्षिप्त
चेहरा केव्हापर्यंत झाकून राहील ? संघाच्या नावाखाली चालणारे
शस्त्रप्रदर्शन आणि रस्त्यावर लाठ्या/काठ्या घेऊन होणारे शक्तीप्रदर्शन
पर्यायाने शास्त्रप्रदर्शन हा देश धर्मनिरपेक्ष आहे हे विसरायला लावते. यालाच म्हणायचे का संघाची राष्ट्रभक्ती ? देशभक्ती
? परधर्मीयांचा द्वेष
करून हिंदूंच्या नावाने भारतीयांचे एकत्रीकरण करायचे आणि अखंड भारत निर्माण करायचा
या भूलथापा आता पुरे झाल्या. भारत संविधानामुळे अखंड राहिला आणि
पुढेही राहील. संघ असो अथवा नसो.
मुळात खंत याची
नाही की, संघ आपल्या
इप्सित ध्येयात यशस्वी होत आहे. खंत याची आहे कि अजूनही इथला सुजाण
भारतीय नागरिक संघाच्या भूलथापांना बळी पडून मुलतत्ववादाचा शिकार बनत चालला आहे.
संघनिती यशस्वी होत असतांना भारतीय नागरिक अजूनही त्याकडे डोळेझाक करतोय.
त्यामुळेच अलीकडल्या काळात संघ बिनधास्तपणे हिंदुत्वाचा जयकार करीत सुटले
आहे. हिंदू राष्ट्राचा वारंवार उल्लेख करून अन्य भारतीयांना
भारतीय नसण्याचा दाखला देत आहेत. उद्याच्या त्यांच्या कार्यक्रमाची
दिशा देत आहेत. आणि तरीही समाज त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत
नाही. यावरून हेच दिसून येते कि, हिंदू
मुलतत्ववाद आज भारतीय समाजावर नियंत्रण मिळवू पाहतो आहे. संविधानातल्या
धर्मनिरपेक्षतेला संपवू पाहतो आहे. व्यवस्था बदलू पाहतो आहे.
भारतीय समाजाचा पुरोगामी धर्मनिरपेक्ष चेहरा बदलून कुरूप हिंदुत्ववादी
मुलतत्ववादी चेहरा देऊ पाहतो आहे. भारतीय संविधानिक तत्वाच्या
अगदी विरुद्ध तत्वनिती संघ या समाजावर लादु पाहतो आहे.
विचारांच्या स्वातंत्र्यावर घाला घालून विचारवंतांना संपविले जात आहे.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या निर्भीड लेखणीला, प्रबोधनाला,
विचारांना बंदुकींच्या गोळ्यांनी संपविणारे शस्त्रधारी सनातनी आरएसएस मानवी
जीवनाचे मुलभूत नैसर्गिक जीवनमूल्यच संपवायला निघालेले आहेत. आम्ही जे सांगतो तेच
ऐका, आम्ही जे बोलतो तेच बोला, आम्ही जे दाखवितो तेच बघा. यापेक्षा वेगळे
ऐकण्याचा, बोलण्याचा, पाहण्याचा कुणी प्रयत्न केलाच तर सनातनी शस्त्राने संपविले
जातील अशी सामाजिक भीती निर्माण केली जात आहे. जसा १९४९ ला गांधींची हत्त्या करून
प्रयोग केला गेला होता. तसाच प्रयत्न आज परत केला जात आहे. आरएसएस ची ही तालिबानी,
हिंदू फ्यासिझमवादी, आतंकवादी, दहशतवादी कृती कुठल्या देशभक्तीमध्ये गणली जाते ?
असा प्रश्न विचारण्याची वेळ आज भारतातल्या तरुण भारतीयांवर आलेली आहे. कारण
वैचारिक विरोधाच्या नावाने आधीची पिढी बंदुकीच्या गोळ्यांनी सनातन आरएसएस द्वारे
संपविली जात असली तरी आरक्षणाच्या नावाने, मेरीट च्या नावाने, जातीय वर्चस्वाच्या
नावाने, शिष्यवृत्तीच्या नावाने आजच्या युवा पुढील सुद्धा राजकीय व प्रशासकीय
आरएसएस संपवीत चालली आहे. हे आजच्या संविधान मानणाऱ्या तरुण पिढीने लक्षात घ्यावे.
आज समाज स्थितप्रज्ञ
राहिला नसून तो स्वयंसिद्ध झाला आहे. स्थितप्रज्ञ अवस्थेत
समाज वर्चस्वाचा स्वीकार करतो. श्रेष्ठत्व मान्य करतो.
पण जेव्हा समाज स्वयंसिद्ध होतो तेव्हा तो त्याच वर्चस्वाला झुगारून
सामाजिक अभिसरणाला गतिमान करतो. हे
अभिसरण थांबविण्यासाठी, याच सामाजिक अभिसरणाला बंधिस्त करण्यासाठी आज RSS मुलतत्ववादाला
खतपाणी घालत आहे.
वारंवार "हिंदू लोकांनी आता हातात शस्त्र
घ्यावे." अश्या प्रकारच्या चिथावणीखोर वक्तव्य करून, किंवा संघाच्या दशहरा मेळाव्यात एके-४७ सारख्या
अत्याधुनिक शस्त्रांसह अनेक शस्त्रांचे पूजन करून आरएसएस कुठला सैनिकी
धर्म निभावत आहेत. हे मानवतावादी लोकांना चांगलेच कळून
चुकले आहे.
परंतु धर्माचे भावनिक भांडवल करून RSS आपले अस्तित्व
टिकवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. धर्माचे भावनिक भांडवल यांनी
इतक्या प्रखर रीतीने समाजात पेरले आहे की, यांचे हिंदू अव्यवहार्य तत्वज्ञान पटत नसतांना सुद्धा त्याविरुद्ध बोलण्याचे धारिष्ट्य
सर्वसामान्य माणूस दाखवितांना दिसून येत नाही. विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान
समाज अंगीकारत असतांना सामाजिक जीवनात त्याचा पुरस्कार करतांना तो दिसून येत नाही.
यामागे धार्मिक मुलतत्ववादाची अनाहृत भीती हेच कारण आहे.
कालपरवा
झालेल्या दशहरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत हिंदुराष्ट्राचा जयघोष करतात.
हिंदू राष्ट्राची मांडणी करतात. हिंदू मानसिकतेला चीतावणी देतात. व ‘देशाची
अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे असे म्हटले जात आहे.’ असे वक्तव्य करून भाजपा च्या
अर्थनीतीच्या विरोधात बोलणाऱ्या भारतीयांवर अर्थात भाजप विरोधकांवर कोपरखडी
काढतात. परंतु आरएसएस/भाजपा ने विकत घेतलेला मिडिया “सरसंघचालकांची सरकारच्या
अर्थनीतीवर टीका” अश्या मथड्याखाली बातम्या छापतात. करायचे एक आणि देशातील
नागरिकांसमोर दाखवायचे दुसरेच काही अशी नीति आज आरएसएस ने अंगिकारली आहे.
धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या दीक्षाभूमीवरील कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आंबेडकरवाद्यांना संबोधित करतांना म्हणतात, “भारतीय संविधान बदलने
म्हणजे देशद्रोहच होय.” हे वाक्य संघाच्या स्टेज वरून बोलायची संधी मा. देवेंद्र
फडणीस यांना नाही. परंतु संविधान बदलला देशद्रोह म्हणण्याची हिम्मत दाखविणाऱ्या
मुख्यमंत्र्यांनी हे सांगावे की, खुल्या प्रवर्गात निवडीचा अधिकार सर्व भारतीयांना
असतांना आरक्षित वर्गाला खुल्या प्रवर्गातून निवड करता येणार नाही असा अध्यादेश
काढणारे सरकार फडणवीसांचे नव्हे का ? नौकर भरती प्रक्रियेत सर्व भारतीय सर्वप्रथम
खुल्या प्रवर्गात मोडतात त्यानंतर आरक्षित वर्गात असे संविधानिक बंधन असतांना ते
संविधानिक तत्व झुगारून अन्यायकारक अध्यादेश काढणारे फडणवीस सरकारचा हा संविधान
बदल नव्हे का ? मग फडणवीस सरकार देशद्रोही आहे असे घोषित का करू नये ? शिष्यवृत्ती
हा सुद्धा संवैधानिक अधिकार असतांना शिष्यवृत्ती धारक विध्यार्थ्यांवर जाचक अटी
लादून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे व त्यातूनही उरलेल्या
शिष्यवृत्ती धारक विध्यार्थ्यांना ३-४ वर्षापासून शिष्यवृत्तीसाठी वाट पाहायला
लावणे हा संविधान बदल नाही का ? मग हे सर्व करणाऱ्या फडणवीस सरकारला देशद्रोही का
म्हणू नये ?
संघाची
देशभक्ती, संविधानप्रेम, देशद्रोहाची व्याख्या जगाच्या पटलावर कुठेही सापडणार नाही
अशी आहे. कदाचित ती मनुस्मृतीतून आलेली आहे. कथनी आणि करणीतला स्पष्ट फरक आरएसएस
आणि भाजपच्या व्यवहारात दिसून येतो. आरएसएस चे कालपर्यंतचे सर्व चड्डीधारी व आताचे
फुलड्रेस परिधान केलेले स्वयंसेवक हे संघ बौद्धिक वर्गातील पोपट आहेत. या पोपटांचा
स्टेज बदलला की भाषा व वक्तव्य बदलते. अश्या पोपटांना भारतीय समाज आणखी किती स्टेज
पुरवितो त्यावर भारताचे पुढील भवितव्य निर्भर राहील. संघाच्या व संघ स्वयंसेवक
भाजपा च्या मनुवादी वैचारिक बौद्धीकाविरुद्ध संविधानवाद्यांनी निर्भीड लढाईसाठी
तयार व्हावे. ज्या निडरतेने प्रकाश आंबेडकर संघ व भाजप विरोधात लढा देत आहेत त्या
निडर नेतृत्वाला साथ द्यावी. संघ/भाजप विरोधातील लढाई ही फक्त सत्तेची लढाई नसून
सामाजिक व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे. भविष्यातील सामाजिक वातावरणाला निकोप व
मानवीय बनविण्याची लढाई आहे. भारतीय समाजाचे कल्याणकारीत्व टिकवून ठेवण्याची लढाई
आहे. अन्यायकारी संघ/भाजप नीती संपवून अन्यायमुक्त समाज निर्माण करण्याची लढाई
आहे. संघमुक्त भारत, मनुस्मृतीमुक्त भारताची निर्मिती करण्याची ही लढाई आहे. या लढाईत
आजही “आंबेडकर” अग्रस्थानी आहेत हे या लढाईचे बलस्थान समजून “मनुवादी संघमुक्त”
भारताकडे वाटचाल करून भारताच्या सामाजिक भविष्याला सुरक्षित करूयात.
#Once_Again_Ambedkar
डॉ. संदीप नंदेश्वर,