Friday, 23 June 2017

आंबेडकरी चळवळ ही आमची सामुदायिक जबाबदारी

#Once_Again_Ambedkar
आंबेडकरी चळवळ ही आमची सामुदायिक जबाबदारी
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक सूत्र आहे. आणि सूत्राला खंडित करून आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर उत्तर नक्कीच चुकीचे येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर जसे सूत्र लावूनच मिळविता येते तसेच आज आंबेडकरी चळवळीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूत्र लावूनच उत्तर शोधता येईल. आजपर्यंत सूत्राला खंडित करून उत्तर काढण्याचा प्रयत्न केला गेला. तो प्रयोग आता आम्हाला थांबवावा लागणार आहे. त्यासाठी आंबेडकरी चळवळीला विचारप्रवृत्त व्हावे लागणार आहे.
"वैयक्तिक कर्तबगारी ही आदरणीय असते, पण पुष्कळ वेळा ती अनुकरणीय नसते; व म्हणूनच वैयक्तिक कर्तबगारी व सामुदायिक कर्तबगारी यांच्यात तुलना करता सामुदायिक कर्तबगारी शेकडो पटींनी श्रेयस्कर ठरते. वैयक्तिक कर्तबगारी आकाशाएवढी उंच असली तरी साधारण उंचीच्या सामुदायिक कर्तबगारीच्या पासंगालाही ती पुरणार नाही." (अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १ फेब्रुवारी १९२९, खंड - २० - पान न. ३५) बाबासाहेबांवर होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी हा लेख तेव्हाच्या बहिष्कृत भारतात संपादकांनी लिहिला होता.
अतिशय बोध घ्यावी अशी काही वाक्य मी इथे दिलेली आहेत. कारण हल्ली इथे मात्र वैयक्तिक कर्तबगारीने रान माजविले आहे. प्रत्येकाला मी किती श्रेष्ठ आणि किती समाजाचा उद्धारक हे सिद्ध करायचे आहे. ज्यांनी साधा दगडही कधी फोडला नाही. त्यांनी समाजाचे आम्हीच उद्धारक म्हणून बुद्धिभेद केला आहे. आणि मेंढरांची जमात त्याला बळी पडून वैयक्तिक कर्तबगारीचा उदोउदो करीत सुटले आहे. १९७२ नंतर ज्यांनी समाजासाठी त्याग केला ते आज समाजापासून तुटले आहेत. आणि ज्यांनी समाजाला विकून (जाती जोडो आणि वैचारिक आंदोलनाच्या नावाखाली) स्वतःची पोळी भाजून घेतली. ते आता महापुरुषांच्या रांगेत बसू लागली आहेत. सायकल वरून फिरायची लायकी नसणारे, बुद्धीने दिवाळखोर असणारे, समाजालाच वाडीत टाकायला निघालेत. आणि जे समाजासाठी झटले, लढले, मेले, आणि आताही तडपत आहेत. ते आजच्या या तरुण पिढीसमोर कुठेच नाहीत. हे सर्व आम्ही मेंढरांची जमात बनल्यामुळे झाले आहे. जर आम्ही वैयक्तिक आणि सामुदायिक कर्तबगारी ओळखली असती, तर आज ही परिस्थिती पाहायला मिळाली नसतीत्यामूळे येणाऱ्या काळात सामूदायिक कर्तबगारी लक्षात घेऊन वाटचाल करावी लागणार आहे.
मानवी जिवनातील व्यक्तीगत मर्यादा ओळखता आल्या की सामाजिक परिस्थितीवर मात करण्याची कला अवगत होते. प्रबोधन/सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यक्तीगत मर्यादांना बलस्थान समजून तेच सामाजिक परिवेशात उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे सामूहीक उर्जा असूनही या चळवळी सातत्याने अपयशी ठरत आहेत. हे अपयश आता आम्हाला सामुदायिक कर्तबगारीतून मोडून काढावे लागणार आहे. व्यक्तीवादाच्या आम्ही घातलेल्या मर्यादा बाजूला सारून व्यवस्थात्मक जिवनाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास कूठल्याच गोष्टींचा तिटकारा येत नाही. व सामाजिक कार्यसिद्धीला मदत होते. फक्त सामाजिक, फक्त राजकीय, फक्त धार्मिक म्हणणे ही व्यवस्थेपासून पळवाट आहेव्यक्तिगत मर्यादा निदर्शक होय. ते सामाजिक अपंगत्वाचे लक्षण होय. प्रबोधन/सुधारणावादी चळवळीसमोरचा हा सर्वात महत्वाचा धोका लक्षात घेऊन चळवळीला वाटचाल करावी लागेल. तरच चळवळीला विजयाच्या अपेक्षा करता येतील.
व्यवस्थात्मक जिवनात सामाजिक कार्य तळीस न्यायचे असेल तर व्यक्तीला प्राप्त झालेले सामाजिक, राजकिय, धार्मिक, सांस्कृतिक, साहीत्यिक याम स्विकारावे लागते. त्यांचा अंगीकार करून वाटचाल करावी लागते. कारण हे सामाजिक व्यक्तीत्वाचे मूलभूत अंग आहे. जसे शरिराचे सर्व भाग कार्यरत असले तर शरिर सुदृढ राहून व्यक्ती विकासात पोषक ठरतो. शरिराच एक भाग जरी निकामी किंवा अकार्यरत असला तर त्याला अपंगत्व बहाल होते. तसेच समाजिक व्यक्तीत्वाचे आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक यापैकी एकाचा जरी आपण तिटकारा करीत असू किंवा अस्विकार करीत असू तर सामाजिक व्यक्तीत्व अपंग, पंगू बनते. त्यामूळेच समाजही अपंगत्वाकडे वळायला लागते. व अपंग समाज चळवळ चालवू शकत नाही.
परंतु अलीकडे बिजेपी व आरएसएस किंवा तत्सम संघटनांशी जूळलेले व आंबेडकरी बुरखा पांघरलेली माणसे म्हणतात, नेता नको, नेते कशाला पाहिजे? नेतृत्व कशाला पाहीजे ? इ. प्रकारचा समाजात नेत्यांविषयी संभ्रम पसरवून त्यांच्याविषयी बदनामीकारक लिहीणारे, बोलणारे हल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. काही महाभाग सामाजिक कार्याच्या नावाखाली धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून राजकारणाविषयी समाजात द्वेष पसरवितात. साहीत्यिक व धार्मिक प्रदूषण पसरविणारेही अनेक आहेत. काही काँग्रेस व तत्सम संघटनांशी जूळलेले म्हणतात, आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून आणू शकत नाही. लोकशाही टिकून ठेवायची असेल तर संविधानविरोधी पक्ष सत्तेवर येऊ नये. हिंदूत्ववादी पक्ष सत्तेत आल्यास देशाला धोका आहे म्हणून तूमच्या मतांचे विभाजन करु नका. त्यामुळे कॉंग्रेसच्या सोबत समाजाने गेले पाहिजे असे सांगणारेही अनेक आहेत. निवडणुकांच्या काळात हे महाभाग गल्लोगल्ली पाहायला मिळतात. मार्क्सवादी व तत्सम डाव्या विचाराशी जूळलेले काही सुजाण परिवर्तनवादी तर चक्क संविधानाने, कायद्याने काही होणार नाही असे म्हणून जशास तसेची भाषा बोलतात. जातीची ओळख टिकवू ठेवून, धर्माची ओळख टिकवून ठेवून फक्त भांडवलशाहीविरूद्ध रस्ते रंगविणारे प्रसंगी संविधान काय कामाचे ? असे म्हणून आपली बौद्धिक दिवाळखोरीही दाखवून देतात.
बिएसपी, बामसेफ व तत्सम संघटनांशी जूळलेले सत्ता आल्यावर आम्ही सर्व काही करू. सत्ता आवश्यक आहे. दलित पंतप्रधान, मूख्यमंत्री बनल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. सामाजिक अन्याय अत्याचार प्रसंगी सत्ता पाहीजेचा नारा लावणारे, आंदोलनांवर विश्वास न दाखविणारे, बाबासाहेबांना कमी करून जातीय महापूरूष उभे करतांना आम्ही चक्क बाबासाहेबांना प्रश्नांकीत करतो हे यांच्या कधी ध्यानातच आले नाही. अशा सर्वच घरभेदी लोकांपासून व संघटनांपासून आंबेडकरी चळवळीला सुरक्षित करावे लागणार आहे.
जात संपविणे हे आमचे ध्येय असायला हवे होते. पण आपण जात न संपविता जातीतच वर्गाची निर्मिती केली. तर दूसरीकडे वर्ग संपविणे ज्यांची जबाबदारी होती त्यांनी वर्ग न संपविता वर्गातच जातीची निर्मिती केली. पूरोगामी विचार नेमका इथेच माघारला. एकसंघ समाज निर्मिती हे पहीले ध्येय असावे. तेव्हाच आम्ही सर्व पातळ्यांवर लढू शकतो अन्यथा सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.
चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत असलेले आंबेडकरी विचार ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी धोक्याचे ठरले आहे. भाषणातून लोकांनी सांगितलेले बाबासाहेब समाजाने प्रमाण मानले असल्याने, खरे बाबासाहेब मांडणा-यांना त्रास होणार आहे. तो त्रास घेण्याची तयारी जर काहींनी आपल्या खांद्यावर घेतली तर दुकानदा-या चालविण्यासाठी आणि आपापसात फाटाफूट पाडण्यासाठी थाटण्यात आलेले संघटनरुपी दुकाने बंद होतील. आणि एक नवीन प्रवाह या चळवळीसाठी तयार करता येईल. अभ्यासू, तरुण आणि तात्त्विक विचारांची बैठक असणारी माणसे एकत्र करून आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. काहीच्या भावनिक आंदोलनाला बळी पडलेल्या तरुण वर्गाला त्या भावनिक संमोहनातून बाहेर काढावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुणांची कल्पनाशक्ती आणि तार्किक बुद्धी वेठीस धरण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणांना योग्य काय आणि अयोग्य काय हे आंबेडकरी विचारांच्या आधारे तपासून पाहताच येत नाही. त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या तरुण वर्गाचा विश्वास संपादन करावे लागणार आहे. कधी प्रखर होऊन तर कधी सौम्य मार्गाने. कारण यांनी स्वतः कधी बाबासाहेबाच्या विचारांचे वाचन केलेले नाही. पण कॅडर च्या माध्यमातून ऐकलेल्या बाबासाहेबांना यांनी इतके प्रचलित केले की जणू यांच्या मुखातूनच बाबासाहेब बोलत आहेत. हा प्रतीक्रांतीचा पहिला मजलाच आम्हाला उडवावा लागणार आहे. बाकीचे मजले असेच धराशाही होतील.
दुसरा एक तरुणांचा वर्ग आहे जो आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त आहे. तो आर्थिक व्यवहाराच्या जगात घर आणि नौकरीमध्ये व्यस्त झालेला आहे. ज्याला वाटते की आता कुठे समाजात भेदाभेद आहे ? तो स्वतःला सुरक्षित समझतो आहे. तो चळवळीतील आंदोलनाला निरर्थक संबोधतो आहे. तो चळवळीपासून दूर जातो आहे. तो रोजगाराच्या विवंचनेत, आर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत विचार व चळवळीसोबत जुळत नाही. अश्या तरुण वर्गाला सोबत घेण्यासाठी काही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्त्रोतांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहे. या चळवळीतील काहींच्या हातात सद्यस्थितीत ब-यापैकी साधन संसाधने एकवटली आहेत. या संसाधनांचा वापर उद्याच्या पिढीसाठी स्त्रोतांची निर्मिती करण्यासाठी करावा लागणार आहे. तेव्हाच या चळवळीत हा तरुण वर्ग स्वतःला सुरक्षित समजेल. तेव्हाच समाजाची एकजूट त्यातून साध्य होईल. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही या चळवळीत काम करणा-या तरुण-सुशिक्षित-विचारवंत-आर्थिक संपन्नता मिळविलेल्या लोकांची आहे. त्यांची एकजूट झाली तर समाजाला एकत्र करायला वेळ लागणार नाही.
परंतु हे सर्व करीत असतांना, “तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.” असे म्हणण्याची वेळ आज चळवळीपुढे आलेली आहे. स्वयंकेन्द्री माणसे आणि स्वयंकेन्द्री समाज कधीच परिवर्तन घडवू शकत नाही. २१ व्या शतकाची नाडी आता वेगाने बदलाकडे वळत चालली आहे. त्यामुळे पारंपारिकतेचा त्याग हाच एकमेव पर्याय आधुनिक पिढीसमोर आहे. तर दुसरीकडे नेतृत्वाच्या भुकेचे डोहाळे लागलेले दिल्लीकडे तोंड करून ढेकर देतांना दिसून येत आहेत. दिल्लीतली मेजवानी गल्लीतल्या नेत्यांची भूक भागवेल अशी अपेक्षा असेल तर ते केवळ स्वप्नरंजन ठरेल. अजूनही दिल्लीतल्या साहेबांना गल्लीपर्यंत पोहचविणारी साधने तुमच्याकडे नाहीत हे लक्षात घ्यावे लागेल. परिवर्तनवादी युवकांनी आता लक्षात घेतले पाहीजे की, “तुमचा उद्धार तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करण्यातच आहे.” तेव्हाच दिल्लीतले परिवर्तन गल्लीत पाहायला मिळतील. आंबेडकरी चळवळीचा कबिला दिल्लीच्या तख्तावर पोहोचवायचा असेल तर आंबेडकरी चळवळ ही आमची सामुदायिक जबाबदारी समजून “एक आंबेडकर” हे करू शकतो यावर विश्वास ठेवून “परत एकदा आंबेडकर” हे एक आंदोलन म्हणून स्वीकारावे लागेल. तुमच्या आमच्यासाठीच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आम्हाला हे करावे लागणार आहे.

¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,
नागपूर.
8793397275, 9226734091, 9518388849


मला या देशाचा राष्ट्रपतीच नकोय !

*मला या देशाचा राष्ट्रपतीच नकोय !*
--- देश अंतर्गत यादवीकडे वळत चालला काय ?
*I love President but i hate Dalit president.*
__ #Adv_Dr_Sandeep_Nandeshwar

देशाचे सर्वोच्च प्रमुखपदाच्या (राष्ट्रपती पद) निवडणुकीत *#दलित विरूद्ध #दलित* असा संघर्ष उभा करून जातीय वातावरण परत एकदा तापविले जात आहे. एक मात्र नक्की की, होणारा राष्ट्रपती हा दलितच होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. हे वरकरणी भेदमुलक समाजासाठी आल्हाददायक वाटत असले तरी यातून दलितांमध्ये दुफळी निर्माण होण्याची चिन्हे मोठी आहेत. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे कर्तुत्व पुढे करण्याआधी त्याची जात पुढे केली गेली. हा डाव आरएसएस प्रणित भाजपने साधला. आता लढाई सुरू झाली. *#रामनाथ_कोविंद* की *#मिरा_कुमार ? *#पुरोगामी_दलित* कोण ? व *#प्रतिगामी_दलित* कोण ? असे युद्ध सुरू झाले. दलित वर्ग परत एकदा चाणक्य नितीत फसला. त्याच्या परिणामस्वरूप आता दलित अंतर्गत वर्गसंघर्षाचा बळी ठरू पहात आहे.

एकीकडे *#दलित_विरूद्ध_दलित* असे युद्ध होतांनाच, दुसरीकडे *#दलित_विरूद्ध_इतर* असेही युद्ध समाजात पेरले जात आहे. राष्ट्रपती या नावापुढे दलित लावून *#President_of_India* ऐवजी *#Dalit_President_of_India*; *#राष्ट्रपती* ऐवजी *#दलित_राष्ट्रपती* केल्याने गैरदलितांमध्ये दलितांविषयी आकस, द्वेष, घृणा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. *#दलित_राष्ट्रपती* यासाठी सत्ताधारी व विपक्ष दोन्हीही आग्रही असतांना बाकीच्या वर्गावर अन्याय केल्याची भावना बळावत जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे दलित वर्गाला परत प्राचिन अवस्थेकडे घेऊन जाण्याची ही रणनिती असल्याचे सुचक आहे.

परंतु दुःख याचे आहे की, १२५ करोड पेक्षा जास्त लोकसंख्या व ८० करोड पेक्षा जास्त मतदार असलेल्या भारत देशात हा *#राजकीय_रंडीबाजार* चालत असतांना आम्ही गप्प आहोत ही *#राजकीय_हतबलता* आहे. हे राजकीय हतबलतेचे लक्षण आहे. ही परिस्थिती कायम टिकून राहीली तर ही राजकीय हतबलता लोकशाहीला मातीत घालण्यासाठी पुरेसी ठरेल.

*#रामनाथ_कोविंद* असो वा *#मिरा_कुमार* असो दोघांचीही *जात वा वर्ग घेऊन उमेदवारी करण्यापेक्षा त्यांच्या कर्तुत्वाने व देशाच्या बळकटीकरणातील योगदानाने सर्वोच्च पद बहाल केले गेले असते तर देश आनंदाने नाचला असता.* लायकी नसतांना, योगदान नसतांना, *संवैधानिक गांभिर्य नसतांना फक्त दलित या निकषावर राष्ट्रपती पदासाठीची सर्वाेच्च पदाची उमेदवारी बहाल केली गेली असेल तर या देशाचा राष्ट्रपतीच नकोय.* असे म्हणण्याची वेळ येते, यापेक्षा मोठे या देशाचे दुर्भाग्य दुसरे कुठले असणार !

राष्ट्रपती पदाच्या या दलित केंद्रबिंदू भोवती फिरणाऱ्या या निवडणुकीत *#हिंदु_दलित* व *#हिंदुऐत्तर_दलित* ही विभागणी तर केली गेलीच, परंतु त्यासोबतच दोन्ही *#हिंदु_दलित* ऊभे करून त्यातल्या एकाला राष्ट्रपती बनवून हिंदुत्व भारताकडे वाटचाल करणारे पहिले पाऊलही टाकले गेले.

दलितांनो *#हिंदु_दलित_राष्ट्रपती* केल्याने हुरळून न जाता न्यायाच्या संघर्षाची ज्योत कायम तेवत ठेवा. संधी होती ती गेली. पण परत संधी गमावणार नाही याची काळजी घ्या.
I love president but i hate Dalit President.
I want President of India but not Dalit President of India. Or Hindu President of India, or Muslim President of India etc. etc.

Shame on this ugly presidential election !
__ *#अॅड_डॉ_संदीप_नंदेश्वर*, नागपूर
8793397275, 9226734091

Sunday, 4 June 2017

आंबेडकरसदृश्य आंबेडकरी चळवळ २१ व्या शतकाची गरज...

#Once_Again_Ambedkar - Article - 2
आंबेडकरसदृश्य आंबेडकरी चळवळ २१ व्या शतकाची गरज...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविलेल्या मानवतावादी चळवळीने शतक गाठले असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांच्या माध्यमातून चालविल्या गेलेल्या “आंबेडकरी चळवळीने” आता साठी (६० वर्ष) ओलांडली आहेत. या ६० वर्षाचा लेखाजोखा मांडून त्याचा आढावा घेण्याची गरज आहे. असे म्हटले जाते कि, “माणसाने साठी (६० वर्ष) ओलांडली की स्थिरता, स्थूलता, थकलेपणा येत असतो. पण याच काळात सामंजस्य आणि पोक्तपणाही माणसांच्या अंगी येतो व अनुभवामुळे तो अधिकच प्रगल्भ व वैचारिक परिपक्व व्हायला लागतो.” त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीने सुद्धा आता प्रगल्भता दाखविणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर वैचारिकरित्या परिपक्व होऊन चळवळीला मार्गक्रमित करणे गरजेचे आहे.
२१ व्या शतकातील पिढी बदलली आहे. २१ व्या शतकाचे सामाजिक संदर्भ बदलले आहेत. दृष्टीकोन बदलला आहे. या बदललेल्या पिढीच्या बदललेल्या सामाजिक संदर्भाचा दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेऊन आम्हाला आंबेडकरी चळवळीची मांडणी करणे गरजेचे आहे. ६० वर्षात चळवळीची झालेली वाटचाल, त्यातील कळीचे मुद्दे व सामाजिक परीवर्तनातील चळवळीचे योगदान, झालेल्या चुकांना बाजूला सारून नव्या पिढीपुढे येणे महत्वाचे आहे. काळ बदलतो तसा व्यावहारिक विचारही बदलतो. बदलत नाही तो मानवी मुल्यांची जडणघडण करणारा विचार. मानवी मुल्याधिष्टीततेचा विचार हा त्रिकालाबाधित असतो. तो सर्व पिढ्यांना बदललेल्या व्यावहारिक नियमावलीत मार्गदर्शन करीत असतो. जसे बुद्धाचे विचार हजारो पिढ्यांना बदललेल्या संदर्भातही मार्गदर्शन करतात. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देखील आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील याची खबरदारी आंबेडकरी चळवळीने घ्यायची आहे.
आज भारतीय समाजव्यवस्थेला मूलतत्ववादाकडे घेऊन जाणारी शक्ती राजकीय व्यवस्थेच्या अग्रस्थानी स्थानापन्न झाल्यामुळे आंबेडकरी चळवळीची जबाबदारी वाढलेली आहे. मुलतत्ववादी विचारधारा २१ व्या शतकातील पिढीला आपल्या कवेत घेण्यासाठी अनेक षडयंत्र रचतांना दिसत आहे. संवैधानिक अधिकाराचे जबाबदारीपूर्ण निर्वहन न करता जातीय व धार्मिक मानसिकतेतून बाहेर पडू पाहणाऱ्या २१ व्या शतकातील तरुण पिढीला आरक्षण व शिष्यवृत्ती सारख्या संवैधानिक अधिकाराच्या विरोधात उभी करण्याची खेळी खेळली जात आहे.  आरक्षण व शिष्यवृत्तीसारख्या संवैधानिक व शासनाच्या जबाबदारीला चुकीच्या पद्धतीने संविधानासमोरील व शासनासमोरील कमकुवत दूवा म्हणून प्रसारित केल्या जात आहे. याचे दूरगामी परिणाम आरक्षित वर्गावर (अ.जा., अ.ज., इ.मा.प्र., महिला व अल्पसंख्यांक) होण्याआधी आंबेडकरी चळवळीने या वर्गाला त्यांच्या संवैधानिक अधिकारासाठी आश्वस्थ करण्यासाठी मार्गक्रमित होणे गरजेचे आहे.
आंबेडकरी चळवळ सातत्याने वर्तमान प्रश्नांवर लढत आलेली आहे. आंबेडकरी चळवळीचा भूतकाळ या सामाजिक लढायांनी व्यापला आहे. परंतु तरीही आंबेडकरी चळवळ इप्सित ध्येयापर्यंत पोहचू न शकल्याचे शल्य अनेकांना अस्वस्थ करणारे आहे. कारण कुठल्याही चळवळीला यश हे सहज प्राप्त होत नाही. त्यामुळे सहज यशस्वीही होता येत नाही. यशस्वी होण्यासाठी त्याग करावा लागतो. श्रम करावे लागते. अनेक हालअपेष्ठा सहन कराव्या लागतात. अपमानीत व्हावे लागते. अपयश पचवून फिनिक्स भरारी घ्यावी लागते. कधीकधी स्वतःच्या यशापेक्षा इतरांच्या यशात आपले यश शोधावे लागते. यशाला शार्टकट नसतो. कधीकधी जवळ असलेले भांडवल गमवावे लागते. तरीही यशाची अपेक्षा सोडायची नसते. कुठल्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय यशस्वीततेमागे भूतकाळात केलेला त्याग, श्रम, हालअपेष्टा, अपमान सहन करण्याची क्षमता व सातत्य या गोष्टी महत्वाच्या असतात. आंबेडकरी चळवळ या सर्व प्रक्रियातून पुढे गेलेली आहे. यापुढील काळात देखील ती सातत्याने पुढे जात राहील यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
आज आंबेडकरी चळवळीत माणसे व्यक्तीगत रित्या यशस्वी झालीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे भांडवल वापरून प्रगती केली. परंतु चळवळीच्या यशाकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेले. आम्ही समाज म्हणून चळवळीच्या ध्येय्याप्रत पोहचण्यात अपयशी झालोत. कारण एकच "आंबेडकरी चळवळीच्या यशस्वीततेपेक्षा व्यक्तीगत यशस्वीतता महत्वाची मानली गेली." त्यामुळे चळवळीला यशस्वी करण्यासाठी करावा लागणारा त्याग, श्रम, हालअपेष्ठा, अपमान सहन करण्यात आपण सर्वच मागे राहीलोत. ‘चळवळीचा अपमान झाला तरी चालेल पण स्वतःचा (व्यक्तिगत) अपमान होऊ नये याची खबरदारी घेत आलोत.’ स्वतःच्या व्यक्तीगत यशाच्या पलिकडे जाऊन चळवळीला सामाजिक व राजकीयदृष्ट्या यशस्वी करण्यासाठी त्याग करण्याची, श्रम घेण्याची, हालअपेष्टा सहन करण्याची व प्रसंगी अपमान सहन करून घेण्याची क्षमता तयारच केली गेली नाही. त्यामुळे "जितकी माणसे उंच उंच वाढत गेली तितकी चळवळ ठेंगणी (बुटकी/दुबळी) होत गेली." आंबेडकरी विचारातून भारतीय समाजव्यवस्थेत व सांसदीय व्यवस्थेत आलेल्या संवैधानिक मुल्यांचा लाभ घेऊन व्यक्ती-माणस-कुटुंब प्रगतीपथावर आलीत. परंतु समूह म्हणून सांसदीय व्यवस्थेत आम्ही अपयशी ठरलोत हे निर्विवाद मान्य करावेच लागेल.
व्यक्तिगत स्वार्थापोटी आज आंबेडकरी चळवळ सध्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत आहे. चळवळीच्या जहाजाला छिद्रे केव्हाचीच पडली आहेत. भेगा पडलेल्या आहेत. चळवळीचे जहाज वादळात सापडलेय. पण त्या छिद्रांना बुजविण्याऐवजी नविन नविन कल्पना मांडून चळवळीचे जहाज बूडतेय याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. मात्र प्रत्येकजण चळवळीच्या जहाजाचे होकायंत्र स्वतःला बनवू पहात आहे. वादळात सापडलेल्या चळवळीच्या जहाजाला तडा जाण्याआधी संघटीत होऊन हेलकावे घेणाऱ्या जहाजाला सावरण्याचे, पडलेल्या भेगांना सुधारण्याचे, झालेल्या छिद्रांना बुजविण्याचे काम जहाजावर राहूनच करा. समुद्रात उड्या मारून किनाऱ्यावर पोहचून बुडणाऱ्या चळवळीच्या जहाजासाठी दुरूस्त्या सुचवू नका. तुम्ही त्या जहाजावरच रहा. चळवळीचे जहाज काहीही झाले तरी बूडू देणार नाही या आत्मविश्वासासह. पण असे होतांना दिसून येत नाही.
आंबेडकरी चळवळ आज व्यक्तीद्वेषात, व्यक्तीप्रतिष्ठेत सापडली आहे. त्याचे कारण आहे की, आम्ही या आंबेडकरी चळवळीचा योग्य तो सेनापतीच निवडला नाही.  "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" व “आंबेडकरी चळवळ” नावाचे भांडवल स्वतःसाठी न वापरता चळवळीच्या सामाजिक, राजकीय विकासासाठी वापरण्याची गरज असतांना, आम्ही स्वतःसाठीच त्याचे भांडवल करायला निघालेलो आहोत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, ‘स्वतःची झोपडी (संघटन, संघटना, पक्ष, संस्था) शाबूत ठेवा. इतरांच्या आक्रमणापासून तिला सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज रहा.’ आम्ही मात्र या संदेशाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून स्वताच्या झोपडीचे शकलं पाडलीत. कुणी या झोपडीवरचे गवत घेऊन घेले व स्वतःच्या शरीराला उर्जा मिळावी यासाठी जाळून टाकले. कुणी या झोपडीचे कवेलू घेऊन गेलेत व स्वतःच्या निवाऱ्यासाठी त्याचा वापर करू लागलेत. कुणी या झोपडीचे दरवाजे काढून नेलेत व स्वतःच्या सुरक्षिततेची तजवीज केली. तर कुणी या झोपडीच्या छतावर लागलेले लाकूड फाटेही चोरून नेऊन सुताराकडे (कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना) नेऊन त्यांचे लचके तोडलीत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या “स्वतःच्या झोपडीच्या” शिल्लक उरल्या त्या भणंग भिंती. ज्या २१ व्या शतकातल्या पिढीला नव्याने परत एकदा स्वाभिमानाने उभे होण्याची साद घालीत आहेत.
आज स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या काहींनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या झोपडीला (आंबेडकरी चळवळ) नावे ठेवून, हिणवून किंवा क्वचितप्रसंगी त्याचेच नाव घेऊन इतरांच्या ‘महालावर’ उड्या मारायला लागलीत. त्यातल्या काहींनी इतरांच्या ‘महालावर’ छतावरची जबाबदारी पार पाडली तर काहींनी इमानेइतबारे ‘महालाच्या’ दरवाज्यावर गळ्यात पट्टा बांधून घेऊन महालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. व एवढे सर्व करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या भिंती आजतागायत ज्यांनी खंबीर व स्वाभिमानाने उभ्या ठेवल्यात त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून बौद्धिक दिवाळखोरीचा कळसच गाठला. पराकोटीची कृतघ्नता बाळगून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बेईमान झालोत. परंतु स्वतःची बेईमानी झाकण्यासाठी “आंबेडकर” नावालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. आंबेडकरी चळवळीसाठी हे अतिशय घातक आहे.  ‘आंबेडकर’ नावाने (भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर, मीराताई आंबेडकर, बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर) आंबेडकरी चळवळीचे स्वभिमानित्वच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वव्यापी विचारांना तडा जाऊ नये याची सातत्याने काळजी घेतली आहे.  ‘आंबेडकर’ हे नावच आजपर्यंत आंबेडकरी चळवळीचे खरे उर्जास्थान राहिलेले आहे. ‘आंबेडकर’ या नावानेच आंबेडकरी चळवळीची प्रामाणिकता टिकवून ठेवली आहे.  आज आंबेडकरी चळवळीवर भारतीय माणसांचा जो काही विश्वास उरलेला आहे तो ‘आंबेडकर’ या नावामुळेच आहे. तो विश्वास आम्हाला सार्थकी लावायचा आहे. जे सोबत येतील त्यांच्यासह, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय.
हे करीत असतांना स्वतःच्या वैचारिक मर्यादांना चळवळीच्या मर्यादा बनविता येणार नाही. संसदेकडे बोट दाखवून चालतांना जातीअंताकडे डोळेझाक करता येणार नाही. मानवतावादाचा उच्चार करतांना धार्मिक कट्टरतावाद पाळता येणार नाही. बौद्धमय भारताकडे वाटचाल करतांना अ-बौद्धांचा द्वेष करता येणार नाही.  ‘समाज’ म्हणून नावारूपास येतांना ‘समूह’ भावनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजकीय वाटचाल करतांना यशाच्या नावाखाली व पद-प्रतिष्ठेसाठी वैचारिक मूल्यतत्वांचा नायनाट करता येणार नाही. ‘भारतीयत्वाची ओळख’ निर्माण करतांना ‘जातीय ओळख’ कायम ठेवून चालणार नाही.  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांचे’ अनुयायी बनतांना ‘हिंदुत्वद्वेषी’ वा अन्य ‘धर्मद्वेषी’ बनता येणार नाही. ‘आंबेडकरी विचारांची’ उभारणी व मांडणी करतांना ‘इतर मानवतावादी विचारांना’ कमी लेखून चालणार नाही.  ‘आंबेडकरी विचारांना’ स्वीकारतांना जगातल्या ‘अन्य मानवी विचारांना’ नाकारता येणार नाही. एकंदरीतच आंबेडकरी चळवळ चालवितांना ‘अतिविशिष्ट जातीसमूह’ न बनता ‘सर्वव्यापी मानव समूह’ बनविणारा आंबेडकरी विचार प्रवाह व्हावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीचे व आंबेडकरी विचारांचे हे मर्मगर्भ आम्ही समजून घेतले पाहिजे.
आजपर्यंत पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असणारा संघर्ष आज प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी असा परावर्तीत झालेला आहे.  आज प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी असणाऱ्या संघर्षाची अस्पष्ट भेदरेषा २०२० पर्यंत स्पष्ट संघर्षात बदलणारी आहे.  २१ व्या शतकाला प्रतिगामी शक्तींच्या उन्मादापासून वाचविण्यासाठी व २१ व्या शतकातील पिढीचे प्रतिगामी शक्तीच्या उन्मादी मूलतत्ववादी कारवाया पासून होणाऱ्या नुकसानीला थांबविण्यासाठी आंबेडकरी चळवळ ‘आंबेडकर’ नावाच्या विश्वासू व व्यापक वलयाभोवती स्थिरावणे गरजेचे आहे.  आजपर्यंतच्या सर्व कसोट्या पार करून आंबेडकरी चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या ‘आंबेडकर’ नेतृत्वाच्या नेतृत्वातच २१ व्या शतकातील प्रतिगामी शक्ती विरोधातली लढाई आम्हाला लढता येईल हे अलीकडच्या २ वर्षातील झालेल्या संघर्षात (रोहित वेमुला, कनैय्या कुमार, दलित अत्याचार, अल्पसंख्यांक समाजावरी अत्याचारात) सिद्धही झालेले आहे. एकंदरीतच आंबेडकरसदृश्य आंबेडकरी चळवळीची २१ व्या शतकाला गरज आहे. हे आपण ओळखले पाहिजे व त्यादृष्टीने चळवळीतील आपली वाटचाल निर्धारित केली पाहिजे. तेव्हाच आम्हाला २१ व्या शतकातील आमच्या पिढ्यांना सुरक्षितता प्रदान करता येईल. हे लक्षात घेतले पाहिजे.

¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,
नागपूर.

8793397275, 9226734091, 9518388849