Wednesday, 10 May 2017

#Once_Again_Ambedkar - Article 1

#Once_Again_Ambedkar

चक्रव्युहात सापडलेल्या आंबेडकरी चळवळीला एक आंबेडकरच बाहेर काढू शकतो...

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

आंबेडकरी चळवळ म्हणजे एक व्यापक विश्व. ज्या विश्वाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक विचारांचा वारसा लाभला आहे. ही चळवळ म्हणजे माणसांच्या प्रश्नांवर लढणारी एक विशाल सैनिकांची फौज. ही चळवळ म्हणजे प्रत्येक समाजाचा आधारभूत विचार. ही चळवळ म्हणजे समता, न्याय, बंधुता व स्वातंत्र्याच्या चतुर्सुत्रीवर उभी असलेली नैसर्गिक मानवी जीवनाची आधारशिलाच. बुद्धापासून ते मानवी प्रश्नांवर लढणाऱ्या प्रत्येक विचाराला एका साखळीत बांधणारा धागा म्हणजे आंबेडकरी चळवळ. आधुनिक काळात त्या सर्व मानवतावादी विचारांचे नेतृत्व करणारी चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या विचारांची व्यापकता लक्षात घेऊन आंबेडकरी चळवळीचे सूत्रसंचालन होणे गरजेचे आहे. ज्या मुलभूत विचारावर ही चळवळ उभी आहे त्या विचारांना एका विशिष्ट कप्प्यात, समूहात, समाजात, जातीत, धर्मात किंवा पंथात गोठविता येणार नाही. विचार जितका व्यापक तितकेच त्या विचारावर चालणाऱ्या चळवळीचे सूत्रसंचालन, कार्यप्रवणता, कार्यपद्धती, ध्येयसिद्धी व्यापक असणे अपेक्षित आहे. विचार मानवी जीवनाचे संचालन करतात तसेच त्या विचारांची कार्यप्रवणता व कार्यपद्धती मानवी जीवनाला ध्येयसिद्धी पर्यंत पोहचविणारी असते. न्याय, समता, बंधुता व स्वातंत्र्याची मूल्य समाजव्यवस्थेत रुजविणारी असते. आणि तेच आंबेडकरी चळवळीचे बलस्थान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यापक विचारातून संचालित होणाऱ्या आंबेडकरी चळवळीने एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, व्यापक विचारांना स्वीकारणारे अनुयायी सुद्धा तितकेच व्यापक असले पाहिजे. अन्यथा विचार कितीही व्यापक असले परंतु त्या विचारांचे पाईक म्हणवून घेणारे अनुयायी संकुचित (कुपमंडूक) असले तर विचारही विशिष्ट कप्प्यात राहून संकुचित केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे व्यक्तिमत्व ज्या गुरूला शरण गेले ते तथागत बुद्ध म्हणतात, “मानवी विचार सदैव प्रवाहित असले पाहिजे.” ज्या विचारांचा प्रवाह संकुचित होतो किंवा ज्या विचाराच्या प्रवाहाला बांध घातल्या जातात ते विचार कालौघात संपण्याच्या मार्गावर जातात. विचार स्वतःमध्ये कितीही प्रवाहित असला किंवा भविष्यातील पिढ्यांना कृतीशील असला तरीही अनुयायांच्या दुर्बलतेने तो समाजात प्रवाही पद्धतीने मांडला गेला नाही तर विचारांना भविष्य उरत नाही. आंबेडकरी चळवळीने हे मुलभूत तत्व लक्षात घेणे गरजेचे आहे.
आज आंबेडकरी चळवळ चक्रव्युहात सापडलेली आहे. आंबेडकरी चळवळीत प्रवेशद्वार भरपूर आहेत.  त्या प्रवेशद्वारातून अनेकांनी आंबेडकरी चळवळीत प्रवेश केला. वलयांकित असलेल्या आंबेडकरी चळवळीची व्यापकता आंबेडकरी चळवळीत काम करण्याऱ्या माणसांना पेलवली गेली नाही. त्यामुळे प्रत्येकाने आंबेडकरी चळवळीला त्यांच्या त्यांच्या दृष्टीकोनातून अतिविशिष्टतेकडे नेण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरी चळवळीतील सर्वव्यापकता माणसांच्या मर्यादेत अडकली.  व्यक्तींच्या मर्यादा चळवळीच्या मर्यादा बनायला लागल्या. माणूस व समाज केंद्रस्थानी असलेल्या चळवळीत व्यक्ती केंद्रस्थानी बनायला लागल्या. गुंता वाढत गेला. आंबेडकरी चळवळीच्या शिलेदारांनी स्वतःभोवतीच चक्रव्यूह तयार करीत गेले. ज्यामुळे ते स्वतःही स्वतःच तयार केलेल्या चक्रव्युहात अडकत गेले व समाजालाही अडकवित गेले. ज्यामुळे आंबेडकरी विचाराला संकुचीततेची झालर चढत गेली. ज्यातून स्व स्वार्थ वाढीस लागला. व्यक्तिकेंद्रित विचार समूह मानसिकतेला न्याय देण्यात अपयशी ठरला. आंबेडकरी माणसाने स्वतः सोबत चळवळीभोवती जे चक्रव्यूह निर्माण केले. ते भेदून काढणे आधुनिक काळाची गरज आहे.  आम्ही निर्माण केलेल्या मर्यादेत आंबेडकरी विचारांचा व आंबेडकरी चळवळीचा श्वास कोंडला जातोय. हे लक्षात घेऊन मार्गक्रमण होणे गरजेचे आहे.
कुठलाही विचार व चळवळ समूहासोबतच नेतृत्वाच्या आधारशिलेवर पुढे जात असते. फक्त विचारांचे अनुयायी असून चालत नाही. तर त्या विचारांवर चालणाऱ्या अनुयायांना दिशा देणारे नेतृत्वही काळानुरूप आवश्यक असते.  बुद्धाच्या विचाराला सम्राट अशोकाचे, बृह्दताचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नेत्रुत्व लाभले नसते तर आज बुद्ध विचार जगाच्या पटलावरून नामशेष झाले असते. संतविचारांना शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचे नेतृत्व लाभले नसते तर संतविचारही आज भारतातून नामशेष झाले असते.  प्रत्येक काळी, प्रत्येक वेळी, प्रत्येक विचारला एक खंबीर नेतृत्व मिळाले म्हणून आज ते विचार जिवंत आहेत. व समाजव्यवस्थेत मानवी जीवनाचा एक भाग बनलेले आहेत. याचे कारण आहे त्या विचाराला नंतरच्या काळात लाभलेले नेतृत्व. व त्या नेतृत्वानी त्यांच्या समर्थ खांद्यावर पेलून धरलेली विचारांची चळवळ. 
आंबेडकरी चळवळीतही नेतृत्व आले. पण त्यांच्या मर्यादा स्पष्ट जाणवल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तालमीत वाढलेले राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड यांनी चळवळीचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात काही काळ यांनी चळवळीची व्यापकता लक्षात घेऊन मार्गक्रमणही केले. परंतु व्यक्तिगत स्वार्थ जेव्हा विचार व चळवळीवर डोईजड व्हायला लागला तेव्हापासून आंबेडकरी चळवळीची व्यापकता मर्यादेत अडकायला लागली. व नेतृत्वातील स्पर्धेने आंबेडकरी चळवळीत नवीन चक्रव्यूह तयार केले. चळवळीची व्यापकता विशिष्ट समूहापर्यंत मर्यादित व्हायला लागली. विशिष्ट समूहाचे नेतृत्व करण्यात व त्यातून स्व स्वार्थ साधून घेण्यात धन्यता मानल्या जाऊ लागली. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संस्था, संघटना, पक्षांना ताब्यात घेण्यासाठी यादवी तयार झाली. तर काहींनी वेगळा मार्ग पत्करला तर काहींनी या संस्था, संघटना, पक्ष आपल्याच ताब्यात यावा यासाठी संघर्षाची ठिणगी टाकली. यामुळे आंबेडकरी चळवळीला जणू ग्रहणच लागले.
रिपब्लिक संकल्पना बाबासाहेबांनी दिली. तर बहुजन संकल्पना बुद्धांनी दिली. दोन्ही संकल्पना व्यापक व तितक्याच प्रभावी. म्हणून काहींनी रिपब्लिकन ला जवळ केले तर काहींनी बहुजन या संकल्पनेला जवळ केले. या दोन संकल्पनात दोन राजकीय प्रवाह आंबेडकरी चळवळीत तयार झाले. पण रिपब्लिकन नेत्यांनी बौद्ध, आंबेडकरी, महारांच्या पुढे आपली राजकीय धाव घेतली नाही तर बहुजन प्रवाहातील स्वतःला आंबेडकरी म्हणणाऱ्या नेत्यांनी बहुजन संकल्पनेला जातीय रंग बहाल केला. जातीय गणिते तयार केली गेली व त्यातून बहुजन नावाचा जातीय समूह तयार केला गेला. तथागत बुद्धांनी बहुसंख्य या अर्थाने वापरलेल्या बहुजन या संकल्पनेला जातीय रंग चढताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताचा लढा अवरुद्ध झाला. व त्यातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट फुट पडत गेली. वैचारिक दिवाळखोरी वाढत गेली. त्यामुळे आंबेडकरी चळवळ मुख्य उद्देशापासून दूर जाऊन अंतर्गत वादात अडकली.
आंबेडकरी चळवळीतील काहींनी स्व स्वार्थासाठी केलेल्या बुद्धीभेदातून आजची पिढी सुद्धा प्रभावित झाली. आंबेडकरी चळवळीत काहींनी तयार केलेल्या चक्रव्युहात आधीच्या पिढीसोबतच आताची पिढी पण अडकली. व या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी कुणालाच मार्ग सापडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. याचा लाभ घेऊन प्रस्थापितांनी आंबेडकरी चळवळीतील काही माशांना गळाला लावले. त्यातून चळवळीत भेदाची दरी आणखीच वाढत गेली. समाज नेतृत्वहीन होऊ लागला. भरकटू लागला. भ्रमित होऊ लागला. अविचारी होऊ लागला. स्वतःभोवती गुंफलेल्या कुंपणातून बाहेर न पडता मर्यादेच्या भिंतीतून एका व्यापक प्रवाहाला खेकड्यांच्या सवयीप्रमाणे मागे खेचू लागला.
या सर्व गदारोळात सामाजिक वास्तव्याकडे पूर्णतः डोळेझाक केल्या गेली. कुठल्याही विचाराचा किंवा चळवळीचा समूह संघटीत असेल तर ती चळवळ टिकते व वृद्धिंगतही होते. परंतु आंबेडकरी चळवळीचा समूह संघटीत राहिला नाही. आजही अनेक गावची गावे आंबेडकरी चळवळीच्या विरोधी पक्षांचे मतदार आहेत. अनेक गावांतील आंबेडकरी विचारांना व चळवळीला मानणारा समूह आंबेडकरेत्तर पक्षांचा मतदार आहे. याकडे लक्ष न देता आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या माणसांना (मतदारांना) एकत्र न करता आंबेडकरी नेत्यांच्या एकत्रीकरणाच्या आरोळ्या ओढल्या गेल्या. तेही अशा नेत्यांना सोबत घेऊन जे स्वतःच आंबेडकरेत्तर पक्षांची व नेत्यांची घरठाव करून आहेत. हे सर्व जाणीवपूर्वक आपल्या मर्जीतल्या हस्तकांच्या हातून केले गेले. ज्यामुळे आंबेडकरी चळवळ संघटीत होण्याऐवजी दिवसेंदिवस विघटीत होत गेली.
याचा परिणाम असा झाला कि एकीकडे आंबेडकर नावाचा उदोउदो करून दुसरीकडे आंबेडकर नावाची घृणा ही समाजात पसरविली गेली.  आंबेडकरी चळवळ संकुचित होत असतांना आंबेडकर नावानेच या चळवळीला थोडेफार का होईना तारूण धरले.  स्वतःचे व्यक्तीगत स्वार्थ बाजूला सारून, मान-सन्मान बाजूला ठेवून, मिळू शकणारे राजकीय लाभ दुर्लक्षित करून, टीका व आरोप-प्रत्यारोप दुर्लक्षित करून, आंबेडकर परिवाराची होणारी तथ्यहीन बदनामी मोठ्या मनाने पचवून, चळवळीच्या व्यापकतेसोबतच चळवळीची कृतीप्रवणता टिकवून ठेवली ती आंबेडकर या नावानेच. आंबेडकरी चळवळीत सारेच वातावरण गढूळ होत असतांना देखील आंबेडकरी चळवळीला नेतृत्व दिले ते आंबेडकर नावानेच. संकुचित होत चाललेल्या आंबेडकरी चळवळीला एका विशिष्ट जाती व समूहात अडकवून न ठेवता आंबेडकरी चळवळीची व्यापकता टिकवून ठेवली ती आंबेडकर नेतृत्वानेच. संतपरंपरेपासून ते आंबेडकरी विचार प्रवाहापर्यंत मानवतावादी विचारांचा सेतू बांधण्याचे काम केले ते आंबेडकर नावाच्या नेतृत्वानेच. विचारांचे वारस बेईमान होऊन खरेदी-विक्रीत विकले जात असतांना विचाराच्या वारसेसोबतच नावाचाही वारसा टिकवून ठेवला तो आंबेडकर नावाच्या नेतृत्वानेच. ते नाव, ते नेतृत्व, ते वैचारिक वारस होते प्रकाश आंबेडकर.
राजकीय गदारोळात मानव्यतेसाठी लढण्याची मानसिकता संपली असतांना, मनुवादी विचार, कृती, व्यवस्था भक्कम होत असतांना, जातीय संवेदना वाढत असतांना, जातीय अत्याचाराची परंपरा अखंडित सुरु असतांना सर्वांना सोबत घेऊन “जाती अंताचा लढा” मा. प्रकाश आंबेडकरांनी सुरु केला. आंबेडकरी चळवळीत निर्माण केले गेलेले चक्रव्युव्ह भेदून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीतून बाहेर काढून संतपरंपरेसोबत जोडून घेतले. भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून जातींचा नव्हे तर परिवर्तनवादी माणसांचा समूह तयार करून दुर्लक्षित सामाजिक समूहाला राजकीय प्रवाहात आणले. बाबासाहेब शब्दात न गोवता कृतीत उतरविले. आज मा. प्रकाश आंबेडकरांनी फक्त आंबेडकरी समुहालाच नेतृत्व दिले नाही तर परिवर्तनवादी, मानवतावादी समूहाला नेतृत्व दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात सांसदीय मार्क्सवाद्यांनी जर कुणाचे नेतृत्व मान्य केले असेल तर ते मा. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व होय. आंबेडकरी चळवळीचा ढासळत चाललेल्या चिरेबंदी किल्ल्याचे रक्षण करून त्याला अभेद्द्य ठेवण्याचे काम मा. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वानेच केले. हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल. पण त्यांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल की, त्यांच्या नावापुढे “आंबेडकर” नाव लागल्यामुळे इतरांना आंबेडकर नावासमोर खुजे राहण्याच्या भीतीपोटी प्रकाश आंबेडकर यांना टीका व बदनामीच सहन करावी लागली.  आंबेडकर नावाने लाभ घेण्यास पुढे धजावणारा समाज आंबेडकर नावाच्या नेतृत्वाखाली संघटीत व्हायला तयार नसणे हे समाजाचे व चळवळीचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
चहुबाजूने मानवतावादावर आक्रमणे होत असतांना, माणसे, विचार मारली जात असतांना, इतर स्वयंघोषित नेतृत्व खुजे ठरत असतांना, माणसांवर होणाऱ्या अन्यायाची अविरत मालिका सुरु असतांना, मानवतावादी विरोधी विचारांची सत्ता सत्तेवर असतांना, समाज भयभीत असतांना, समाज स्वतःला असुरक्षित समजत असतांना, या देशाचे संविधान धोक्यात आले असतांना, एकंदरीतच आंबेडकरी चळवळ चक्रव्युहात अडकली असतांना समाजाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कुणासोबत जायचे, कुणासोबत जाऊ नये हे ठरविण्याची वेळ आली आहे. नेतृत्वहीन झालेल्या समाजाने चळवळीचे नेतृत्व स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. आंबेडकरी विचारांची व चळवळीची व्यापकता लक्षात घेऊन मागच्या ६० वर्षात झालेल्या चुकांमुळे चक्रव्युहात सापडलेल्या आंबेडकरी चळवळीला एक आंबेडकरच (मा. प्रकाश आंबेडकर) बाहेर काढू शकतो. हे निर्धारित करून मार्गक्रमण करण्याची गरज आहे. आंबेडकरी चळवळीचा एका विशिष्ट कप्प्यात (समूहात) कोंडत चाललेल्या श्वासाला मुक्त करायचे आहे. आंबेडकरी चळवळीच्या रथाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या स्वप्नातील ध्येयपुर्तीकडे घेऊन जाण्यासाठी #परत_एकदा_आंबेडकर  स्वीकारायचा आहे. हेच आंबेडकरी चळवळीचे वर्तमान व यातूनच आंबेडकरी चळवळीच्या भविष्याची उभारणी होऊ शकेल.
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,
नागपूर.

8793397275, 9226734091, 9518388849

1 comment: