Friday, 27 September 2013

शाळा महाविद्यालयातील संस्थाचालकांचा शिष्यवृत्ती भ्रष्टाचार (घोटाळा) व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण

-: प्रेसनोट :-
दी. २७ सप्टेंबर २०१३

विषय :- शाळा महाविद्यालयातील संस्थाचालकांचा शिष्यवृत्ती भ्रष्टाचार (घोटाळा) व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण

महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शिष्यवृत्ती चा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज online व प्रत्यक्ष महाविद्यालयात स्वीकारले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये होणारे संस्थाचालकांचे घोटाळे व विद्यार्थ्याच्या हक्काच्या शिष्यवृत्तीचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती अर्ज online भरण्याची सक्ती केली आहे.
शिष्यवृत्तीच्या लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळा महाविद्यालयांनी प्रवेश फी घेऊ नये असा कायदा व नियम असतांना देखील शाळा महाविद्यालये त्यांच्याकडून प्रवेश फी आकारीत आहेत. पहिल्यांदा इथेच कायद्याचे सर्रास उल्लंघन संस्थाचालकांकडून केले जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश फी भरली आहे त्या विद्यार्थ्यांनी online शिष्यवृत्ती अर्ज भरतांना तसा उल्लेख आवर्जून करावा. जेणेकरून ती भरलेली रक्कम त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात परत केली जाते.
शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याऱ्या सर्वच OBC, SC, ST, NT, VJ, MINORITY च्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी त्यांच्या बँक खात्यात परत केली जाते. हे लक्षात घ्यावे. तशी विद्यार्त्यांमध्ये जागृती करावी. परंतु हल्ली संस्थाचालक ज्या विद्यार्थ्यांनी online अर्जात प्रवेश फी भरल्याचा उल्लेख करीत आहेत त्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारले जात नाहीत. व त्यांना प्रवेश फी न भरल्याची नोंद करून आणण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे प्रवेश फी ची रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळण्याऐवजी संस्थाचालकांच्या खिश्यात चालली आहे.
कुठलीही प्रवेश फी न आकारता शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा असा नियम असतांना संस्थाचालक सर्रास विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी आकारून आर्थिक शोषण करीत आहेत. तरी शासनाचे याकडे कुठलेही लक्ष नाही. शिवाय समाजकल्याण विभागामार्फत अश्या संस्था व संस्थाचालकांवर कुठलीही कार्यवाही केली जात नाही. ज्यामुळे हल्ली शाळा महाविद्यालये शिक्षणाच्या आदान प्रदानाचे पवित्र स्थळ राहिले नसून विद्यार्थ्यांच्या आर्थिक व मानसिक शोषणाचे अड्डे बनलेले आहेत. ज्याची मोठी झळ आर्थिक कमकुवत वर्गातील विद्यार्थ्यांना सोसावी लागत आहे.
प्रवेश फी विद्यार्थ्यांकडून स्वीकारूनही शिष्यवृत्ती अर्जात तसा उल्लेख न करण्याचा फतवाच शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी काढला आहे. ज्यामुळे प्रवेशाची सर्व रक्कम सरळ शाळा, महाविद्यालयाच्या खात्यातून संस्थाचालकांच्या खिश्यात घातली जात आहे. यात दरवर्षी करोडो-अब्जो रुपयाचा घोटाळा होत असतांना सरकार व समाजकल्याण खात्याचे उघड्या डोळ्याने दुर्लक्ष केले जात आहे.
त्यामुळे जी शाळा महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश फी चा उल्लेख शिष्यवृत्ती अर्जात करण्यास मनाई करीत आहेत अश्या शाळा महाविद्यालय व संस्थाचालकांची तक्रार भारिप बहुजन महासंघाच्या कार्याकर्त्यांजवळ करावी. किंवा डॉ. संदीप नंदेश्वर यांच्याशी प्रत्यक्ष 8793397275 या क्रमांकावर संपर्क करावा. 
१-     शाळा महाविद्यालयांनी चालविलेला मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा हा आर्थिक छळ त्वरित बंद करावा. व सर्व शाळा महाविद्यालयातील शिष्यवृत्ती फार्म ची परत तपासणी करून प्रवेश फी चा उल्लेख केलेल्या शिष्यवृत्ती फार्म लाच महाविद्यालयाने स्वीकारावे.
२-     महाविद्यालयात ज्या कर्मचार्यांकडून प्रवेश फी चा उल्लेख केलेले शिष्यवृत्ती फार्म स्वीकारले जात नाही अश्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी खटले व Atrocity कायद्याअंतर्गत खटले दाखल करावेत.
३-     शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी आकारू नये.
४-     ज्या शाळा महाविद्यालयात शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी आकारली जाते त्यांच्या शिष्यवृत्ती खात्याची कायदेशीर चौकशी करावी. या चौकशीत करोडो-अब्जो रुपयाचा शिष्यवृत्तीचा आर्थिक घोटाळा समोर येईल. अश्या शाळा महाविद्यालयाचे संलग्नीकरण आणि मान्यता काढून घेण्यात यावी.
५-     मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे होणारे मानसिक व आर्थिक शोषण थांबविण्यासाठी शासनाने व समाजकल्याण विभागाने त्वरित पाऊले उचलावीत.
वरील उल्लेखित शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचार व त्यातून होणारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण थांबविण्यासाठी भारिप बहुजन महासंघातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची दखल शासन व संबंधित समाजकल्याण विभागाने लवकरात लवकर घ्यावी.

आपला
डॉ. संदीप नंदेश्वर

सामाजिक कार्यकर्ता, नागपूर.

No comments:

Post a Comment