स्वाभिमान पेरणारी
आंबेडकरी चळवळ उभी करायची आहे...
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर
9226734091
आंबेडकरी चळवळीचा
आजपर्यंतच्या वाटचालीचा गोषवारा घेतांना काही गोष्टी आजही प्रश्नार्थक वलयात सध्याच्या
पिढीसमोर उभ्या आहेत. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, धम्मकारण आंबेडकरी विचारातून चाललेले
आहे का ? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे धाडस करतांना स्वाभिमानी आंबेडकरी विचार नसानसांमधून
प्रवाहित करण्याचे धाडस असावे लागते. यासोबतच वाढत चाललेले वैचारिक प्रदूषण हे तर आंबेडकरी
चळवळीला घातक असे विष आहे. अर्ध्याअधिक समाजाच्या डोक्यात हे विष थैमान घालत आहे. त्यामुळे
काही कणखर आणि प्रखर भूमिका घेऊन आंबेडकरी चळवळीची वास्तवता मांडणे गरजेचे ठरते. ही
वास्तवता मांडताना केल्या गेलेल्या काही संघटनात्मक आणि मानव्यिक टीकेला विरोध समजू
नये. कारण या वास्तवतेसोबतच सामाजिक, आर्थिक, राजकीय अश्या विविध पातळ्यांवरील आंबेडकरी
चळवळीला दिशादर्शन जर केले गेले नाही तर ती अंधारातील चाचपड ठरेल. म्हणून आंबेडकरी
चळवळीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत मार्ग आधुनिक काळाशी आणि आधुनिक पिढीशी
साधर्म्य साधून सुसंगत मांडण्याचा प्रयत्न या लेखातून केला गेला आहे.
चळवळीचे,
तत्वज्ञानाचे, आंदोलनाचे ध्येय आणि उद्धिष्ठ निर्धारित असते. तेव्हाच त्या चळवळीला,
तत्वज्ञानाला आणि आंदोलनाला व्यवस्थेत आपला शिरकाव करता येतो आणि व्यवस्था बळकावता
येते. चळवळीची आणि तत्वज्ञानाची ध्येय व उद्धीष्ठ्पुर्ती करण्यासाठी प्रक्रियात्मक
पाऊले उचलावी लागतात. ही पावले त्या चळवळीच्या आणी तत्वज्ञानाच्या अनुयायांच्या माध्यमातून
उचलली जातात. हे अनुयायीच त्या प्रक्रियेचा अविभाज्य अंग बनतात. चळवळ एक प्रक्रिया
बनत असेल तरच ध्येयसिद्धीच्या मार्गाने मार्गक्रमण करता येते. परंतु जर चळवळीचे आणि
तत्वज्ञानाचे अनुयायी ध्येय व उद्धिष्ठ निर्धारित करण्यात अपयशी ठरले तर चळवळ पूर्णत्वास
जाण्याआधीच लयास जाते. आणि तत्वज्ञान काळाच्या पडद्याआड नामशेष व्हायला लागतो.
आंबेडकरी
चळवळ आणि तत्वज्ञानाचे ध्येय आणि उद्धिष्ठ निर्धारित करण्यात आंबेडकरी अनुयायांनी गफलत
केल्याने आज चळवळीत दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे तत्वज्ञानाला चाकोरीच्या बाहेर
पडता येत नाही. आंबेडकरी तत्वज्ञानाच्या अनुयायांनीच आंबेडकरी चळवळीचा मार्ग कठीण करून
टाकला आहे. हे सर्व चळवळीचे, तत्वज्ञानाचे आणि आंदोलनाचे निश्चित असे ध्येय व उद्धिष्ट
निर्धारित न केल्यामुळे झाले आहे. काहींनी आंबेडकरी चळवळीचे ध्येय व उद्धिष्ट सत्ताप्राप्ती
असे निर्धारित केले. तर काहींनी बौद्धमय भारत निर्धारित केले. काहींनी राजकीय तर काहींनी
धार्मिक. असेच ध्येय व उद्धिष्ट निर्धारित केल्याने आंबेडकरी चळवळ मानव्याला माणूसपण
बहाल करण्यात यशस्वी झाली कि नाही ? हा वादातीत मुद्दा बनला आहे. परंतु मानवाला मानवाचे
अधिकार बहाल करून मानव्यप्राप्तीसाठी लढणारी आंबेडकरी चळवळ आणि समतेच्या पायावर उभे
असणारे बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञान मागे पडत आहे. आंबेडकरी चळवळ आणि तत्वज्ञानातील ध्येय
आणि उद्धीष्टातील हे अंतर्गत द्वंद्व सोडवून एक ध्येय एक उद्धिष्ट निर्धारित करून वाटचाल
करणे आज क्रमप्राप्त बनले आहे.
आंबेडकरी
अनुयायांना तुकड्या तुकड्यात विश्लेषण करण्याची सवय पडली आहे. कारण बाबासाहेब आणि बुद्धांना
तुकड्यातुकड्यात वाटून दिले आहे. त्यामुळे आजकाल स्टेजवर बाबासाहेब आणि बुद्धांना जागा
राहत नाही. आणि असली तरी कुठल्या कोपऱ्यात ठेवले आहेत ? हे शोधावे लागते. आंबेडकरी चळवळीdMs मी समग्र बघतो. तुकड्यात बघत नाही. सामाजीकतेकडून होणारी व्यक्तीपुजक भक्तीपुजा स्वार्थ
आणि खंडातच विचार करते. माझ्या बापाची चळवळ (आंबेडकरी चळवळ) ही निर्मितीच्या काळातच
वैश्विक होती. त्यामुळे मला खंडप्राय विचार येत नाही. मला ती चळवळ सदैव वैश्विक दिसत
आली आहे. आणि यापुढेही वैश्विकच दिसत राहणार.
कार्यकर्त्यांमध्ये
जाज्वल्य स्वाभिमान पेरणारा नेता आज आंबेडकरी चळवळीला हवा आहे. परंतु याउलटच सर्व आघाड्या
उघडल्या गेल्या आहेत. आज कार्यकर्ता ही संकल्पनाच धुळीस मिळाली आहे. जे आहेत ते पेड
वर्कर. कुठे शोधता तुम्ही कार्यकर्ते आणि नेते...इथे तर स्वार्थ आणि भौतिक सुखाने हपापलेपण
आले आहे. राजकारण आणि राजकीय कार्यकर्ते यांचा नेमका अर्थ लावता न आल्यामुळे नैतिक
राजकारणाची उभारणी होऊ शकली नाही. त्यामुळे संघटना आणि संस्था मोडकळीस निघाल्या.
बलिदानाच्या
बळावर आम्ही कार्यकर्ते उभारू शकणार नाही. पण पोटाच्या भाकरीसाठी गोळा केलेली कार्यकर्ते
कधीच राजकीय बांधणी करू शकत नाही. विचारांच्या आणि स्वाभिमानाच्या बळावर सोबत आलेली
कार्यकर्ते मात्र परिवर्तनाचे शिलेदार नक्कीच ठरू शकतात. कदाचित आम्हाला याचाच विसर
पडला असावा म्हणूनच फक्त मूक (विचार, बुद्धी, तर्क नसलेले) कार्यकर्ते गोळा करून पाठीमागची
संख्या वाढविण्यात आम्ही धन्य मानले. आणि प्रसंगी याच कार्यकर्त्यांना विकून सत्तेच्या
खुर्चीचे बुड झिझविले. संख्यावाढ हि ब्राम्हणी विचारांच्या संस्था संघटनांना नको आहे.
त्यांना जाज्वल्य कट्टर असा विचारवाद पाहिजे. आम्हाला मात्र कुणीही चालते. या रे माझ्या
मागल्या म्हणून आम्ही किती दिवस स्वतःसोबत समाजाचा आत्मघात करून घेणार आहोत ? याचा
विचार आता आपण करायचा आहे.
विचार
पेरण्याच्या नावाखाली कैडर मधून संघर्षाची धार कमी केली गेली. विपश्यनेनी त्यात आणखी
भर घालून कार्यकर्त्यांना मानसिक गुलाम आणि मानसिक असंतुलित बनविले. त्यामुळे संघर्षात
उतरणारे फार कमी कार्यकर्ते राहिलेले आहेत. बाकीचे सर्व कार्यकर्ते कॅडर बनून चार भिंतीच्या
आतच गोळा होतात. तर काही भाषण ऐकायला गर्दी करतात. रस्त्यावर उतरणारे खरे कार्यकर्ते
जर असते, तर आज मानसिक असंतुलन बिघडवीणा-यांच्या दुकानदा-या बंद पडून राजकीय मोट बांधता
आली असती. मैदानात लढाईत शूर बनून लढणा-यांची औलाद आता चार भिंतीच्या आतील कॅडर च्या
गप्पा मारायला लागल्या आहेत. त्याही परिपूर्ण स्वप्नरंजनात. वास्तवात काहीच नाही. विचारांचे
कॅडर चालविणारे धड झोपतही नाही आणि धड शांतही होत नाही. सतत स्वप्नात जगतात २०३४ च्या,
तर कुणी २०१४ च्या, तर कुणी २०१९ च्या, तर कुणी त्या बुड झिजाविना-या खुर्चीच्या. माझा
विरोध त्यांच्या मंथनाला नाही. माझा विरोध त्यांनी कार्यकर्त्यांमधील रक्त थंड करण्याला
आहे. मी आजही सलाम करतो त्या माझ्या कार्यकर्त्यांना जे विचारांच्या बळावर रस्त्यावर
उतरतात. आणि भिंतीच्या पल्याड बसणा-यांच्या थोबाडीत हाणून समाजावर अन्याय करणा-यांना
जाहीर फासावर लटकवतात. आणी विजयी मुद्रेने मान उंचावून घरी परततात. समाधानाचा उसासा
घेऊन, चटणी भाकर खाऊन, उद्याच्या लढाईसाठी सज्ज होतात. सलाम आहे माझ्या कार्यकर्त्या
मित्रा तुझ्यातल्या लढाऊ बाण्याला...तुझ्यातल्या विचाराला...तुझ्या रक्तालाच माझा सलाम
आहे.
समाजातील आजूबाजूच्या वातावरणात
घडणा-या घटना घडामोडी लक्षात घेतांना कधी, कुठे आणि केव्हा कुठल्या प्रतिक्रिया समाजातून
उमटायला पाहिजे ? हे आता आंबेडकरी समाजाने शिकले पाहिजे. उठसूट कुठेही प्रखर होणे हे
कधीच चळवळीला पोषक नाही. प्रखर व्हायचेच आहे तर आपल्याच माणसांवर व्हा ! जे म्हणतात
की "बाबासाहेबांनी एकट्यानेच काही केले नाही." "बाबासाहेबांनी स्वतःची
कुठलीही चळवळ केली नाही." आणि हे सर्व कुणाच्या तोंडून ऐकायला येते जे बामसेफ
आणि बीएसपी चे कार्यकर्ते आहेत. अश्या भेसळ वैचारिक रोग्यांना (कॅडरना) कुठल्या तुरुंगात
डांबायचे हे पण ठरवा. कुणी इतरांनी बाबासाहेब आणि त्यांच्या चळवळीविषयी काहीही बोलू
नये अशी भूमिका घेणारे आम्ही कार्यकर्ते आता यांच्याबद्दल कुठल्या प्रतिक्रिया देणार
आहोत. राजकीय शहाणपण अजून आमच्यात आलेले नाही. म्हणून कुठेलेही राजकारण आम्हाला पचनी पडत नाही.
किंवा राजकीय प्रत्युत्तर कसे द्यायचे हे अवगत
झालेले नाही. आणि म्हणूनच बामसेफ / बीएसपी चे पिल्ले बाबासाहेबांवर बोट ठेऊन सतरा
(१७) बापांचा उदोउदो करायला निघालेले आहेत. ज्या बाबासाहेबांना सारा जग ओळखतो त्या
बाबासाहेबांना टोळक्यांच्या नेत्यांच्या रांगेत बसवून अपमान करतात. आणि बहुजनांचा (वैचारिक कुंटणखाण्याचा) धंदा करतात.
खरे तर यांना रोकण्यासाठी आम्ही प्रतिक्रियावादी
व्ह्यायला पाहिजे. पण ते न करता आम्ही इतरांच्या राजकारणाला अंगावर घेऊन आमची राजकीय
प्रत आणखीच खालावत चाललो आहोत. जरा विचार करा.
आंबेडकरी चळवळीची खरी अडचण आंबेडकरी
माणसेच झालेली आहेत. जी विभूतीपुजेने विभागली गेली आहे. ज्यांना मानसिक आणि वैचारिक
गुलाम बनविण्यात आले आहे. त्यामुळे प्रतीआक्रमणे आपली चाल अगदी वेगाने चालत आहे. विचार,
निष्ठा, स्वाभिमान आणि तत्वनिष्ठ जीवनप्रणाली राहिलेली नाही. जी आहे ती आर्थिक बाजारपेठेत
वावरणारी सूचकांक निदर्शक आहे. त्यामुळे कुणाचे पायपोस कुणाच्या पायात राहिलेले नाही.
आज समाजाला गरज आहे ध्येयवेड्या तरुणांची जे या आर्थिक बाजारपेठेत स्वतःच्या आयुष्याची
माती न करता समाजासाठी चळवळीसाठी स्वतःला झोकून देतील. जे समाजात वाढत जाणा-या बेरोजगारांच्या
जथ्यांसाठी उभारणी करून देतील.
बुजगावण्याची कितीही सोंगे घेऊन
आम्ही आंबेडकरी शिवारात घुसलेली हैदोसखोरांची जमात हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तरी
त्यात यश येणार नाही. अशी अनेक बुजगावणे आंबेडकरी शिवारात आलेत...शिवार रक्षणाची हमी
देऊन स्वतःच लुटारू बनून हैदोस घालू लागलीत. आता या बुजगावन्यांच्या तोंडावर झाकलेली
पट्टी उतरवायची असेल तर आम्ही आमचा खरा आंबेडकरी पोशाख परिधान करणे गरजेचे आहे. आणि
हे परिधान आंबेडकरी विचार (लेखन आणि भाषण खंडातून) वाचल्याशिवाय शिवता येणार नाही.
त्यासाठी आम्हाला आमचा खरा आंबेडकरी चेहरा तयारच करावा लागणार आहे. म्हणून नवआंबेडकरवाद्यांना
एकच आव्हान आहे की, आंबेडकरी चळवळ आणि विचार समजून घेण्यासाठी शुद्ध आणि खरे आंबेडकरी
विचार / साहित्य / लेखन वाचणे (लेखन आणि भाषण खंडातून) गरजेचे होईल.
आंबेडकरी
चळवळीला समजून घेतांना आमची काहीतरी गल्लत होत आहे. आणि आजपर्यंत ती झाली आहे. त्यामुळे
या चळवळीला निश्चित असा मार्ग पकडता आला नाही. किंवा त्या मार्गावर संचलित होता आले
नाही. राजकारण हेच अंतिम ध्येय गृहीत पकडून आम्ही मार्गक्रमण करू शकत नाही. आणि तसा
उद्देश घेऊन आम्ही चळवळीला मार्गक्रमित केले तर समाज विनाकारण भरडला जातो. हे आतापर्यंतच्या
वाटचालीवरून अनुभवायला आले आहे. आंबेडकरी चळवळीचे अंतिम ध्येय हे सत्ता होऊच शकत नाही.
शिवाय ज्या तत्वज्ञानावर ही चळवळ उभी आहे त्या तत्वज्ञानाचा सत्तेशी तिळमात्र संबंध
येत नाही. जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीला राजकारणाच्या ध्येय आणि उद्धीष्ठात गोवल्या
गेले तेव्हा तेव्हा समाजात दुफळी माजली. फाटाफूट घडून आली. आपल्याच समाजबांधवांमध्ये
वितुष्ठ निर्माण झाले. अगदी पराकोटीच्या टोकाला जाण्याइतपत...
बहिष्कृत
समाजाचा प्रश्न हा सामाजिक आहे तितकाच तो मानव्यिक आहे. आर्थिकता हे त्याच्या पायथ्याशी
असले तरी समाजातला उच्चनीच भाव या समाजाला छळतो आहे. त्यामुळे सामाजिक ध्येय घेऊन मानवी
कल्याणासाठी लढा उभारणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. हे आंबेडकरी चळवळीचे सूत्र आम्ही
अंगीकारणे कधीही लाभदायकच ठरेल. कायद्याने मिळेल तेवढे घेऊन समाजाच्या कल्याणासाठी
प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सत्ता असो अथवा नसो कल्याणकारी जगणे हेच आमचे
मुलभूत अधिकार आहे. आणि तशी परिस्थिती निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. आज
भारतीय समाजात प्रत्येकच समाजाजवळ सत्ता आहे. असे कुणीही व्यवस्थावादी माणूस म्हणू
शकणार नाही. सत्ता आणि व्यवस्थेचा अभ्यास करणारे अभ्यासकही आमच्या मताशी सहमती दर्शवतील.
व्यवस्थेतील "सह्भागीत्व" आणि "सत्ता" या दोहोंत मोठी तफावत आहे.
सहभागीत्वाची संकल्पना ही लोकशाहीला बळकटी प्रदान करते. तर "सत्ता" ही संकल्पना
हुकुमशाहीला, अराजकतेला आमंत्रण देते. आंबेडकरी समूहाने आतातरी याचा नीट विचार करणे
आत्यंतिक गरजेचे आहे.
आज
ज्या समस्यांना आंबेडकरी समूहाला सामोरे जावे लागत आहे. त्या समस्या इतर समाजाला भेडसावतांना
दिसत नाही. कारण इतर समाजाने व्यवस्थेतील सहभागीत्वाला महत्व दिले. आणि तत्कालीन आंबेडकरवादी
(मुळात आंबेडकरी नसलेले) नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाची स्वप्ने बघितली. त्याला
बळी पडून काही आंबेडकरी नेत्यांनीसुद्धा मंत्रिपद आणि तत्सम खुर्चीचे स्वप्न उराशी
बाळगले. त्यांच्या या कृतीने समाजाची व चळवळीची वाताहत होत आहे. हे त्यांच्या कधी लक्षातच
आले नाही. १९८० च्या दशकानंतर मानवी कल्याणासाठी लढणारी आंबेडकरी चळवळ "सत्ता"
संकल्पनेभोवतीच मर्यादित झाली. आंबेडकरी चळवळीने आपला मोर्चा "सत्तेकडे"
वळविल्याने समाज सर्वच पातळ्यांवर माघारू लागला. यावर सद्सदविवेक बुद्धीने चिंतन आणि
मनन होणे आज गरजेचे आहे.
समाज
एकसंघ राहील; नेते संघटीत राहीतील अश्या परिस्थितीत मानवी कल्याणाची निदान समाधानकारक
पातळी गाठता आली तरी सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचता येईल. याचा विचारच कधी झाला नाही.
सर्व गणिते व्यक्तिगत मान-सन्मान आणि सत्तेच्या लालसेनेच मांडल्या गेले. त्यामुळे सामाजिक
समीकरणे कधी सोडवलीच गेली नाही. आज एक आशेचा किरण दिसतो आहे. निदान या "सत्तावादी"
स्वप्नवलयातून काही उच्चशिक्षित तरुण बाहेर पडू लागली आहेत. आणि चळवळीच्या मुळाशी असणा-या
तत्वज्ञानाच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अश्या या आंबेडकरी नवतरुण
पिढीने तरी आंबेडकरी चळवळीतील मानवी कल्याणाचे ध्येय उराशी बाळगून असले पाहिजे. सामाजिक,
आर्थिक, सांस्कृतिक या चळवळीच्या अंगांना बळकटी प्रदान करण्यासाठी काम केले पाहिजे.
आणि तद्सोबतच अलीकडे आलेल्या धम्मातील प्रदूषणाला दूर करून बुद्ध तत्वज्ञानाला आंबेडकरी
परिप्रेक्षातून पुर्नगठीत केले पाहिजे.
सत्ता
ही तत्कालिक असते. ती कायम हातात राहील हे जगातल्या कुठल्याही समूहासाठी शक्य नाही.
परंतु एकदा सत्ता हातून गेली की माणूस सत्तेशिवाय जगू शकत नाही. सत्तेच्या ऐश्वर्यासाठी
नेते अश्लाघ्य, तत्वशून्य, स्वाभिमानशून्य तडजोडी करायला लागतात. आणि वेळप्रसंगी समाजाच्या
अधोगतीला कारणीभूत ठरतात. पण मानवी कल्याण हे चिरंतन असते. समाजाच्या हिताचे असते.
मानव्यिक विकासाला पूरक असते. या सर्व घटना घडामोडीचा अनुभव आंबेडकरी चळवळीने घेतला
आहे. या सर्व अनुभव संपन्नतेच्या बळावरच आम्हाला सद्यकालीन आंबेडकरी चळवळीची आचारसंहिता
बनवावी लागणार आहे. हे आम्ही करू शकलो तर उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे. आंबेडकरी
चळवळीतील ध्येय आणि उद्धिष्टांची पूर्ती नव नेतृत्वाच्या बळावर होणार आहे. यात तिळमात्र
शंका नाही.
आज आम्ही राजकीय पातळीवर कितीही
कमकुवत वाटत असलो तरी आम्ही समाजाची राजकीय उंची वाढविण्यात यशस्वी झालेलो आहोत. सत्ता
असली काय आणि नसली काय परंतु सत्तेवरचे नियंत्रण आम्ही मिळविलेले आहे. भूमिहीनांचा
सत्याग्रह असो, आणीबाणीच्या काळात घेतलेले निर्णय असो, स्वाभिमानाला धरून उभारलेले
भावनिक आंदोलन असो, मंडळ कमिशन साठी पुकारलेला लढा असो की संविधानातील कल्याणकारी तत्वे
टिकवून ठेवण्यासाठी विविध काळात निर्माण केलेला सामाजिक दबाव असो, आमच्या वाढलेल्या
राजकीय उंचीचेच प्रतिक आहे. कुठलीही राजकीय समीकरणे आम्हाला वगळून मांडली जात नाही.
यात आमचा राजकीय विजय आहे. असे आम्हाला वाटते. कुठलेही राजकीय निर्णय आम्हाला
लक्षात घेतल्याशिवाय घेतले जात नाही. हे आमच्या
राजकीय सजगतेचे प्रतिक आहे.
प्रश्न हा आहे की, फक्त सत्ता
आपल्याकडे नाही. किंवा ती आपल्याकडे यावी म्हणून
आम्ही आणखी किती दिवस समाजाचा स्वाभिमान गमावणार आहोत. कारण जगतांना सत्तेची वाट पाहता
येत नाही. तर दैनंदिन जीवनातल्या गरजा भागविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांच्या शोधात बाहेर
पडावेच लागते. आणि ज्या परिस्थितीत ही सर्व आर्थिक स्त्रोते प्रस्थापितांच्या हातात
आहेत; तोपर्यंत आम्ही दैनंदिन जीवनात स्वाभिमानाला धाब्यावर बसवूनच गरजापुर्तीचा प्रयत्न
करणार आहोत ? आधुनिक काळात आंबेडकरी समाजात / आंबेडकरी चळवळीत काम करणा-या लोकांनी
निदान याचा विचार तरी करणे गरजेचे आहे.
यासोबतच आणखी एक गोष्ट महत्वाची
आहे ती ही की आम्हाला राजकीय प्रगल्भता स्वतःमध्ये आणावी लागणार आहे. आम्ही प्रगल्भतेचे
राजकारण करणे केव्हा शिकणार आहोत ? की प्रतिक्रियावादी राजकारण करून स्वतःचे राजकारण
दुबळे करणार आहोत ? कुणी काहीही बोलले तरी आमचा निषेध मात्र ठरलेला असतो. पण जरा गांभीर्याने
विचार केला तर त्यातून आपले राजकारण पोरके होते. समाजात आंबेडकरी राजकारणाविषयीच्या
ज्या प्रतिक्रिया उमटतात त्या आमच्या अगदी विरुद्ध बाजूने जातात. राजकीय पटलावरून विचारांची,
मुद्द्यांची पळवापळवी नित्याचीच ठरते. विचारांचे आणि नैतिकतेचे राजकारण करणा-यांनी
अश्या पळवापळवी ला फार काही गांभीर्याने घ्यायचे नसते. आणि त्याला गांभीर्याने घ्यायचेच
झाले तर राजकारणात तितक्याच ताकतीची शक्ती निर्माण करून प्रत्युत्तर देण्यासाठी शक्तीप्रदर्शन
करावे लागते. आम्ही ते शक्तीप्रदर्शन करण्याची ताकत निर्माण करण्यात आपला वेळ घालविला
पाहिजे. इथे तर झोपडीला छत उरलेले नाही. आणि अशा परिस्थितीत आम्ही प्रतिक्रियावादी
राजकारण करायला गेलो, तर आम्ही स्वतःच तोंडघशी पळू. आणि ज्यांनी विचारांची, मुद्द्यांची
पळवापळवी केली ते राजकीय हिरो बनतील. आम्हाला आता राजकीय शहाणपण शिकले पाहिजे. अन्यथा
आतापर्यंत झालेली आपली राजकीय पीछेहाट यानंतर राजकीय अस्ताकडे घेऊन जाणारी असेल.
हे सर्व जर तात्त्विक आणि तार्कीकदृष्ट्या
समजून घेऊन त्या दिशेने मार्गक्रमण करायला लागलो तर निश्चितच आज आमची वाढलेली राजकीय
उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही. आंबेडकरी चळवळीचे शिलेदार म्हणविणा-यांनी
सत्तेची अनेक प्रयोग करून बघितले आहेत. हाताळून बघितले आहेत. परंतु शेवटी व्यक्तिगत
उंची गाठण्याच्या पलीकडे या सत्तावादी राजकारणाची मजल पोहचू शकली नाही. समाजाची उंची दिवसेंदिवस खुजी होत चालली आहे. नव्या
आव्हानांना पेलण्यात आमची शक्ती इतकी खर्च होत आहे की आम्ही योग्य तो मार्गच पकडू शकलेलो
नाही. त्यामुळे राजकारण की समाजकारण की अर्थकारण हे ठरविण्यातच गुरफटलो गेलो आहोत.
ही कोंडी हा समाज जितक्या अल्पावधीत फोडून काढेल तितक्या लवकर या समाजाला आपले भविष्य
सुकर करता येईल. आणि ही कोंडी आर्थिक संपन्नतेशिवाय फुटू शकणार नाही असे आमचे निर्भीड
मत आहे.
आज सद्यकालीन स्थितीत आंबेडकरी
समाजाचा प्रश्न राजकीय वाटत असला तरी तो पूर्णार्थाने खरा नाही. आम्ही सामाजिक, आर्थिक,
सांस्कृतिक आणि धार्मिक स्तरावर पिछाडलेले आहोत. हेच वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकरी
समाजाचा आजचा प्रश्न हा सामाजिक आणि आर्थिक असाच आहे. अगदी तसाच जसा बाबासाहेबांच्या
काळात होता. फरक इतकाच आहे की सामाजिक चटके तीव्र नसले तरी स्वरूप बदलून अर्थ-सामाजिक
(Socio - Economic) बनले आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या कायदेपुरक समतावादी व्यवस्थेने
आम्हाला आमची ओळख प्राप्त झाली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत या समाजाला पाडून पुनश्च्य
तीच पेशवाईच्या व्यवस्थेला प्राचारण केले जात आहे. कार्ल मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे
‘इतिहासात मानवी गुलामीच्या अवस्थेला आर्थिकता कारणीभूत ठरली.’ अगदी हाच धागा अलीकडे
मनुवादी विचारसरणीने पकडलेला आहे. समाजाचे आर्थिक खच्चीकरण करून सामाजिक गुलामगिरीची
मुहूर्तमेढ रोवली जात आहे.
आंबेडकरी समाजाची आर्थिक परिस्थिती
सुधारली आहे. असे जर कुणी म्हणत असेल तर ते निव्वळ धाडसाचे होईल. अश्या लोकांना मला
विचारावेसे वाटते की, फेब्रुवारी १९२८ च्या बहिष्कृत भारताच्या अंकात लिहिल्याप्रमाणे,
"व्यक्तिगत उंची वाढली म्हणून समाजाची उंची वाढली हे म्हणणे धाडसाचे आहे तितकेच
ते अप्रस्तुतही आहे. व्यक्तिगत उंची वाढली म्हणजे समाजाची उंची वाढत नाही. समाजाची
उंची ही बहुसंख्यांकाच्या कल्याणाशी निगडीत असते. आणि एकदा का सामाजिक उंची गाठता आली
की व्यक्तिगत उंची गाठायला वेळ लागत नाही." हे मांडायचे प्रयोजन इतकेच की, आजही
समाज लाचार आहे. आजही समाज आर्थिक बाबतीत प्रस्थापितांवर निर्भर आहे. आणि ही निर्भरता
दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि एकदा का निर्भरता वाढत गेली तर स्वाभिमान नावाचा मर्दानी
बाणा कुठेतरी लुप्त होतांना दिसून येतो. भौतिक साधनांसाठी, नौकरीसाठी, परिवारासाठी
इ. अनेक परिस्थितीत. आणि हे वास्तव आज समाजात अस्तित्वात असल्यामुळेच प्रतीक्रांतीवाद्यांनी
आंबेडकरी समाजात शिरकाव करून दुफळी माजवलेली आहे.
आज गरज आहे ती आर्थिक उत्पन्नाची
स्तोते समाजाच्या हातात देण्याची. निर्माण करण्याची. त्यासाठी प्रयत्न करण्याची. व्यक्तिगत
आणि सामाजिक स्वाभिमान टिकवून ठेवायचा असेल तर या आर्थिक घटकांची नितांत गरज आहे. त्यामुळे
आता आम्ही समाजाच्या आर्थिक संपन्नतेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याशिवाय समाज
स्वबळावर उभा राहू शकणार नाही. आणि जोपर्यंत समाज स्वबळावर उभा होत नाही तोपर्यंत व्यक्तीचे
सामाजिक, सांस्कृतिक बलस्थान बळकट होणार नाहीत. हा समाज जगाच्या पातळीवरील अत्युच्च
समाज आहे ज्या समाजाला बुद्ध धम्माचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्यामुळे हे सर्व करायला
आम्हाला फार काही वेळ द्यावा लागेल असे नाही. गरज आहे ती बुद्ध तत्वज्ञानातील मानव्यिक
तत्वांना सामाजिक परिप्रेक्षात उतरविण्याची आणि अंगीकारण्याची.
तरुणांचा असा एक वर्ग आहे जो
आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त आहे. तो आर्थिक व्यवहाराच्या जगात घर
आणि नौकरीमध्ये व्यस्त झालेला आहे. ज्याला वाटते की आता कुठे समाजात भेदाभेद आहे. जो
स्वतःला सुरक्षित समझतो आहे. जो चळवळीतील आंदोलनाला निरर्थक संबोधतो आहे. जो चळवळीपासून
दूर जातो आहे. जो रोजगाराच्या विवंचनेत, आर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत विचार व चळवळीसोबत
जुळत नाही. अश्या तरुण वर्गाला सोबत घेण्यासाठी काही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक
स्त्रोतांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहे. या चळवळीतील काहींच्या हातात सद्यस्थितीत
ब-यापैकी साधन संसाधने एकवटली आहेत. या संसाधनांचा वापर उद्याच्या पिढीसाठी स्त्रोतांची
निर्मिती करण्यासाठी करावा लागणार आहे. तेव्हाच या चळवळीत हा तरुण वर्ग स्वतःला सुरक्षित
समजेल. समाजाची एकजूट त्यातून साध्य होईल. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी
ही या चळवळीत काम करणा-या तरुण-सुशिक्षित-विचारवंत-आर्थिक संपन्नता मिळविलेल्या लोकांची
आहे. त्यांची एकजूट झाली तर समाजाला एकत्र करायला वेळ लागणार नाही.
यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे
गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत असलेले आंबेडकरी
विचार ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी धोक्याचे ठरले आहे. भाषणातून लोकांनी सांगितलेले
बाबासाहेब समाजाने प्रमाण मानले असल्याने खरे बाबासाहेब मांडणा-यांना त्रास होणार आहे.
तो त्रास घेण्याची तयारी जर काहींनी आपल्या खांद्यावर घेतली तर दुकानदा-या चालविण्यासाठी
आणि आपापसात फाटाफूट पाडण्यासाठी थाटण्यात आलेले संघटनरुपी दुकाने बंद होतील. आणि एक
नवीन प्रवाह या चळवळीसाठी तयार करता येईल. अभ्यासू, तरुण आणि तात्त्विक विचारांची बैठक
असणारी माणसे एकत्र करून आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. काहीच्या भावनिक
आंदोलनाला बळी पडलेला तरुण वर्गाला त्या भावनिक संमोहनातून बाहेर काढावे लागणार आहे.
आंबेडकरी चळवळीतील तरुणांची कल्पनाशक्ती आणि तार्किक बुद्धी वेठीस धरण्यात आली आहे.
त्यामुळे या तरुणांना योग्य काय आणि अयोग्य काय हे आंबेडकरी विचारांच्या आधारे तपासून
पाहताच येत नाही. त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या तरुण
वर्गाचा विश्वास संपादन करावे लागणार आहे. कधी प्रखर होऊन तर कधी सौम्य मार्गाने. कारण
यांनी स्वतः कधी बाबासाहेबाच्या विचारांचे वाचन केलेले नाही. पण कॅडर च्या माध्यमातून
ऐकलेल्या बाबासाहेबांना यांनी इतके प्रचलित केले की जणू यांच्या मुखातूनच बाबासाहेब
बोलत आहेत. हा प्रतीक्रांतीचा पहिला मजलाच आम्हाला उडवावा लागणार आहे. बाकीचे मजले
असेच धराशाही होतील.
आंबेडकरी चळवळीत आमच्या काही
जबाबदा-या आहेत. विचार आत्मसात करीत असतांना त्याची सत्यासत्यता पळताळून पाहणे.
शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्त्रोतांचे बळकटीकरण करणे. आधुनिक संसाधनांचा वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण
घेणे व देणे. सोबतच ही आधुनिक संसाधने आपल्या हातात घेता येतील असा प्रयत्न करणे. भारतीय
संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सरकारी योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचविणे.
शासकीय अनुदानाचा वापर करून समाजाचे आर्थिक सबलीकरण करता यावे यासाठी समाजाला मार्गदर्शन
करणे. वाढत चाललेली राजकीय उदासीनता घालविण्यासाठी
राजकीय प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम प्रयत्न करणे. धम्मातील वाढती प्रदूषणे आणि प्रतीक्रांतीची छुपी
आक्रमणे याच्या जाळ्यात हा समाज मोठ्या प्रमाणात अडकला आहे. त्याला त्यातून बाहेर काढून
त्यांच्यात प्रतीक्रांतीची पाऊले ओळखण्याची कुवत निर्माण करण्यासाठी आंबेडकरी विचारातील
महत्वाची आचारसंहिता समाजापर्यंत पोहोचविणे. निदान इतक्या काही गोष्टी जरी आम्हाला
प्राथमिक स्तरावर करता आल्या तर निश्चितच सद्यकालीन परिस्थिती बदलायला वेळ लागणार
नाही. म्हणून आज समाजात स्वाभिमान पेरणारी आंबेडकरी चळवळ हवी आहे. स्वबळावर व्यवस्था
उभारणी करण्यासाठी कणखर आणि प्रामाणिकपणे आंबेडकरी विचारातून बुद्ध तत्वज्ञानाला समाजात
रुजवावे लागणार आहे. "अत्त दीप भवं !" सामाजिक जीवनात अंगीकारण्याची वेळ
आली आहे. आणि त्यासाठीच आता समाजात स्वाभिमान पेरणारी आंबेडकरी चळवळ उभी करायची आहे.
हे लक्षात घ्यावे लागेल.
-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर
9226734091