#Once_Again_Ambedkar
दलित आणि
मुस्लीम समुदाय महाराष्ट्राच्या निवडणुकांमधील निर्णायक मतदार
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या पहिल्या टप्प्यातील
निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात ७ जागांवर पहिल्या टप्प्यात निवडणूक घेण्यात
आली. या ७ जागांवर मतदारांचा जो काही कल दिसून आला तो ग्रामीण भागातील कल हा जास्त
होता. त्या तुलनेत शहरातील मतदारांचा कल पाहिजे तसा निवडणूक सहभागाचा दिसला नाही.
भंडारा-गोंदिया, चिमूर-गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, वर्धा, नागपूर आणि
रामटेक या ७ लोकसभा मतदार संघात ११ एप्रिल ला मतदान घेण्यात आले. या पहिल्या
टप्प्यात शहरातील मतदानाची टक्केवारी साधारणतः ५५ ते ६० टक्के च्या आसपास राहिली.
तर त्या तुलनेत ग्रामीण भागात झालेल्या मतदानाची टक्केवारी ६५ ते ७५ टक्के च्या
आसपास राहिली. शहरातील मतदारांचा कल कुणाकडे असेल व ग्रामीण भागातील मतदारांचा कल
कुणाकडे असेल यावर या ७ मतदार संघातील निवडणुकांचा निकाल निर्धारित होईल. परंतु
येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तीन टप्प्याचे मतदान होणार आहेत. त्यातला दुसरा टप्पा
१८ एप्रिल ला, तिसरा टप्पा २३ एप्रिल ला व चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल ला होणार
आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कल पाहता आपल्याला पुढील ३ टप्प्यातील
मतदानाकडे वळावे लागणार आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.
सद्यकालीन राजकारणाने कूस बदलली आहे. राजकीय प्रचाराचे रंग बदलले आहेत.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकांना सामोरे जात असतांना ज्या गोष्टी निदर्शनात आल्यात
त्यावरून हे लक्षात येते कि दलित आणि मुस्लीम मतदार हा या निवडणुकांमध्ये महत्वाची
निर्णायक भूमिका बजावू शकतो. दलित मतदार हा ग्रामीण भागात विसावलेला आहे. शहरी
भागाच्या तुलनेत तो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. इतकेच नव्हे तर मागच्या
अनेक निवडणुकांचे विश्लेषण केले तर असेही लक्षात येते कि ग्रामीण भागातील दलित
मतदारांचे मतदानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रत्येक निवडणुकीत ९० टक्केच्या वर
मतदान करणारा हा वर्ग आहे. मग तो शहरातील दलित वर्ग असो किंवा ग्रामीण भागातील
मतदार वर्ग असो. मतदानात सक्रीय सहभाग घेणारा हा वर्ग आहे. त्यामुळे या वर्गाचा कल
ज्याच्याकडे असेल तो निवडणुकीत जिंकेल असे सूत्र कायमचे झालेले आहे. त्यासोबतच
अल्पसंख्यांक मुस्लीम समुदाय हा ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अधिक विसावलेला
आहे. या समुदायाची मतदानाची टक्केवारी ही देखील कायम ८० टक्केच्या वरची राहिलेली
आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आता झाले आहे. त्यावरून कोण जिंकेल व कोण हरणार
याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु या सर्व तर्कवितर्कात कोण जिंकेल याचा
आढावा घेतांना दलित व मुस्लीम समुदायाने कुणाच्या बाजूने मतदान केले यावरच
जिंकणाराचे गणित मांडली जात आहेत. त्याच आधारावर आज महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या
टप्प्यातील निवडणुकीत भाजप विरोधी कल दिसून येत होता. दलित व मुस्लीम समुदायात तो
कल मोठ्या प्रमाणात असणे हे नैसर्गिकच आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील दलित व
मुस्लीम समुदायाचा कल मोठ्या प्रमाणात कॉंगेस च्या बाजूने पाहायला मिळालेला आहे.
भाजप सरकार नको, मोदी सरकार नको म्हणून दलित व मुस्लीम समुदायाने मोठ्या प्रमाणात
कॉंग्रेस ला पसंती दिल्याचे चित्र पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत पाहायला मिळाले.
त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या ४१ मतदार संघात दलित व मुस्लीम समुदाय कुणाच्या
बाजूने उभा राहतो त्यावर भविष्यातील सरकारची गणिते निघू शकतील.
या सर्वात महत्वाचे आहे ते असे की, दलित आणि मुस्लीम समुदायाची घट्ट मोट
बांधून आंबेडकर आणि ओवेसी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा तिसरा पर्याय घेऊन उभे
आहेत. असे असतांनाही पहिल्या टप्प्यातील मतदानात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ-वाशीम
हे मतदार संघ वगळले तर दलित आणि मुस्लीम समुदाय वंचित बहुजन आघाडीच्या
उमेदवारांकडे पाठ फिरवून कॉंग्रेसकडे झुकलेला दिसला. वंचित बहुजन आघाडीची उर्वरित
४ मतदार संघातील उमेदवारांची निवड, उमेदवारांनी चालविलेली प्रचार यंत्रणा, इतर
पक्षांच्या कच्छपी लागून आर्थिक स्वार्थ साधून घेण्याची उमेदवारांची राहिलेली
भूमिका हे सुद्धा त्यातले एक कारण आहे असे समजता येईल. परंतु या ४ मतदार संघात
(ज्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, वर्धा) दलित आणि मुस्लीम समुदाय वंचित
बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा झालेला दिसत नाही. त्यामुळे आज या ४ ही
जागांवर निवडून येण्याची दावेदारी कॉंग्रेस करीत आहे. पूर्व विदर्भाचा हा भाग
वगळला तर उर्वरित महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची प्रचार यंत्रणा
योग्य रीतीने काम करतांना दिसून येत आहे. त्यामुळे तिथल्या युती व महाआघाडीच्या
उमेदवारांच्या ही निवडणूक जिव्हारी लागलेली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत ज्यात प्रामुख्याने अमरावती, अकोला, हिंगोली,
बुलढाणा, नांदेड, परभणी या वंचित बहुजन आघाडीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या मतदार संघात
निवडणुका होणार आहेत. या सहाही मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकून
येण्याच्या परिस्थितीत आहेत. तेव्हा या मतदार संघातील दलित आणि मुस्लीम समुदायाने
इमाने इतबारे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले तर वंचित
बहुजन आघाडीचे या मतदार संघातील उमेदवारांना कुणीही पराजित करू शकणार नाही. एक
गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीने,
आंबेडकर-ओवेसी यांच्या युतीने, दलित – मुस्लीम समुदायाच्या गठबंधनाने संपूर्ण
महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील
प्रयोगावर लागलेली आहे. दोन्ही समुदाय जे इतरांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान
नोंदवितात त्या दलित आणि मुस्लीम समुदायाची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. याच
टप्प्यातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला माळी व धनगर मतदारांची देखील मोठी साथ
असणार आहे. जी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत पाहिजे तशी भेटलेली दिसत नाही.
त्यामुळे या टप्प्यातील निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार
आहे. सोबतच महाराष्ट्राच्या पुढील राजकीय समीकरणावर प्रभाव टाकणारी असणार आहे.
त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दलित-मुस्लीम समुदाय आपल्या सोबत येणाऱ्या माळी व
धनगर समूहाला सोबत घेऊन ज्यांनी दलित व मुस्लीम समुदायाची कायम मते घेऊन सत्ता
केली ती कॉंग्रेस – राष्ट्रवादी व मागच्या २०१४ च्या निवडणुकीतील भाजपा या दोन्ही
पक्षांना धूळ चारून एका नव्या परिवर्तनाच्या युगाची सुरवात करण्याची संधी या
दोन्ही समूहाकडे असणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानात औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, सांगली, माढा, लातूर,
उस्मानाबाद, जालना या प्रमुख मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे भाजप
आणि कॉंग्रेस आघाडीला परास्त करण्यासाठी सज्ज आहेत. या मतदार संघात दलित-मुस्लीम
समुदाय हा वंचित बहुजन आघाडीसोबत राहील अशी अपेक्षा केली तर माळी आणि धनगर समूहाची
जबाबदारी या टप्प्यातील मतदानात महत्वपूर्ण असणार आहे. सोलापूर मधून खुद्द
बाळासाहेब आंबेडकर, औरंगाबाद मधून इम्तियाज जलील, सांगली मधून गोपीचंद पडळकर, माढा
मधून विजय मोरे आणि नाशिक मधून प्रशांत पवार हे प्रमुख उमेदवार असणार आहेत. या
टप्प्यातील मतदानात वंचित बहुजन आघाडीचे सर्वात अधिक उमेदवार निवडून येण्याच्या
परिस्थितीत आहेत. त्यामुळे या चौथ्या टप्प्यातील निवडणुकांचा केंद्रबिंदू हा
दलित-मुस्लीम समुदायासोबतच धनगर-माळी हा देखील असणार आहे. हे या समुदायांनी लक्षात
घेतले तर वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा
परिणाम चौथ्या टप्प्यातील निवडणुकीवर व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर निश्चित
पडणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यावरच चौथ्या टप्प्यात वंचित बहुजन
आघाडीच्या उमेदवारांना किती यश मिळणार हे निश्चित होईल. चौथ्या टप्प्यातील मतदानात
कोळी समुदायाची महत्वाची भूमिका असणार आहे. दलित-मुस्लीम, धनगर-माळी आणि कोळी हा
समुदाय चौथ्या टप्प्यात एकत्र आला तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा विजय
निश्चित आहे. त्यावरच चौथ्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना किती यश
मिळणार हे निश्चित होईल.
आज महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती अशी आहे की, मतविभाजन हा मतदारांना
संभ्रमित करणारा मुद्दा समोर केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होईल व
त्यामुळे भाजपा परत जिंकेल अशी भीती मतदारांच्या मनावर बिंबविल्या जात आहे. मुळात
हि कॉंग्रेस महाआघाडीने स्वतःच्या फायद्यासाठी अवलंबिलेली नीती आहे. दलित-मुस्लीम
समुदाय इतर पक्षाकडे झुकला जाऊ नये कारण हाच समुदाय कुठल्याही पक्षाला सत्तेची
दारे खुली करून देणारा समुदाय आहे. त्यामुळे हा समुदाय ज्याच्या पाठीशी उभा झाला
तो पक्ष सत्तेच्या खुर्चीवर बसतो हा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे
कुठलाच पक्ष या समुदायाला सोडण्याची हिम्मत करीत नाही. मुळात आपण मतविभाजनाचे तर्क
समजून घेतले पाहिजे. दलित आणि मुस्लीम समूहाने तर ते समजून घेणे अत्यावश्यकच आहे.
कारण त्याशिवाय हा समूह आपली पुढची राजकीय वाटचाल करू शकणार नाही.
खरे तर मतविभाजन हे भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्येच होत असते.
आजचे प्रस्थापित पक्ष मग ते भाजप-सेना असो किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी असो हे दलित
आणि मुस्लीम समुदायाचे नैसर्गिक पक्ष होऊ शकत नाही. परंतु राजकीय पर्यायाविना
आजपर्यंत हा समूह कॉंग्रेस सोबत जोडला गेला. मागच्या निवडणुकीत मोदीच्या फसव्या
नीतीला भाळून भाजप च्या जवळ गेला. परंतु आज ती परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली
नाही. आज वंचित बहुजन आघाडीचा सक्षम पर्याय या समूहाजवळ आहे. एक वास्तव आपण
याठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे, भाजप-सेना असो किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचा
मतदार कोण आहे तर ओबीसी मध्ये जो स्वतःला उच्चवर्णीय समजतो तो कुणबी आणि तेली समूह
व त्याच्या सोबत इथला मनुस्मृतीप्रनीत उच्चवर्णीय वर्ग हा या प्रस्थापित पक्षांचा
मतदार आहे. या सर्व मतदारांची गोळाबेरीज केली तरी एकूण मतदारांच्या ४० ते ४५ टक्के
च्या वर याची आकडेवारी जात नाही. मग या ४० ते ४५ टक्के मतदारांचे प्रतिनिधित्व
करणारे पक्ष मग भाजप-सेना असो किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी असो हे या ४० ते ४५
टक्के मतदारांचे विभाजन करून घेतात. व स्वतःच्या पदरात खूप झाले तर १० ते १५ टक्के
मतदान पाडून घेतात. परंतु या १० ते १५ टक्के मतदानावर हे पक्ष निवडून येऊ शकत
नाही. त्यामुळे दलित व मुस्लीम समुदायाला एकदुसऱ्याची भीती दाखवून आपल्याकडे
ओढण्याचा प्रयत्न करतात व याच समूहाच्या बळावर आपल्या जिंकण्याचे व सत्तेचे गणिते
बसवीत असतात. हे इथल्या दलित व मुस्लीम समुदायाने लक्षात घेतले पाहिजे.
आज महाराष्ट्रात दलित-मुस्लीम, धनगर-माळी, आदिवासी-भटका विमुक्त, कोळी-होलार
असा जवळपास ५५ ते ६० टक्के समूहात राजकीय प्रेरणा निर्माण करण्याचे काम वंचित
बहुजन आघाडीने केलेले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचे विभाजन न होता
समदु:खी समूहांच्या मतदारांचे एकत्रीकरण होत आहे. हे या समूहातील सुज्ञ मतदारांनी
समजून घ्यावे. तुमच्या मतांचे एकत्रीकरण होऊ नये व यांची सत्तेची खुर्ची सुटू नये.
यासाठी मतविभाजनाचा संभ्रमी प्रयोग प्रस्थापितांकडून कायम केला जातो हे आपण लक्षात
घ्यावे. कारण तुमच्या मतांचे एकत्रीकरण हे वंचितांना सत्तेवर बसविणारे आहे जे कि
प्रस्थापित पक्षांना कायमचे नको आहे. पुन्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की,
दलित आणि मुस्लीम समुदाय हा कॉंग्रेस – राष्ट्रवादी ला सत्तेवर बसविणारा आहे तर
धनगर-माळी हा समुदाय भाजप-सेनेला सत्तेवर बसविणारा समुदाय आहे. दोन्ही प्रस्थापित
युती-महाआघाडी कडून हा समूह जो त्यांना कायम सत्तेवर बसवितो तोच समुदाय
त्यांच्यापासून दूर गेला तर मतविभाजनाचा खरा फटका भाजप-सेना व
कॉंग्रेस-राष्ट्रवादी या प्रस्थापित पक्षांना बसेल व वंचित बहुजन आघाडी ही
देशाच्या संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. या वास्तवाकडे आपण डोळेझाक करून
चालणार नाही.
त्यामुळे आज महाराष्ट्रात दलित-मुस्लीम, आदिवासी-भटका विमुक्त,
कोळी-माळी-धनगर, या समूहाला चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. मतदारांच्या
मतविभाजनाची नव्हे तर मतदानाच्या एकत्रीकरणाची ती संधी आहे. मतदारांच्या
एकत्रीकरणातून सत्तेची दारे वंचित समूहाला खुले करून देण्याची ती संधी आहे.
मागच्या ७० वर्षात या समूहाच्या पदरी पडलेली सत्तेची निराशा कायमची दूर करून
सामाजिक सत्ताधाऱ्यांवर राजकीय सत्तेच्या माध्यमातून वंचितांची सत्ता गाजविण्याची
संधी आलेली आहे. वंचितांची सत्ता आणण्यापासून आपण फक्त २ पाऊले दूर आहोत. आज
एकदुसऱ्याच्या सहकार्याने, विश्वासाने, आपुलकीने, बंधुभावाने हा समूह हातात हात
घेऊन पुढे चालत राहिला व निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या
पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहिला तर नक्कीच वंचितांची वंचीतता संपून या देशात
संविधानिक अधिकाराने प्रस्थापित होण्याची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. फक्त
विश्वास ठेवा. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा. विभाजन नव्हे
तर या सर्व वंचित समूहाचे एकत्रीकरण करून सत्तेची दारे, खिडक्या उघडुया. व
उद्याच्या सत्तेचे सत्ताधारी बनुयात.
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप
नंदेश्वर-
8793397275