Friday, 28 December 2012

महारांचा आणि महार बटालियनचा शौर्य इतिहास




महारांचा आणि महार बटालियनचा शौर्य इतिहास
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर... ९२२६७३४०९१ 

कुठलीही तमा न बाळगता शत्रूंवर तुटून पडणारा...आपले साहस, शौर्य, प्रामाणिकपणा, धाडस आणि देशभक्तीने इतिहास गाजविणारा...युद्धकौशल्य आणि निडरता या अंगभूत गुणकौशल्याने ओतप्रोत भरलेला...स्वतःसोबत इतरांच्या सुरक्षेसाठी धडपडणारा...व्यवस्थेने उपेक्षित ठरवूनही सदैव लढवैय्या म्हणून जगलेला...चातुर्वर्ण्यांच्या विषारी अस्पृश्यतेच्या जखमा माथ्यावर कोरून समतेच्या प्रवाहाला गती देणारा...उथळ माथ्याने स्वाभिमानाने जगणारा...बाबासाहेबांच्या एका हाकेने लाचारीच्या चीरेबंदीला चिरून टाकणारा...भारतीय सैन्यात मानाचा तुरा रोवणारा...युद्धभूमीवर विजयाच्या पताका फडकाविणारा...बाबासाहेबांच्या भिमगर्जनेने विषमतेच्या विरुद्ध पेटून उठणारा...बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाच्या शांती, समता, बंधुता, प्रज्ञा, शिल, करुणेला प्राणापलीकडे जपणारा...भीमा कोरेगावच्या लढाईत ब्राम्हणशाहीचे प्रतिक पेशव्यांच्या हजारो सैनिकांचा निप्पात करणारा...१ जानेवारी १८१८ ला भीमा कोरेगाव च्या स्तंभावर जागतिक शौर्याचा इतिहास कोरणा-या महारांचा इतिहास अतिशय विलक्षण आहे. त्या महारांच्या विलक्षण शौर्य इतिहासाला शतशः नमन करणे इथल्या प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. आजही देशाची सुरक्षा करण्यात सदैव तत्पर असलेल्या त्या महार बटालियन च्या प्रत्येक शूर सैनिकाला इथला प्रत्येक देशवासीयांच्या माध्यमातून दिलेली ही सलामी...

१६ व्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमधील शौर्य व धाडस पाहून सैन्यामध्ये महत्वाच्या स्थानावर त्यांना रुजू केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून ख-या अर्थाने महार सैनिकाला ओळख प्राप्त झाली. शिवाजी महाराजांच्या सुरक्षेत, राज्य विस्तारात, राज्याच्या सुरक्षेत महार सैनिकांनी मोठी भूमिका बजावल्याचे इतिहासाच्या पानापानातून दिसून येते. शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणारा 'जीवा' महाले इतिहासात प्रसिद्ध झाला. "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण या सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देते. महार जात शूर, पराक्रमी, लढवैय्यी असतांनाही चातुर्वर्ण्यांच्या अतिशुद्र वर्गवारीत टाकण्यात आल्याने सदैव दुर्लक्षित केली गेली. परंतु याची तमा न बाळगता महारांनी सदैव आपल्यातील शौर्याच्या बळावर या देशावर अधिराज्य गाजविले आहे. शिवाजी महाराजानंतर अनेकांनी महार सैन्यांच्या बळावर युद्ध जिंकली आहेत.
१८ व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने महारांमधील या पराक्रमाला लक्षात घेऊन सर्वप्रथम बॉम्बे रेजिमेंट महार बटालियन ची स्थापना करण्यात आली. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ ला पहिल्या महार रेजिमेंट च्या द्वितीय बटालियनच्या ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २० हजार घोड्स्वार आणि ८ हजार पायदळी सैनिकांना निकराची झुंज देऊन पेशवाईचा निप्पात केला. ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांच्या सैनिकांना नामोहरण करून आपल्या एकमेवाद्वितीय शौर्याचा इतिहास रचला. त्या इतिहासाची साक्ष आजही भीमा कोरेगाव चा विजय स्तंभ देतो आहे. तो विजय स्तंभ हा महारांच्या शौर्याचा प्रतिक आहे. आजही आंबेडकरी समाजाला तो विजय स्तंभ आपल्या पूर्वजांच्या शौर्य इतिहासाची जाणीव देऊन देशभक्तीसाठी प्रवृत्त करतो आहे.
 १८५८ च्या युद्धात २१ वी आणि २७ वी महार रेजिमेंट ची तुकडी प्राणपणाने लढली. १८९२ पर्यंत ब्रिटीश भारतात सैन्यामध्ये महार बटालियन आपले वेगळे महत्व टिकवून होती. परंतु १८९२ ला महार बटालियन संपुष्टात आणून सैन्य भरतीत नवीन धोरण ब्रिटीश सरकारने अंगिकारले. 'क्लास रेजिमेंट' नावाने सैन्यामध्ये नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात आली. प्राचीन महार रेजिमेंट च्या ऐवजी 'क्लास रेजिमेंट' ची १८८२ ला झालेली भरतीने महार सैन्यांना बेदखल करण्यात आले. १८८५ मध्ये तत्कलीन भारतीय सैन्याचे कमांडर-इन-चीफ जनरल लॉर्ड रॉबर्ट यांनी "मार्शल रेस' नावाची थेरी अंगीकारली. व त्या माध्यमातून भारतीय समाजातील जन्मजात आणि नैसर्गिक युद्ध कौशल्य असणा-या जाती जमातीच्या लोकांना सैन्यामध्ये भारती करण्यात आले. ज्यामुळे शेकडो वर्षे आपल्या साहस आणि धाडसाचे कौशल्य पणाला लावून सैन्याची धुरा वाहून नेली त्या महार बटालियन ला ब्रिटीश सैन्यातून बेदखल करण्यात आले. ज्यामुळे महार बटालियन च्या सैन्यात आणि महार समाजात ब्रिटीश सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला होता.
महार बटालियन बरखास्त करण्यात आल्यानंतर १८९४ मध्ये गोपाल बाबा वलंगकर यांनी ब्रिटीश सरकारला निवेदन केले. आणि त्या निवेदनात महार बटालियन ची पुन्हा निर्मिती करून महार सैनिकांना सैन्यात भरती करण्यात यावी अशी विनंती केली. १९०४ मध्ये शिवराम जानबा कांबळे यांनीसुद्धा महार बटालियन च्या पुर्नगठनासाठी ब्रिटीश सरकारला विनंती केली. आणि ब्रिटीश सरकारने अंगिकारलेल्या तत्कालीन सैन्य भरती धोरणाचा विरोध केला. ज्या महार बटालियनच्या महार सैन्यांनी इतिहासात आपल्या शौर्याचे आणि पराक्रमाचे पुरावे दिले त्याच महार बटालियनला बरखास्त करण्याचे सरकारचे धोरण एक न उलगडणारे कोडेच होते. कदाचित महार बटालियन बरखास्त करावी यासाठी बाह्य परिस्थितीचा दबाव आणला गेला असावा याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने महारांना अतिशुद्रचा दर्जा देऊन समाजव्यवस्थेतून बेदखल केले होते. त्याच महार समाजाने सैन्यामध्ये येउन पराक्रमाचे अनेक विक्रम गाजविणे म्हणजे चातुर्वर्णनाने स्वतःच्या बाजूला गोंजारत ठेवलेल्या क्षत्रियांचा आणि संपूर्णच जातिव्यवस्थेचा इतिहास अमान्य ठरविणे असेच होते. त्यामुळे महार बटालियन च्या बरखास्तीचा खरा इतिहास दडवून ठेवला गेल्याची पूर्ण शक्यता नाकारता येत नाही.
महार बटालियनच्या पराक्रमाची आणि शौर्याची उणीव ब्रिटीश सैन्याला जाणवणार हे सिद्धच होते. महार बटालियन सैन्यापासून फार काळ लांब ठेवता येणार नाही अशीच परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली. पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याची जी दारूण परिस्थिती उद्भवली हे लक्षात घेता पहिल्या महायुद्धाच्या परिस्थितीने ब्रिटीश सरकारला महार बटालियन सैन्यात पुन्हा निर्माण करणे भाग पडले. १९१७ ला पुन्हा १११ सैनिकांची महार बटालियनच्या सैन्यात भरती करण्यात आली. १९२० ला महार बटालियन ७१ व्या पंजाब रेजिमेंट मध्ये सामावून घेण्यात आली. व पुन्हा १९२१ ला महार बटालियन बरखास्त करण्यात आली. १८१८ च्या आधीचा एक काळ असा होता की ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या बाम्बे आर्मीमध्ये १/६ सदस्य हे महार बटालियनचे होते. परंतु १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात महार बटालियनच्या संदर्भाने ब्रिटीश सरकारने वेळोवेळी घेतलेले निर्णय हे शंकेस पात्र ठरतात. कदाचित पडद्यामागील इतिहास लपवून ठेवण्यात आल्याने भारतातील प्रस्थापित जातीव्यवस्थेचे शिकार महार बटालियनला करण्यात आले असावे. अशी शंका घेण्यास वाव मिळतो. कदाचित महार बटालियनचा इतिहास दडवून ठेवण्यात आले हा सुद्धा एका षडयंत्राचाच भाग असावा. भीमा कोरेगाव चे स्तंभ विजयस्तंभ म्हणून ब्रिटिशांनी उभारले नसते तर महार बटालियन चा आज उपलब्ध असलेला इतिहासही पडद्याआड गेला असता हे तेवढेच सत्य वाटते.
जुलै १९४१ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्सिक्युव कॉन्सिलच्या डिफेन्स अड्व्हाय्झरी कमिटी वर नियुक्ती करण्यात आली. या पदाचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षापासून सैन्यातून बरखास्त करण्यात आलेली महार बटालियन / रेजिमेंट सैन्यात पुन्हा स्थापन करण्यात यावी यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नांना यश आले. १ आक्टोम्बर १९४१ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल जोह्नसन यांच्या १३ व्या Frontier Force Rifles च्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियन ची स्थापना बेळगाव, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली. तसेच महार बटालियन ची दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टीनंट जनरल कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी, नागपूर येथे स्थापन करण्यात आली. त्यावेळेस महार रेजिमेंट च्या टोपीवरील बिल्ल्यावर भीमा कोरेगाव चे पिल्लर असणारे चिन्ह व त्यावर "World Mahar" कोरण्यात आले. हे चिन्ह दुस-या महार बटालियनचे कॅप्टन मोर्टलेमांस यांनी तयार केले होते. जे प्रत्येक महार बटालियनच्या सैनिकांच्या डोक्यावर पराक्रमी विजय चिन्ह म्हणून शोभून दिसत होते.
तिसरी महार रेजिमेंट बटालियन बेळगाव, कर्नाटक येथेच १९४२ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल कम्बिएर आणि मेजर सरदार बहादूर लाडकोजीराव भोसले यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली. द्वितीय महायुद्धाच्या वेळी पहिली व तिसरी महार रेजिमेंट North-West Frontier Province च्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली. तर दुसरी आणि २५ वी बटालियन देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. द्वितीय महायुद्धाच्या काळात महार बटालियन बर्मा campaign मध्ये ब्रिटीशांच्या बाजूने प्राणपणाने लढली. जी मोहीम अतिशय धोकादायक आणि शौर्य पणाला लावून लढायची होती त्या मोहिमेत महार बटालियन चा वापर केला गेला. यावरून सैन्यातील महार बटालियन चे महत्व लक्षात घेण्यासारखे आहे. या मोहिमेत ५ महार बटालियनचे सैनिक शहीद झाले. व त्याच बटालियन च्या एका ऑफिसर ला त्याच्या शौर्यासाठी गौरविण्यात सुद्धा आले होते.
१ ऑक्टोबर १९४६ ला महार रेजिमेंट मशीनगन रेजिमेंट म्हणून नावारूपास आली. 'महार रेजिमेंट' चे 'महार मशीनगन रेजिमेंट' असे नवीन नाव देण्यात आले. 'महार मशीनगन रेजिमेंट' चे केंद्र कामठी, नागपूर येथेच स्थापन करण्यात आले. मात्र यावेळी 'महार रेजिमेंट' च्या टोपीवरील बिल्ल्यावरील चिन्हात बदल करण्यात आले. बदललेल्या चिन्हात भीमा कोरेगावच्या स्तंभावर Cross Wicker मशीनगन चे चिन्ह कोरण्यात आले.  'महार मशीनगन रेजिमेंट'च्या ३ बटालियननी पंजाब च्या सीमावर्ती प्रदेशात पंजाब सीमा सैनिक दलात काम केले. १९४७ ला भारताच्या फाळणीच्या वेळी संरक्षण शरणार्थी म्हणूनही  'महार मशीनगन रेजिमेंट' बटालियनने काम केले. पंजाब प्रांतात सीमा सुरक्षा दल म्हणून काम करतांना 'महार मशीनगन रेजिमेंट' ने आपले शौर्य पणाला लावून हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक गावांना सुरक्षा प्रदान केली होती. महार रेजिमेंट / बटालियन पासून तर  'महार मशीनगन रेजिमेंट' पर्यंतचा हा प्रवास अनेक शौर्य इतिहासांना प्रस्थापित करून गेला. परंतु त्याची नोंद भारतीय जातीय मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या इतिहासाने कधी घेतली नाही हेच दिसून येते.
महार बटालियन मधील १, २, ३, ७, ८ आणि १३ या बटालियन या पूर्णपणे महार बटालियन होत्या. ज्यात प्रामुख्याने महार सैनिकांचा समावेश होता. ४, ५ आणि ६ या तीन बटालियन तुकड्यांनी सीमा सुरक्षा दल म्हणून काम केले. ज्या तीन तुकड्या पंजाब प्रांतात सीमावर्ती प्रदेशात तैनात करण्यात आल्या होत्या. महार बटालियन च्या १६ व्या तुकडीला ८ व्या पराशुट बटालियन मध्ये बदलण्यात आले होते. व १९८१ ला हीच बटालियन यांत्रिक पायदळाच्या १२ व्या तुकडीत समाविष्ट करण्यात आली. महार बटालियन चे शौर्य सैन्याच्या प्रत्येक विभागात आपे पराक्रम गाजवून गेले. ज्यामुळे महार बटालियन ला ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यातच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या सैनिक दलामध्येसुद्धा मानाने-सन्मानाने गौरविण्यात आले. आजही भारतीय सैन्यात महार बटालियनचे नाव सन्मानाने घेतले जाते. शूरवीर आणि लढवैय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्मान पातळीवर नेउन पोहचविले. जाज्वल्य देशभक्ती आणि देशाचे संरक्षण यात महार बटालियन सदैव अग्रेसर राहिलेली आहे. महार समाजात जन्म घेणा-या प्रत्येक माणसाला त्यांच्या पूर्वजांनी गाजविलेल्या इतिहासाचा गर्व आहे. आणि तो असायलाच पाहिजे. अश्या शूर, पराक्रमी आणि लढवैय्या पूर्वजांचे वारस म्हणून महार समाजाने अभिमान बाळगला तर त्यात काहीही गैर ठरणारे नाही.
महार बटालियनने स्वातंत्र्यपूर्व काळातच आपले शौर्य गाजविलेले नसून स्वतंत्र भारतातही महार बटालियनच्या शौर्याचा इतिहास दिसून येतो. महार सैन्यांनी आणि महार बटालियनने कांगो आणि सोमालियाच्या मोहिमेमध्ये सुद्धा पराक्रम गाजविलेले आहेत. इतकेच नव्हे तर पोलो, पवन, मेघदूत आणि विजय या मोहिमेवरही महार सैन्याचे व महार बटालियनचे मोठे योगदान राहिलेले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास असमर्थता दर्शविली होती. जी अखंड भारताच्या दृष्टीने आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होती. त्यात हैद्राबाद येथील संस्थानाचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळेस सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थानाचे निजाम / प्रमुख उस्मान अली खान आणि आसिफ झा VII यांच्या विरोधात Hydrabad Police-Military Operation भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आले होते. ज्या मोहिमेचे Code नाव 'POLO' असे ठेवण्यात आले होते. या पोलो मोहिमेमध्ये सुद्धा महार सैनिकांनी आणि महार बटालियननी पराक्रम दाखविल्याचा इतिहास आहे.
१९८७ ला दक्षिण भारतात LTTE लिट्टे या संघटनेविरुद्ध भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या "Operation पवन" या मोहिमेत महार बटालियन ने महत्वाची भूमिका बजावली होती. १३ एप्रिल १९८४ ला काश्मीर मधील सियाचीन संघर्षात भारत सरकारने राबविलेल्या 'Operation मेघदूत' या मोहिमेतही महार बटालियन आणि महार सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि सरतेशेवटी १९९९ ला झालेल्या भारत पाकीस्थान यांच्यातील कारगील युद्धामध्येसुद्धा महार बटालियन पराक्रम गाजवून गेली आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतरही देशाच्या संरक्षणासाठी महार बटालियन आणि महार सैनिक सदैव समोर राहिलेले दिसून येतात. अतिशय अल्प पुराव्यांच्या आधारावर मिळालेला हा महार बटालियन आणि महार सैनिकांच्या योगदानाचा इतिहास इतका जाज्वल्य आहे की प्रत्येक भारतीयात महार सैनिकात असलेले धाडस आणि साहस निर्माण झाले. तर या देशावर आक्रमण करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. इतकेच काय तर देशांतर्गत चालना-या आतंकवादी कारवाया संपुष्टात आणता येईल. गरज आहे ती महार बटालियन च्या सैन्याकडून प्रेरणा घेण्याची...
असे म्हटले जाते की अंगभूत नैसर्गिक गुण हे त्या व्यक्तीला, समाजाला त्यांच्या पूर्वजांकडून लाभलेले असते. इथल्या महारांना आणि महार समाजाला त्यांच्या पराक्रमी आणि साहसी पूर्वजांचे नैसर्गिक गुण लाभलेले आहेत. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या रूपाने त्याचे प्रात्यक्षिक या देशाने अनुभवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरही वेळोवेळी देशहीतासाठी या समाजाने घेतलेली भूमिका हे त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाला पुनरुज्जीवित करणारी ठरली आहे. परंतु पूर्वजांच्या शौर्य आणि पराक्रमी इतिहासाचे जप करीत बसण्यापेक्षा त्या इतिहासाला भविष्यकाळात टिकवून ठेवण्याची जबाबदारी इथल्या महारांची किंवा धर्मांतरित झालेल्या आधुनिक बौद्ध समाजाची आहे. इथल्या प्रतीक्रांतीवाद्यांना महारांच्या इतिहासाला पुसू न देता तो इतिहास जिवंत ठेऊन पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याची जबाबदारी येणाऱ्या पिढ्यांची असणार आहे. हे लक्षात असू द्या... तेव्हाच या समाजाला आपल्या पूर्वजांच्या पावलांवर पाऊल ठेवून नव इतिहासाची निर्मिती करता येईल...  

**************************
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर... ९२२६७३४०९१ 

Wednesday, 28 November 2012

सूर्यमालिकेतील निखळ तारा सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर




सूर्यमालिकेतील निखळ तारा सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर
....डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१
*************

दिनांक १२-१२-१९१२ ला बाबासाहेब नावाच्या महासुर्य आणि रमाई नावाच्या त्यागमुर्तीच्या पोटी जन्माला आलेले भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर...बाबासाहेबांच्या अपेक्ष्यांच्या भाराने दबून राहिलेले...परीस्थितीतीने दिलेल्या चटक्यांनी जीवघेण्या आजाराशी अहोरात्र लढणारे...बापाचे महापुरुषत्व पेलतांना स्वतःमधल्या सामान्यत्वाला बळी पडलेले...बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर स्वतःसोबत संपूर्ण परिवाराला समाजासाठी, धम्मकार्यासाठी  झोकून देणारे...पण सदैव समाजातून दुर्लक्षित झालेले...त्यागाचा बळी ठरलेले...महापुरुषाचा वारसा लाभला असतांना उपेक्षिताचे जीवन जगणारे...समाजाच्या रोषाचे बळी ठरलेले भैय्यासाहेब आंबेडकर सूर्यमालिकेत चमकूनही काळाच्या पडद्याआड लुप्त झालेला निखळ तारा म्हणून फार कमी लोकांनी ओळखला...त्यांचा जन्मशताब्दी वर्ष १२-१२-२०१२ भारतीय बौद्ध महासभा ( दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ) च्या वतीने साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने भैय्यासाहेबांच्या जीवनाला, त्यांच्या कर्तुत्वाला, नेतृत्वाला आणि व्यक्तिमत्वाला समर्पित केलेली ही आदरांजली...

महापुरुषाच्या पोटी जन्म घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचा प्रत्यय भैय्यासाहेब आंबेडकरांना निश्चितच आला होता. नव्हे संपूर्ण आयुष्यात ते ओझे घेऊन जगावे लागले असावे. जगाने ज्या महानावाच्या क्रांतीचा, विचारांचा आणि बुद्धीचा गौरव केला तो महामानव व्यक्तिमत्वाच्या पडताळणीचा आधार बनत असेल. अश्या परिस्थितीत स्वतंत्र व्यक्तिमत्व कसे उभारायचे. याचे दडपण निश्चितच भैय्यासाहेबांना होते. मोठ्या वृक्षाखाली पालव्या कोमेजून जातात तशीच परिस्थिती भैय्यासाहेबांवर ओढवली असेल. हे समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून किती दडपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला. याचा विचार करून भैय्यासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितले गेले नाही. हीच खरी शोकांतिका ठरली. याच गृहीतकांवर आधारित भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू सापडू शकतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तीमत्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडतांना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. निश्चितच बाबासाहेबांना आपल्या मुलाकडूनही काही अपेक्षा होत्या. त्या लादलेल्या नसल्या तरी व्यावहारिकतेच्या परिपेक्षात परीस्थितीतीय बदलाच्या होत्या. या अपेक्षांच्या दडपणामुळे बाबासाहेबांच्या तापटपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला असेल हे निश्चितच. त्यामुळे भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर त्याचाही प्रभाव जाणवायचा. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. परंतु काही समाजकंठकांनी त्यांच्या या आजाराचे भांडवल करून भैय्यासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांनी बाबासाहेबांच्या परिवाराची केलेली ही प्रताडना आहे. बाबासाहेबांनी या समाजासाठी आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची परतफेड अश्याप्रकारे बाबासाहेबांच्या परिवाराची (मुलाची) प्रताडना करून जर आम्ही करीत असू तर आम्हाला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार राहतो का ? 

हजारो शोषित-पिडीत-मागास वर्गाच्या उत्थानासाठी जगतांना बाबासाहेबांनी कधी मुलांच्या आजाराकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी समाजासाठी दिलेल्या या बलिदानाचे बळी त्यांची इतर मुलेही ठरली. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे एकमेव वारस होते जे जगले. हे दडपण पेलून धरतांना भैय्यासाहेबांनी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण केले. कदाचित ते असामान्य नसेलही परंतु शांत, चिंतनशील, सहनशील, वैचारिक असे गुणवैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तीमत्वात निश्चितच होते. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडतांना त्यांच्या शांत व्यक्तिमत्वाचा निश्चितच लाभ झाला. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेचा त्यांच्या कार्यकाळात अनेक राज्यांमध्ये व्याप वाढू लागला.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून अनेकांनी बाबासाहेबांचे भांडवल केलेले आहे. बाबासाहेबांचे भांडवल करून अनेकांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला आहे. बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून लोकसभा, राज्यसभा सदस्य ते मुख्यमंत्री पदापर्यंत काहींनी मजल मारली आहे. अश्या सर्व परिस्थितीत भैय्यासाहेब आंबेडकर हे तर बाबासाहेबांचे एकमेव वारस होते. त्यांनी म्हटले असते तर ही सर्व पदे सर्वात आधी त्यांच्याकडे धावून आली असती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगप्रसिद्ध महामानवाचा वारस म्हणून भैय्यासाहेबांना पाहिजे ते यश सहज मिळविता आले असते. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे भांडवल करून त्यांना व्यक्तिगत स्वार्थ साधता आला असता. परंतु त्यांनी याचा साधा गर्व सुद्धा कधी बाळगला नाही. ज्या काळात बाबासाहेब करोडो माणसांचे हृदयसम्राट होते. त्या काळात त्यांचे वारस भैय्यासाहेब हे अतिशय सामान्य जीवन जगले. यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या महानतेची दुसरी पावती देण्याची गरज भासत नाही.

राजकीय स्वार्थ, राजकीय पद, सत्ता या सर्वाचा त्याग करण्याची प्रवृत्ती आजपर्यंत कुणामध्ये दिसून आली नाही. संधी मिळाली तर प्रत्येकच माणूस यासाठी नको ते प्रकार / नको तो व्यवहार / नको ती पातळी गाठायला तयार असतो. परंतु बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर भैय्यासाहेब आंबेडकरांनी यासाठी कधी हट्ट धरला नाही. किंवा कुठलेही पद घेतले नाही. बाबासाहेबांचा राजकीय वारस म्हणून स्वतःला कधी समोर केले नाही. सदैव इतरांना पुढे करून त्यांना समर्थन देऊन स्वतः मात्र आयुष्यभर धम्माचे काम करीत राहिले. धम्म कार्यात स्वतःला वाहून घेतले. आजच्या आधुनिक पिढीला आणि जे स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेतात त्यांच्यासाठी भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व आदर्श ठरावे असेच होते.

स्वातंत्र्याच्या उद्घोषात मिळालेले राजकीय स्वातंत्र्य व राजकीय पदे भूषविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणा-यांच्या पिढीत भैय्यासाहेब धम्मासाठी काम करतात.  आणि राजकीय भूमिका घेण्याची जबाबदारी दादासाहेब गायकवाडांसारख्या माणसांवर सोडून देतात. यापेक्षा मोठा त्याग बाबासाहेबानंतर या समाजात इतर कुठल्याही नेत्याने केलेला नाही. बाबासाहेबांनी पाहिलेले भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्यासाठी धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भैय्यासाहेबांनी स्वतःला झोकून दिले. त्याचाच परिणाम आहे कि आज भारतीय बौद्ध महासभा देशातल्या २२ राज्यांमध्ये अस्तित्व टिकवून आहे.

भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला. धम्मकार्य केले तरीही काहींनी त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेला अपेक्षित यश मिळविता आले नसले, तरी जे काही आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली आहे. ती भैय्यासाहेबांनी केलेल्या प्रयत्नांचाच परिपाक आहे. हे निश्चितच म्हणावे लागेल. समाज भैय्यासाहेबांना बदनाम करणा-यांना बळी पडला. आणि त्यामुळे भैय्यासाहेबांना धम्मकार्यात अपेक्षित सहकार्य केले गेले नाही. तरीही भैय्यासाहेबांनी धम्माचा किल्ला एकहाती लढला. कुठल्याही स्वार्थाविना. भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांना दिलेली हि खरी आदरांजलीच होती. बाबासाहेबांनी समाजासाठी केलेल्या पारिवारिक त्यागाचा वारसा भैय्यासाहेबांनी जिवंत ठेवला. हे मोठे ऋण बौद्ध व आंबेडकरी समाजाला फेडता येणे शक्य नाही.

भैय्यासाहेब दादासाहेब गायकवाडांच्या खांद्याला खांदा लावून सदैव त्यांच्या पाठीशी राहिले. १९६२ ला भैय्यासाहेबांचा ५० वा वाढदिवस साजरा केला गेला होता. तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ दादासाहेब गायकवाडांनी काढलेले गौरवोद्गार अतिशय बोलके आहे. दादासाहेब गायकवाड म्हणाले होते, " भैय्यासाहेब माझ्यासारख्या आंधळ्यांची काठी आहेत ". डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्व लाभलेले भैय्यासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले. चळवळीत इतरांना सहकार्य केले. चळवळीला दिशा देण्याचे काम केले. पण कधीही स्वतःचे नेतृत्व समाजावर लादले नाही. नेतृत्व संघर्षापासून सदैव स्वतःला अलिप्त ठेवले. आधुनिक काळात नेतृत्व स्पर्धेत उतरलेल्या नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे.

तत्कालीन समाजात भैय्यासाहेबांना सन्मान होता. याचा प्रत्यय दलित पँथर च्या काळात मुंबईतील एका महारवाड्यात आला होता. त्या ठिकाणी कुठल्याही आंबेडकरी नेत्यांना येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. दलित पँथरच्या नेत्यांनाही मज्जाव करण्यात आला होता. संपूर्ण समाज अन्याय व दहशतीत जगत होता. अश्या परिस्थितीत फक्त भैय्यासाहेब आंबेडकरांनी त्या इलाख्यात जाण्याची तयारी दर्शविली. अनेकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तरीही भैय्यासाहेब आपल्या निर्णयावर खंबीर राहून त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या ठिकाणी आंबेडकरी नेत्यांना आणि दलित पँथरच्या नेत्यांना मज्जाव केला गेला होता. त्या ठिकाणी भैय्यासाहेबांना विरोध करण्यासाठी कुणीही समोर आले नाही. हा संदर्भ ज. वि. पवार यांनी लिहिलेल्या आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ खंड - ४ यात सापडतो.  यावरून भैय्यासाहेबांचे खंबीर व्यक्तिमत्व आणि परिस्थितीला हाताळून नेण्याचे मनोधैर्य या त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुणांचेही दर्शन होते.

सदैव सामान्य माणसाचे जीवन जगणारे भैय्यासाहेब शेवटपर्यंत सामान्य माणूस म्हणूनच जगले. भैय्यासाहेब अहंकारशून्य, गर्व नसलेले, मदतीला धावून जाणारे, चळवळीत काम करणा-यांचे मनोधैर्य वाढविणारे होते. धम्मकार्यात मग्न असणारे भैय्यासाहेब बाबासाहेबांनी दिलेल्या वारस्यात नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या संदेश वहनातच संदेशवाहक म्हणून जगले. धम्माचे प्रचारक म्हणून जगले. त्यांच्या हयातीतच अनेकांनी त्यांच्या विषयी समाजात पेरून ठेवलेले बदनामीचे विष पचवून ते जगले. कधीही त्यांनी कुणावर टीका केली असेल असे ऐकिवात नाही. आपल्या शत्रूंनाही त्यांनी आपल्या धम्मकार्यातून चोख प्रत्युत्तर दिले. त्यांच्यावर होणा-या टीकेकडे दुर्लक्ष करून धम्माचा प्रचार व प्रसार केला. व्यक्तिमत्वाचा प्रचारकी व बडेजाव आणणारा थाट त्यांनी कधी बाळगला नाही. त्यांच्या टीकाकारांना त्यांनी कधीही उत्तरे देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांचे टीकाकारही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे चाहते व्हावे. असेच व्यक्तिमत्व घेऊन भैय्यासाहेब जगले.

बाबासाहेबांच्या पश्चात बाबासाहेबांच्या परिवाराकडे ज्या समाजासाठी बाबासाहेबांनी आपले सर्वस्व अर्पण केले, त्याच समाजाने दुर्लक्ष केले. कुठल्या न कुठल्या प्रकारे बाबासाहेबांच्या परिवाराला बदनाम करण्यातच काहींनी आपले आयुष्य घालविले. भैय्यासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न विविध पातळ्यांवर झाला. खास करून १९८० नंतर बीएसपी आणि बामसेफ सारख्या संघटनांनी तर बाबासाहेबांच्या परिवाराला आणि त्या परिवारातील प्रत्येक सदस्याने या समाजाला दिलेल्या योगदानाला झाकून टाकण्यासाठी प्रतीक्रांतीवादी शक्तींशी हातमिळवणी करून बदनामी केली. त्यामुळे समाजातल्या सर्वसामान्य माणसांना बाबासाहेबानंतर त्यांच्या परिवाराने या समाजाला दिलेल्या योगदानाची माहितीच मिळू शकली नाही. आणि ज्यांनी या परिवाराला बदनाम केले त्यांनी मात्र प्रतीक्रांतीवादी शक्तींशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री ते राज्यपाल पदापर्यंत मजल मारली.

भैय्यासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबानंतरचे एकमेव नेते होते, जे समाजासाठी व धम्मकार्यासाठी जगले. ज्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच बघितला नाही. राजकीय लालसा कधी बाळगली नाही. सत्तेच्या मोहजाळातून अलिप्त राहिले. टीकाकारांना उत्तरे न देता शांत राहून अप्रत्यक्ष उत्तरे देत राहिले. कुणाच्याही विरुद्ध भूमिका न घेता, कुणावर टीका करीत न बसता भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माची जबाबदारी पार पाडत राहिले. भैय्यासाहेबांनी स्वतःसोबत मीराताई आंबेडकरांनाही धम्मकार्यात वाहून घेतले. इतकेच नाही तर भैय्यासाहेबांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्काराचाच परिणाम म्हणून आजही त्यांची मुले बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकर स्वतःच्या कर्तुत्वाने या समाजात स्वतःचे स्थान निर्माण करीत आहेत. पण कधीही त्यांनी बाबासाहेबांचे वारस म्हणून संपूर्ण समाजाचे आम्हीच नेते असा आव आणला नाही. हा भैय्यासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्काराचाच परिणाम म्हणावा लागेल. भैय्यासाहेबांचे या समाजासाठी, आंबेडकरी चळवळीसाठी त्यागाचे हे प्रतिक आहे.

आधुनिक पिढीला, आधुनिक आंबेडकरी चळवळीत काम करणा-या कार्यकर्त्यांना, समाजाची धुरा पेलून धरण्याची इच्छा असलेल्या समाज सुधारकांना, राजकीय नेतृत्व मिळविण्याची घाई झालेल्या नेत्यांना, आंबेडकरी चळवळीचे ऋण फेडू पाहणा-या अनुयायांना, आंबेडकरी समाजाला आणि या जगात बौद्ध म्हणवून घेणा-या प्रत्येकच माणसाला भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या त्यागाचा, व्यक्तिमत्वाचा व त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा लागेल. आंबेडकरी चळवळ राजकीय स्वार्थाने सत्तालोलुप बंधनात अडकली असतांना भैय्यासाहेबांचा आदर्श समाजासमोर निर्माण करणे आज काळाची गरज आहे. नव्हे ती आंबेडकरी चळवळीचीच गरज आहे.

भैय्यासाहेबांसारखे नेतृत्व पुन्हा या चळवळीला लाभणार नाही. भैय्यासाहेब हे या चळवळीसाठी आदर्श म्हणून जगले होते. आणि यानंतरच्या पिढीसाठीही आदर्श राहतील. बदनामीचे कितीही मोठे वादळ भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वाभोवती उभे केले गेले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची ते कमी करू शकणार नाही. आमच्यासारखे आंबेडकरी चळवळीचा निस्वार्थ व डोळस अभ्यास करणारे कार्यकर्ते सदैव भैय्यासाहेबांचे ऋणी राहतील. व त्यांच्या व्यक्तिमत्वातील उंचीला ढासळू देणार नाही. आंबेडकरी चळवळीत डॉ. बाबासाहेबांच्या पोटी जन्मलेल्या सुर्यपुत्राचा, धीरगंभीर व्यक्तिमत्वाचा, प्रत्यक्ष त्यागमूर्तीचा, आदर्श अश्या सामान्य कार्यकर्त्याचा, आदर्श धम्म संदेशवाहकाचा हा समाज, ही चळवळ सदैव ऋणी राहील. आज १२-१२-२०१२ ला भैय्यासाहेब नावाच्या त्यागमूर्तीच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचा आदर्श समाजाने घेतला तर ख-या अर्थाने ती त्यांच्या कार्याला, व्यक्तिमत्वाला अर्पण केलेली आदरांजली ठरेल.

भैय्यासाहेब...
तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यागाचा वारसा लाभलेली 
"लोखंडाचे चणे चावणारी आंबेडकरी चळवळ" उभारायला आम्ही निघालो आहोत.
भैय्यासाहेब...
फेकलेल्या तुकड्यातून उभारलेल्या राजकीय महालाचा निरोप घेऊन
आम्ही निघालो आहोत विजयस्तंभाच्या शिळेवर माथा टेकून
प्रतीक्रांतीवाद्यांचा बुरुज उध्वस्त करायला.
भैय्यासाहेब...
धम्म प्रचार आणि प्रसाराचा तुम्ही घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेऊन 
धम्माच्या रोपट्याचा बोधिवृक्ष करायचा भारतीय बौद्ध महासभा निर्धार करीत आहे.
भैय्यासाहेब...
आता तुमचा प्रत्येक शिलेदार  इथे उभा झाला आहे 
रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय आणि उद्दिष्टांची पूर्ती करणे
हा एकमेव जाहीरनामा घेऊन...

....डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१

********************

भैय्यासाहेब...


सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांचा येत्या १२ - १२ - २०१२ ला जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या क्रांतीकार्याला समर्पित या दोन ओळी...
 

भैय्यासाहेब...
भैय्यासाहेब...
 तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यागाचा वारसा लाभलेली
"लोखंडाचे चणे चावणारी आंबेडकरी चळवळ" उभारायला आम्ही निघालो आहोत.
भैय्यासाहेब...
फेकलेल्या तुकड्यातून उभारलेल्या राजकीय महालाचा निरोप घेऊन
आम्ही निघालो आहोत विजयस्तंभाच्या शिळेवर माथा टेकून
प्रतीक्रांतीवाद्यांचा बुरुज उध्वस्त करायला.
भैय्यासाहेब...
धम्म प्रचार आणि प्रसाराचा तुम्ही घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेऊन
धम्माच्या रोपट्याचा बोधिवृक्ष करायचा भारतीय बौद्ध महासभा निर्धार करीत आहे.
भैय्यासाहेब...
आता तुमचा प्रत्येक शिलेदार  इथे उभा झाला आहे
रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय आणि उद्दिष्टांची पूर्ती करणे
हा एकमेव जाहीरनामा घेऊन...

....डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१

Monday, 29 October 2012

डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची कायदेशीर चौकशी करण्यात यावी.




-:  प्रेसनोट  :-
डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची कायदेशीर चौकशी करण्यात यावी.

मा. संपादक
दै..........................
नागपूर.

विषय :- नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध

महोदय,
          दि. २५ ऑक्टोंबर २०१२ रोजी नागपूर येथे डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषण खंडाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन समारंभात डॉ. नरेंद्र जाधव यांनी "महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आंबेडकर साहित्य सुमार दर्जाचे आहे. पोत्यात कांदे बटाटे भरावे तसे साहित्य या खंडात भरण्यात आले आहे." असे वक्तव्य केले आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या या वक्तव्याचा 'भारतीय बौद्ध महासभा' नागपूर जिल्हा शाखेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

            डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे महत्व वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या विश्वसनीय  आंबेडकरी साहित्यावर ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विखुरलेले साहित्य पुस्तक रुपात समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती. आजपर्यंत या समितीने प्रकाशित केलेल्या साहित्याला विश्वसनीय आंबेडकरी साहित्य म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. खंड २२ वगळता समितीने प्रकाशित केलेल्या साहित्याचा दर्जा विश्वसनीय असतांना डॉ. नरेंद्र जाधव त्यावर आक्षेप घेण्यामागे नक्कीच काहीतरी षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

          आंबेडकरी साहित्याला कांदे-बटाटे असे विशेषण लावून डॉ. नरेंद्र जाधव यांनी आंबेडकरी साहित्याचा, विचारांचा आणि बाबासाहेबांचाही अपमान केला आहे. लेखन व भाषण खंडातील साहित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकांतून, हस्तलीखीतातून आणि मासिक-वर्तमानपत्रातून घेतले असतांना त्या साहित्याची विश्वसनीयता कमी करून स्वतःचे महत्व वाढविण्याचा अश्लाघ्य प्रकार नरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून केला जात आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत.

          डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांनी साहित्यिक सरमिसळ केल्याची शक्यता यामुळे बळावत चालली आहे. जनतेच्या लक्षात ते येऊ नये. आणि लेखन व भाषण खंडाच्या आधारे त्यांच्यावर टीका होऊ नये. म्हणून त्यांनी सरळ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या साहित्यावर टीका केली असे दिसून येते. अन्यथा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या साहित्याचा टीकात्मक उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते. डॉ. नरेंद्र जाधव यांनी संपादित केलेल्या पुस्तकात बाबासाहेबांची अनेक भाषणे लेखन व भाषण खंडातूनच घेण्यात आली आहेत. अश्या परिस्थितीत त्यांनी लेखन व भाषण खंडाचे आणि महाराष्ट्र शासनाच्या चरित्र-साधने प्रकाशन समितीचे आभार मानने अपेक्षित होते. परंतु वैचारिक जहर पसरविण्याचा प्रयत्न करणारे डॉ. नरेंद्र जाधव विश्वसनीय साहित्यालाच गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची विश्वसनीयता लेखन व भाषण खंडातूनच तपासता येऊ शकते हे नरेंद्र जाधव चांगल्याने ओळखून आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या खंडातून पसरविलेले वैचारिक/साहित्यिक जहर झाकण्यासाठी विश्वसनीय आंबेडकरी साहित्यावर टीका केली आहे. घरामध्ये देव दडवून ठेवणारे; आंबेडकरी परिवेशात घुमणारे नरेंद्र जाधव यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांची जाहीररित्या होळी करण्यात येईल.
 
मागण्या   :-

१)     डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची
त्यांनी जाहीर माफी मागावी.
२)     चरित्र-साधने प्रकाशन समितीची जाहीर माफी मागावी.
३)   विश्वसनीय साहित्यावर टीका केल्याने आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे नरेंद्र जाधव यांनी आंबेडकरी समाजाची जाहीर माफी मागावी.
४)    डॉ. नरेंद्र जाधव यांनी प्रकाशित केलेले साहित्य कुणीही विकत घेऊ नये. किंवा संदर्भ म्हणून त्यांचा वापर करू नये.
५)     डॉ. नरेंद्र जाधव यांनी केलेल्या वक्तव्याची कायदेशीर चौकशी करण्यात यावी.
६)     डॉ. नरेंद्र जाधव यांच्यावर Copyright कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.

          इ. मागण्यांसह हे निवेदन प्रेस, मिडिया यांच्या माध्यमातून सरकार आणि समाजासमोर माहितीस्तव नरेंद्र जाधव यांची साहित्यिक घुसखोरी उघड करण्यासाठी पत्रकार परिषदेसमोर ठेवण्यात आले आहे.

धन्यवाद !

निवेदन कर्ते  :-
  
नाव                                                                                 सही

1.       ……………………………………………                         ……………………….
2.       ……………………………………………                         ……………………….
3.       ……………………………………………                         ……………………….
4.       ……………………………………………                         ……………………….
5.       ……………………………………………                         ……………………….
6.       ……………………………………………                         ……………………….
7.       ……………………………………………                         ……………………….
8.       ……………………………………………                         ……………………….
9.       ……………………………………………                         ……………………….
10.     ……………………………………………                         ……………………….