#Once_Again_Ambedkar
‘लोखंडाचे चने
चावणारी आंबेडकरी चळवळ’
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीचे वर्णन
करीत असतांना म्हटले होते की, ‘आंबेडकरी चळवळ ही लोखंडाचे चणे चावणारी चळवळ आहे.’
१९८० च्या दशकात भैय्यासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या आंबेडकरी चळवळीचे वर्णन ४०
वर्षानंतर आज २०२० च्या दशकात खरेच लोखंडाचे चणे चावायला लागली आहे. मनुवादी
सत्तेचे चटके सहन करून, धर्मांध गिधाडांचे हल्ले झेलून, दलित-अस्पृश्यतेची दाहकता
सोसून आंबेडकरी चळवळ समस्त मानव जातीच्या हितासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी नैसर्गिक
वातावरणाला पायाखाली तुडवून परत रस्त्यावर उतरली आहे. उन, वादळ, वारा, पाऊस या
कशाचीही तमा न बाळगता सम्यक क्रांतीचे रणशिंग आंबेडकरी चळवळीने फुंकले आहे.
गर्वाची बाब ही की, या सम्यक क्रांतीचे नेतृत्व ‘परत एकदा आंबेडकर’ करीत आहेत. मानवता
विरहीत वाळवंटात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेची बाग फुलविली. भैय्यासाहेब
उर्फ यशवंत आंबेडकर यांच्यासमोर या मानवतेच्या बागेचे संवर्धन करण्याची जबाबदारी
होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फुलविलेल्या मानवतेच्या बागेत मानवतेचे झरे
शोधतांना भैय्यासाहेबांनी घेतलेली मेहनत व त्या अनुभवातून त्यांनी या चळवळीचा
केलेला उपरोक्त उल्लेख आज त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला म्हणजेच प्रकाश
आंबेडकर यांनाच ते सिद्ध करावे लागेल अशी अपेक्षासुद्धा भैय्यासाहेब आंबेडकर यांनी
केली नसेल. परंतु आज प्रत्यक्षात ‘लोखंडाचे चणे चावणाऱ्या आंबेडकरी चळवळीला’
प्रकाश आंबेडकर यांच्याच नेतृत्वात स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागत आहे.
अभिमानाची बाब ही आहे की, आंबेडकरी चळवळ आज परत एकदा आंबेडकरी नेतृत्वात
क्रांतीच्या मैदानात मनुवादाविरुद्ध दंड थोपटून उभी होत आहे. परत एकदा आंबेडकरांच्या
नेतृत्वात आंबेडकरी चळवळ गतिमान, क्रांतीसदृश्य, नेतृत्वक्षम, नेतृत्वधारी होत
आहे.
मागील ७०
वर्षाच्या कालखंडात प्रतिक्रियावादी बनलेली आंबेडकरी चळवळ आज आंबेडकरी नेतृत्वात
क्रीयावादी बनत चाललेली आहे. आंबेडकरी चळवळीची बनत चाललेली प्रतिक्रियावादी ओळख
पुसली जाऊन क्रीयावादी आंबेडकरी चळवळ आज सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होत
आहे. कालपर्यंत आंबेडकरी चळवळीला प्रतिक्रियावादात अडकवून ठेवण्यासाठी ज्यांनी
ज्यांनी प्रयत्न केले ते सर्व आज स्वतःच प्रतिक्रियावादी होऊ लागले आहेत.
अलीकडच्या काळात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंबेडकरी चळवळीच्या
क्रियात्मक बदलात अलीकडे झालेल्या आंदोलनांचे मोठे योगदान आहे.
अकार्यक्षम नेतृत्वाच्या गुंत्यात सापडलेल्या आंबेडकरी
चळवळीने आज कार्यक्षम नेतृत्वाची कास धरलेली आहे. समाजाने व चळवळीने योग्य नेतृत्व
स्वीकारल्याने काय बदल होऊ शकतो याचा आपण सर्व वर्तमानात अनुभव घेत आहोत. निश्चितच
इथपर्यंतचा प्रवास सोपा किंवा सुखरुपही नव्हता. आंबेडकरी चळवळीभोवती निर्माण केले
गेलेले चक्रव्युव्ह भेदून आंबेडकरी नेतृत्वाला इथपर्यंत पोहचावे लागले आहे. इथून
पुढचा मार्ग तितक्याच उम्मेदिने, जबाबदारीने, विश्वासाने मार्गक्रमित करावा लागणार
आहे. मनुवादाचा बळी ठरलेला इथला बहुजन वर्ग, दलित, अल्पसंख्यांक हा स्वतःच्या
सुरक्षिततेसाठी व मनुवादापासून स्वतःच्या बचावासाठी परत एकदा आंबेडकरी
नेतृत्वाच्या दिशेने आशावादी होऊन ओढला जात आहे. त्यामुळे मनुवादी माणसांनी उभे
केलेले पोलादाचे सुडाधारी कुंपण भेदून मनुवादाचा बळी ठरलेल्या प्रत्येक माणसाला
न्याय मिळवून देण्यासाठी लढावे लागणार आहे. आम्हाला या आंबेडकरी चळवळीला तिच्या
मुख्य उद्धीष्टाकडे घेऊन जावे लागणार आहे.
सत्तेच्या गदारोळात स्वत्व विसरून, स्वाभिमान गहाण ठेवून
अल्पशः स्वार्थापोटी सामाजिक आंदोलनांना झिडकारून केली गेलेली आंबेडकरी चळवळीची
मांडणी नाकारून आज समाज परत चळवळीच्या पूर्वपदावर येऊ लागला आहे. मध्यंतरीच्या
काळात आंबेडकरी चळवळीने विश्वास, लढाऊपणा गमावलेला होता. आंबेडकरी चळवळ मनुवादी
शक्तींशी लढा देऊ शकेल की नाही अशा साशंकेत समाज गेला होता. अश्या अवस्थेतून
प्रकाश आंबेडकर यांनी समाजात विश्वास निर्माण केला. त्यामुळे सामाजिक संघटन,
सामाजिक एकोपा, सामाजिक एकसंघता, सामाजिक आंदोलनाचे एक नेतृत्व व त्यातून उभी
होणारी अन्यायकारी सत्तेविरुद्धची ताकत आज प्रत्येकालाच अनुभवायला मिळत आहे.
एकजातीय, एकवर्गीय होऊ पाहणारी आंबेडकरी चळवळ आज जातीविरहित, वर्गविरहित होऊन
माणुसकी साठी लढा देऊ लागली आहे. मनुवाद्यांकडून बहुजनांवर होणाऱ्या अन्याया
विरुद्धचा आवाज होऊ लागली आहे. वर्तमान काळात आंबेडकरी चळवळीत आलेला हा सकारात्मक
बदल आंबेडकरी चळवळीसाठी व या देशाच्या दृष्टीकोनातून भारतीय संविधानाच्या
सुरक्षिततेसाठी महत्वाचा ठरेल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पश्चात आज पहिल्यांदा आंबेडकरी
चळवळ एका सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वात उभारी घेत असतांना आम्हाला सावधानी सुद्धा
तितकीच बाळगावी लागणार आहे. आधुनिक भारताचा इतिहास हा दोन मुख्य विचार
प्रवाहांमधील संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. तो म्हणजे आंबेडकरी विचारप्रवाह आणि
मनुवादी विचार प्रवाह यांच्यामधील संघर्ष आहे. आंबेडकरी विचारप्रवाह कायम न्यायाची
बाजू घेऊन लढत आला आहे तर मनुवादी विचारप्रवाह हा अन्यायाचा धर्मांध विचारप्रवाह
घेऊन प्रतिक्रांती करीत राहिला आहे. न्यायाच्या बाजूने लढत असतांना आंबेडकरी
चळवळीने कायम धर्म बाजूला ठेवला आहे. परंतु धर्म या एकाच शस्त्राने मनुवादी
विचारप्रवाह पुढे सरकत गेला आहे. मनुवाद्यांचे
धर्म हेच शस्त्र आज त्यांच्या अंगलट येऊ लागले आहे. विरोधकांचे धर्म हे अभेद्य
शस्त्र आज खिळखिळे होत आहे. हिंदू धर्माच्या बुरख्याखाली बहुसंख्य बहुजन हिंदूंचाच
छळ करून मनुवादी टोळक्यांनी वर्चस्वाची नवी मनुवादी व्यवस्था निर्माण करण्याचा जो
प्रयत्न चालविला होता तो आज पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात इथल्या
बहुसंख्य बहुजन हिंदूंनी नाकारण्याची हिम्मत दाखविली आहे. मनुवादी प्रवृत्तींच्या
माध्यमातून होऊ पाहणारे हिंदूंचे ध्रुवीकरण यापुढे होऊ देणार नाही असा निर्णय
इथल्या बहुसंख्य बहुजन हिंदूंनी घेतला आहे. हा आशावादी निर्णय आरएसएस / भाजपा च्या
सत्तेपुढे उद्या आव्हान उभे करणार आहे. एकंदरीतच या आव्हानाचे नेतृत्व आंबेडकरी
चळवळीला करायचे आहे. त्यासाठी आम्हाला आमची मानसिक तयारी आतापासून करावी लागणार
आहे.
जो शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानतो तो इथला मराठा समाज
आज इथली मनुवादी ब्राम्हणी वर्चस्वाची व्यवस्था नाकारतो आहे. इथला बहुसंख्य शेतकरी
आम्ही हिंदू नाहीत का ? हे विचारायला लागला आहे. इथला दलित समाज आम्ही हिंदू नाहीत
का ? हे विचारायची हिम्मत करतो आहे. इथला अठरापगड जातीत विभागाला गेलेला बहुजन
वर्ग सुद्धा आम्ही हिंदू नाहीत का ? हे विचारायला लागला आहे. आरएसएस / भाजपा या
देशात हिंदूंचे राज्य आहे व भाजपाची सत्ता हिंदुराष्ट्र निर्मितीकडे जाणारी आहे
असे म्हणत असेल तर या सत्तेत बहुजन हिंदूंचे स्थान कुठे आहे ? आमचे संविधानिक
अधिकार कुठे आहेत ? आमचे संविधानिक अधिकार का हिरावले जात आहे ? याचेही उत्तर इथला
बहुसंख्य बहुजन हिंदू आरएसएस व भाजपा ला विचारू लागला आहे. तर दुसरीकडे या देशात
असणारा मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध इ. अल्पसंख्यांक समूह हिंदुराष्ट्रात आमचे स्थान
कुठे आहे ? आमचे संविधानिक अस्तित्व का नाकारले जात आहेत ? हे विचारू लागला आहे.
सोबतच इथला गांधीवादी, मार्क्सवादी आपले वैचारिक स्वातंत्र्य मागतो आहे. धर्माच्या
पलीकडे जाऊन आपले विचार स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी धडपडतो आहे. अनवधानाने
म्हणता येणार नाही परंतु प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस / भाजपा यांच्यापुढे उभ्या
केलेल्या संवैधानिक लढ्याने आज हा सर्व समूह आंबेडकरी चळवळीकडे स्वतःचे अस्तित्व
टिकविण्यासाठी व भारतीय संविधानाने दिलेले अधिकार अबाधित राखण्यासाठी आशेने बघतो
आहे.
या सर्व समूहाला प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने आंबेडकरी
चळवळीकडून बळावलेला विश्वास येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकापर्यंत टिकवून ठेवणे महत्वाचे
आहे. कधी नव्हे तो विश्वास आज आंबेडकरी चळवळीने प्रकाश आंबेडकरांच्या खंबीर
नेतृत्वात मिळविलेला आहे. त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी घेत परत या
देशावर मनुवाद लादला जाणार नाही याची दक्षता घेणे अशा दुहेरी लढाईचे नेतृत्व आज
आंबेडकरी चळवळीला करायचे आहे. आंबेडकरी चळवळीत बाजारभुंग्यांनी मांडलेला बाजार
बाजूला सारून सर्वसमावेशक भूमिकेतून आंबेडकरी चळवळीला मार्गक्रमण करावे लागणार
आहे. इथला गांधीवादी असो किंवा मार्क्सवादी असो मनुवादाविरुद्धच्या लढाईतील
त्यांच्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत. धर्म हा त्यांच्या मर्यादेतला महत्वाचा व
कमकुवत दुवा असल्याने या विचार प्रवाहांनी आजपर्यंत अपेक्षित असा लढा
मनुवादाविरोधात उभा करू शकले नाही. वर्तमानात मनुवादी विचार प्रवाहांच्या हातात
असलेली अमर्याद सत्ता व अन्यायकारक सत्तेचे सूत्रसंचालन याआधी त्यांच्या हातात कधी
नव्हते. हेही त्यामागचे एक कारण असेल. परंतु आंबेडकरी चळवळीसमोर तो दुवा नाही.
आंबेडकरी चळवळ व्यापक अंगाने वैचारिक लढाई लढत आलेली आहे. आज मनुवाद्यांच्या हातात
असलेल्या अमर्याद सत्तेने व त्या सत्तेच्या दुरुपयोगाने इथल्या अन्य समूहावर
अन्याय होत असतांना तो भयभीत झालेला आहे. अशातच प्रकाश आंबेडकरांनी उभ्या केलेल्या
आंदोलनातून अन्य समूहात वाढत चाललेली भीती आज कुठेतरी कमी व्हायला लागली आहे.
त्यामुळे आज आंबेडकरी चळवळीकडे या सर्व समूहाचे नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी
आलेली आहे. हे विसरून चालणार नाही.
हे सर्व करीत असतांना आज आंबेडकरी चळवळीसमोर अंतर्गत
हितशत्रूंचे मोठे आव्हान उभे आहे. ज्या हितशत्रूंनी मागच्या ७० वर्षात स्वतःच्या
व्यक्तिगत लाभासाठी आंबेडकरी चळवळीला संकुचित केले त्याच अंतर्गत हितशत्रूंना
हाताशी घेऊन मनुवादी प्रवृत्ती आंबेडकरी चळवळीत दुफळी निर्माण करण्याचा जोरकस
प्रयत्न करण्याची शक्यता आहे. भारतीय व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आंबेडकरी चळवळ व
आंबेडकरी विचार येऊ पाहत असतांना त्यापासून रोखण्यासाठी या अंतर्गत हितशत्रूंचा
वापर होण्याची दाट शक्यता आहे. या हितशत्रूंच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण
करण्याची खेळी मनुवादी करू पाहत आहेत. अशा परिस्थितीत या हितशत्रूंच्या पाठीशी
असणाऱ्या समाजबांधवांची भूमिका याठिकाणी महत्वाची ठरेल. आज आंबेडकरी समूह प्रकाश
आंबेडकर यांच्या नेतृत्वात; त्यांच्या भूमिकेच्या समर्थनात; आंबेडकरी चळवळीच्या भविष्याचा
वेध घेऊन एकत्रित होत असतांना मनुवादी आरएसएस / भाजपा च्या मांडीवर बसून आंबेडकरी
बुरखा पांघरलेल्या हितशत्रूंना साथ द्यायची ? की समाज निर्णयाला मान्य करून
त्यांची साथ सोडायची.? याचा निर्णय आंबेडकरी समूहाला घ्यायचा आहे. तसेच वरकरणी
आरएसएस / भाजपा विरोध दाखवून त्यांनाच अभिप्रेत भूमिका घेणाऱ्या हितशत्रूंना देखील
बाजूला सारण्याची भूमीला आंबेडकरी समूहाला घ्यावी लागणार आहे. आंबेडकरी
चळवळीसमोरील ही अंतर्गत व बाह्य आव्हाने मोठी आहेत. या आव्हानांचा सामना करीत
येणाऱ्या काळात या देशाचे नेतृत्व आंबेडकरी चळवळीला करायचे आहे. परत एकदा
आंबेडकरांच्याच नेतृत्वात ती संधी आंबेडकरी चळवळीला आलेली आहे. याचा विसर पडता
कामा नये.
प्रतीकांमध्ये अडकलेल्या आंबेडकरी चळवळीने पुढचा टप्पा
गाठलेला आहे. प्रतीकांमध्ये अडकून फार फार तर भावनिक समाधान प्राप्ती करून घेता
येऊ शकते किंवा त्यापलीकडे जावून धार्मिक आत्मभानाला समाधानी करता येऊ शकते. परंतु
भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी ताटकळत पडलेल्या समाजाला न्याय मिळवून देता येत नाही.
ज्या भौतिक व मानवीय गरजांची पूर्तता करण्याची किंवा तशी खात्रीशीर व्यवस्था
निर्माण करण्याची हमी भारतीय संविधानाने दिलेली आहे. ते भारतीय संविधान
प्रतीकांच्या लढाईतून वाचविता येणारे नाही. भारतीय संविधान हे आंबेडकरी चळवळीचे आत्मबळ
आहे. आंबेडकरी चळवळीचा तो आत्मा आहे. तो टिकवून ठेवायचे असेल तर आंबेडकरी चळवळीला
वर्तमानातल्या व्यावहारिक पातळ्यांवर लढा उभा करावा लागेल. वर्तमान संदर्भांना
हाताशी घेऊन जनहिताचा लढा उभा करावा लागेल. भारतीय संविधान जसे इथल्या नागरिकांचे
अस्तित्व जपणारे एकमेव साधन आहे तसेच ते आंबेडकरी चळवळीच्या लढ्याचे साधन आहे. हा
विश्वास निर्माण करण्यात आज प्रकाश आंबेडकर यशस्वी ठरलेत. त्यामुळे आंबेडकरी चळवळ
उभारी घेत आहे. हे विसरून चालणार नाही.
कुठलीही साधनसुचिता नसतांना, कुठलीही पूरक परिस्थिती
नसतांना, कुठल्याही भौतिक साधनांची उपलब्धता नसतांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभी
केलेली आंबेडकरी चळवळ त्याच आंबेडकरी विचारांची प्रेरणा सोबत ठेवून भारतीय
संविधानातील अधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढत आली. देशातील नागरिकांवर होणाऱ्या
अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी विविध आव्हानांचा पेलून धरीत आहे. देशापुढे
घोंगावणाऱ्या समस्यांना वाचा फोडीत आली. भारतीय नागरिकांना भारतीयत्व बहाल करीत
आहे. त्यासाठी प्रसंगी अन्याय अत्याचारही सहन करीत आहे. त्याच आंबेडकरी चळवळीला मुख्य
उद्धीष्टापासून तसूभरही न भरकटू देता परत एक आंबेडकर मनुवादाचा मुकाबला करण्यासाठी
सज्ज झाला आहे. आरएसएस / भाजपा च्या रूपाने देशात येऊ घातलेला मनुवाद
संपविण्यासाठी धडपडतो आहे. देशात उभ्या केलेल्या मनुवादी भिंती तोडून मानवतेचे
बीजारोपण करतो आहे. परत एकदा आंबेडकर (प्रकाश आंबेडकर) या देशाला मनुवादापासून
मुक्ती देण्यासाठी लढतो आहे. या देशातून मनुवादाला हद्दपार करण्यासाठी आंबेडकरी
चळवळीचे नेतृत्व करतो आहे. परत एक आंबेडकर या देशाला एक सुजलाम सुफलाम राष्ट्र
बनवू पाहतो आहे. मनुवाद्यांची जहागीरदारी संपवून देशातल्या नागरिकांची सर्वोच्च
मालकी असलेली लोकशाही टिकवू पाहतो आहे. परत एकदा आंबेडकर या देशाचे सुरक्षा कवच
बनू पाहतो आहे. हा देश परत एकदा आंबेडकरांकडे ‘मुक्ती कोण पथे’ देऊ पाहतो आहे. या
देशातला बहुसंख्य बहुजन, अल्पसख्यांक समूह परत एकदा आंबेडकरांना या देशाचे नेतृत्व
देण्यास सज्ज झाला आहे. या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकरांच्या
पाठीशी उभ्या झालेल्या समूहासोबत आपण उभे होणार की नाही यावर आपले भविष्य निर्भर
करेल.
adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
डॉ. संदीप नंदेश्वर,
नागपूर.