आंबेडकरवाद्यांची राजकीय भूमिका
आणि सत्ताधारी मानसिकता
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५
दि.
२४ सप्टेंबर १९४४ च्या मद्रास येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात, "शासनकर्ती जमात
बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या
भिंतीवर ते कोरून ठेवा." बाबासाहेबांच्या या एका वाक्याच्या अवतीभवती संपूर्ण
आंबेडकरवाद्यांनी आपली मानसिकता तयार केली. आणि मग सुरु झाला शासनकर्ती जमात बनण्याचा
प्रवास. काहींनी याच एका वाक्याचा विपर्यास करून आंबेडकरवाद्यांना विविध गटात तोडले.
त्यांच्यात फुट पाडली. तर काहींनी या वाक्याचा वापर करून समाजाचे भावनिक वशीकरण केले.
समाजाला आर्थिक साधनांनी लुटले. सत्ताधारी बनले. सत्तेची फळे चाखली. महापुरुषत्व निर्माण
केले. समाजानेही त्यांना महापुरुषांच्या रांगेत नेउन बसविले. मात्र बाबासाहेबांच्या
संकल्पनेतला शासनकर्ता समाज बनलाच नाही. कारण शासनकर्ती जमात बनण्याची प्रक्रिया, विचार,
सिद्धांत सत्तेवर गेलेल्यांनी स्वीकारले नाही. आणि समाजानेही स्वीकारले नाही.
मुळात
आजही आंबेडकरवादी शासनकर्ती जमात बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून काहीचे हात मजबूत करण्याचा
प्रयत्न करीत आहेत. ज्यांनी सत्तेवर येऊनही समाजाला शासनकर्ती जमात बनविले नाही. त्यांच्याच
पाठीशी लागून आंबेडकरी समाज आणखी किती वर्ष स्वप्नात जगत राहणार ? असा प्रश्न आता आधुनिक
आंबेडकरी पिढीच्या समोर निर्माण झाला आहे. विशिष्ट माणसे सत्तेवर गेली किंवा विशिष्ट
माणसांच्या हातात सत्ता आली अथवा एखाद्या विशिष्ट समाजाचा व्यक्ती मुख्यमंत्री-पंतप्रधान
झाला म्हणजे समाजाचे "शासनकर्ती जमात" बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले. असे
सोईचे मांडले गेलेले गृहीतक समाजाच्या उत्थानासाठी-कल्याणासाठी अतिशय धोकादायक
आहे. विचार, सिद्धांतावर आधारित सत्तेची प्रक्रिया जोपर्यंत समाजाच्या तळागाळातल्या
माणसांमध्ये सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक आमुलाग्र बदल घडवून आणीत नाही. तोपर्यंत समाज 'शासनकर्ती
जमात' बनू शकत नाही. समाजाच्या स्थितीत सत्तेने कुठलाही बदल घडून येत नसेल. तर त्या
सत्तेला आम्ही समाजाची सत्ता म्हणणे सामाजिक विकासाला घातक आहे.
आंबेडकरी
समूहाने 'शासनकर्ती जमात' बनण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली तत्वे अंगिकारली
नाही. ज्यांनी अंगीकारण्याचा प्रयत्न केला अश्या RPI व तत्सम संस्था व संघटनांना
प्रतीक्रांतीवाद्यांच्या हस्तकांनी (BAMSEF & BSP) बदनाम करून सत्ता प्राप्त करणे.
हे एकमेव गृहीत 'शासनकर्ती जमात' या संकल्पनेभोवती फिरविले. ज्यामुळे सत्ता हस्तगत
केल्याशिवाय समाजाचा कुठलाही विकास घडून येणार नाही. असा चुकीचा पायंडा समाजासमोर पाडला
गेला. PM आणि CM बनणे म्हणजेच 'शासनकर्ती जमात' बनणे असे तकलादू विचार-विधान समाजात
पेरल्या गेले. आणि पदे उपभोगुन समाजाला आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आले. आंबेडकरवादी
वैचारिक सत्ता चालविलीच गेली नाही. समाज मात्र दुभंगत गेला. अस्ताव्यस्त होत गेला.
वैचारिक फुट पडली. पराकोटीचा संघर्ष आंबेडकरी विचार शिरोधार्य मानणा-या समाजात निर्माण
झाला.
खरे
तर मागील ६० वर्षात आंबेडकरी समूहाने अपेक्षित प्रगती साधली नसली. तरी निर्धारित
ध्येय मात्र गाठले. आंबेडकरी समाजाचा स्तर उंचावला गेला. शैक्षणिक प्रगती झाली. आर्थिक
स्तर उंचावला. हे सर्व PM/CM झाल्यामुळे साध्य झाले नाही. तर आंबेडकरी विचार अंगीकारल्यामुळे
झाले. सत्ताधा-यांवर आंबेडकरी विचारांचे नियंत्रण ठेवल्यामुळे साध्य झाले. याचा विचार
आज करण्याची गरज आहे.
राजकीय सत्तेच्या आवर्तनात सापडलेल्या
आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, नोकरपेशांनी, चाकरमान्यांनी
आणि साहित्यिकांनी त्यांची राजकीय भूमिका घेतलेली आहे का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला
विचारावा. सत्तेची समीकरणे फार सोपी आहेत. इथे भूमिकांची कमतरता आहे. राजकीय भूमिका
घ्यायला या देशातला कुठलाही कायदा अडवीत नसतांना, उलट कायदाच तुम्हाला राजकीय भूमिका
घेण्यास बाध्य करीत असतांना ''मला राजकारणाशी देणेघेणे नाही. राजकारण हे माझे क्षेत्र
नाही.'' असे म्हणणा-या माणसांना जोड्यानेच मारले पाहिजे. शोषित-पिडीत, मागास समाजाच्या
उत्थानात हि माणसे सर्वात जास्त धोकादायक आहेत. एकदा
विचार करून बघा ! नाहीतर मलाच जोड्याने मारा !
आंबेडकरवाद्यांची राजकीय भूमिका
दर्शविणारा तक्ता
क्र.
|
समूह
|
लोकसंख्येतील प्रमाण
|
राजकीय भूमिका
|
1
|
नेते / कार्यकर्ते
|
5 %
|
दिशाहीन
|
2
|
साहित्यिक / विचारवंत
|
5 %
|
नाही.
|
3
|
नौकरदारवर्ग
|
30 %
|
नाही.
|
4
|
तरुण / विद्यार्थी
|
20 %
|
अस्पष्ट
|
5
|
मजूर / सर्वसामान्य वर्ग
|
40 %
|
नाही.
|
कुठल्याही
पक्षाशी किंवा विचारांशी न जुडलेला माणूस हा कार्यकर्ता आणि सच्चा अनुयायी
राहूच शकत नाही. एकाच वेळेस एकाच काळात सर्व पक्ष, सर्व नेते, सर्व विचार, सर्व कृती
नाकारण्यासारखे किंवा अमान्य असण्यासारखे राहूच शकत नाही. त्यात कुणीतरी एक नेता, एक
पक्ष, एक विचार, एक कृती हि निश्चितच श्रेष्ठ आणि मानण्यासारखी असते. समाजाला तो स्वीकारार्ह
असतो. समाजासाठी तो लाभदायक असतो. आम्ही त्या विचारापर्यंत किव्हा त्या नेत्यापर्यंत
अथवा त्या पक्षापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न कधी केला नसतो. राजकीय नेता किंवा राजकीय
पक्ष नाकारणारे एक तर स्वतःची फसगत करतात. किंवा समाजाची तरी फसगत करतात. सदासर्वकाळ राजकीय
तटस्थ व्यक्ती राहूच शकत नाही. आणि तसा तो राहत असेल; तर तो सामाजिक गुन्हा आहे. सामाजिक
द्रोह आहे. आणि अशी व्यक्ती विचारांचा, चळवळीचा आणि क्रांतीचा दावा करू शकत नाही.
नेते, पक्ष एकत्र आले पाहिजे
म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडणारे लोक समाजाला किती फसवतील ? चळवळीचा अभ्यास न करता
एकतेचा हेका धरणारे कधीही समाजासमोर अभ्यासपूर्ण अश्या एका नेतृत्वाचा पर्याय मांडत
नाही. दिवसागणिक नेते आणि पक्ष उभे केले जात आहेत. किती लोकांना एकत्र कराल ? किती
पक्ष जोडायचे ? अरे त्यापेक्षा चळवळीतील नेतृत्वाचा अभ्यास करून समाजासमोर एक नेतृत्व
उभे करा ! येणा-या काळातील परिस्थिती लक्षात घेता आता आंबेडकरी समाजाने कुठल्याही एका
नेतृत्वाचे नेतृत्व स्वीकारणे गरजेचे आहे.
नेते,
पक्ष कधीच एकत्र येत नाही. त्यांच्या उगम व जन्म हा एकत्र येण्यासाठी झालेला नसतोच.
त्यामुळे त्यांच्या एकत्रीकरणाच्या फाजील गप्पा करणे शुद्ध मूर्खपणा ठरेल. त्यापेक्षा
विचारांचे कार्यकर्ते एकत्र आले तर पक्ष, नेता, स्वार्थ या त्रयीला बाजूला सारून आपला
पक्ष आणि नेता ठरविणे सोपे जाईल. आणि जेव्हा हे विचारांचे कार्यकर्ते एकत्र येउन आपला
पर्यायाने समाजाचा नेता व पक्ष ठरवितात. तेव्हा विचारांसोबत समाज संघटन, पक्ष आणि नेत्यांना
एकसुत्रात बांधणे सहज शक्य होते. त्यामुळे जे सत्य आहे ते सत्य मानण्याची हिम्मत निर्माण
करा. जो चुकतोय त्याच्या चुका मान्य करा. जे विचारात बसत नाही ते सोडण्याची व त्यासाठी
पक्ष-नेतृत्वाची साथ सोडण्याची तयारी दर्शवा. विचाराने एकत्र या ! बसा ! चर्चा करा
! विचार प्रमाण मानून कामाला लागा. स्वतःसोबत समाजाचा पक्ष व नेता ठरवायला विचारांनी
एकत्र या ! तुम्ही एकदा का एकत्र आले. तर तुटलेल्या, फुटलेल्या नेत्यांना, पक्षांना
जोडणे सोपे जाईल. व एका नव्या परिवर्तन क्रांतीला सुरवात करता येईल. वैचारिक कार्यकर्ते
विचाराने एकत्र येतील का ? विचार प्रमाण मानून ठरवतील का त्यांचा नेता आणि त्यांचा
पक्ष ? हे ठरवायला तुम्ही एकत्र याल असा आशावाद समाज व्यक्त
करतो आहे.
आंबेडकरवाद्यांच्या
हातात सत्ता आली नाही. हे निर्विवाद सत्य असले तरी ती येणार नाही. असे गृहीत धरू नये.
आधुनिक परिस्थितीत आंबेडकरवाद्यांच्या हातात सत्ता येणे सहज शक्य आहे. फक्त मागील ६०
वर्षात आंबेडकरी समूहाने जी राजकीय भूमिका घेणे अभिप्रेत होते ती घेतली गेली नाही.
राजकीय भूमिका मागे पडून सत्ता...सत्ता...आणि फक्त सत्ता अश्या डरकाळ्या फोडल्या गेल्या.
परंतु विभक्त झालेल्या समाजाला एक निश्चित दिशा देण्यासाठी या समाजाने राजकीय भूमिका
स्वीकारलीच नाही. राजकारणात सक्रिय असणारे नेते आणि कार्यकर्ते यांनीच तेवढी एक भूमिका
घेतली. ती पण संशयास्पद. निश्चित, विचारपूर्वक आणि समाजाभिमुख ती भूमिका होती असेही
म्हणता येत नाही. पण त्यांनी निदान त्या त्या काळात त्यांची राजकीय भूमिका बजावली.
परंतु आंबेडकरी समूहातला मोठा वर्ग आहे जो राजकीय अलिप्तता हेच आपल्या जीवनाचे ध्येय
बनवून जगला. तोच समूह ख-या अर्थाने आंबेडकरी समाजात राजकीय नैराश्य आणि राजकीय असमंजसपणा
निर्माण करण्यास कारणीभूत ठरला.
ज्या समाजात राजकीय भूमिकाच स्वीकारली
गेली नाही. तो समाज बाबासाहेबांच्या 'शासनकर्ती जमात' या संकल्पनेला प्रत्यक्षात कसा
उतरवू शकेल. वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे आंबेडकरी समाजातील एकाही समूहाने स्पष्ट
अशी राजकीय भूमिका स्वीकारली नाही. जिथे नेते व कार्यकर्ते यांचीच राजकीय भूमिका दिशाहीन
होती. अश्या परिस्थितीत अन्य समूहाकडून किती अपेक्षा करायच्या ? हा खरा प्रश्न निर्माण
होतो. तरीही बाबासाहेबांच्या प्रेरणेने राजकारण करणा-या नेते व कार्यकर्त्यांचा समूह
हा एकूण लोकसंख्येत फक्त ५ % एवढाच आहे. या समूहाने भूमिका घेतल्या पण स्पष्ट अशी राजकीय
भूमिका घेतली नाही. उलट आपले राजकीय अस्तित्व टिकून राहावे म्हणून आपल्या भूमिकेला
यांनी स्वतःच पायदळी तुडविले. समाजाने ज्यांच्या भूमिकेचा स्वीकार करून त्यांचे नायकत्व
स्वीकारावे अशी परिस्थिती निर्माण केली गेली नाही. नेते व कार्यकर्ते यांनी स्पष्ट
राजकीय भूमिका घेतली नाही. याचे कारण सामाजिक मतभेद आणि गटबाजी हे सुद्धा आहे.
कारण त्यांच्या भूमिकेला छेद देणारी व्यवस्था अन्य संस्था संघटनांनी समाजात निर्माण
केली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेच्या पाठीशी समाजाचा किती समूह आहे
? हे त्यांना निर्धारित करता आले नाही. किंवा सामाजिक पाठिंब्याचा विश्वास त्यांना
नव्हता. म्हणून कदाचित त्यांच्या राजकीय भूमिका स्वअस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दिशाहीन
होत गेल्या.
जो
समाज स्वतःचा नेता, स्वतःचा पक्ष निश्चित करू शकत नाही तो समूह सत्ताधारी बनणे दुरापास्त
तर आहेच पण पूर्णतः अशक्यच म्हणावे लागेल. आंबेडकरी समाजात नेमके हेच घडले. बाबासाहेबानंतर
समाजाने एक नेतृत्व स्वीकारलेच नाही. त्यामुळे दोष नेते व कार्यकर्ते यांचा जितका आहे.
तितकाच दोष साहित्यिक, विचारवंत आणि नौकरदार वर्गाचा देखील आहे. कारण एकूण लोकसंख्येत
४० % असणा-या या वर्गाने राजकीय उदासीनता दाखविली. त्यामुळे ६० टक्के समाज जो या ४०
टक्के समूहाच्या भूमिकेवर आपली भूमिका निर्धारित करीत असतो तो भरकटला गेला. ज्याचा
लाभ प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात इतर सत्ताधारी पक्षांनी घेऊन या वर्गाची मते साम,
दाम, दंड, भेद या आधारावर विकत घेतली. एकंदरीत आंबेडकरी समाजाची वाटचाल
राजकारणाच्या अनुषंगाने दिशाहीन झाली. तर दुसरीकडे सत्तेचे तुकडे टाकून काहींनी या
समाजात राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर
समाजाची धुरा सांभाळणारे जर कुठल्याही आमिषांना व स्वार्थाला बळी पडले नसते. तर आज
आंबेडकरवाद्यांच्या हातात सत्तेची गुरुकिल्ली राहिली असती.
समाजातला
साहित्यिक, विचारवंत, नेते, कार्यकर्ते, नौकरदारवर्ग असा सन्माननिय समूह ज्या
दिशेने मार्गक्रमण करतो त्याच दिशेने सर्वसामान्य समाज समूह, मजूर, तरुण, विद्यार्थीही
मार्गक्रमण करीत असतो. परंतु समाजातला हा सन्माननीय वर्ग राजकीय उदासीनतेने
ग्रासला तर समाजाच्या अन्य वर्गाकडून योग्य त्या भूमिकेची अपेक्षाच करता येत नाही.
आज आंबेडकरी समूहातील साहित्यिक, विचारवंत, लेखक मंडळी स्वतःच इतक्या राजकीय नैराश्य
व उदासीनतेने ग्रासले आहेत कि त्यांच्या प्रत्येक साहित्यातून, लिखाणातून आणि कृतीतून
राजकारणाविषयीचा तुच्छभाव दिसून येतो. "आम्ही साहित्यिक आम्हाला राजकारणाशी देणेघेणे
नाही.'' अशी भूमिका घेतांना समाजातल्या इतर वर्गाने काय बोध घ्यावा ? एक साहित्यिक,
विचारवंत, लेखक तत्कालीन परिस्थितीचा सारासार विचार करून जेव्हा स्वतःच पक्ष व नेता
निवडतो. व तशी स्पष्ट भूमिका त्यांच्या साहित्यातून, विचारांतून व लेखनातून घेतो. तेव्हा
त्यांना वाचणारा, ऐकणारा लाखोंचा समूह स्वतःची राजकीय भूमिका घेण्यास, स्वतःचा पक्ष
व नेता निवडण्यास प्रवृत्त होतो. ज्यामुळे समाजातील राजकीय मतभेद, पक्षभेद, नेतृत्वाचे
संघर्ष दूर होऊन समाजाचे राजकीयीकरण घडून येते. आणि समाज एका निश्चित राजकीय भूमिकेपर्यंत
पोहचायला लागतो. आंबेडकरी समाजातल्या साहित्यिक, विचारवंत, लेखक मंडळींनी अश्या
स्पष्ट राजकीय भूमिका अद्याप घेतलेल्या नाहीत. आणि अजूनही घेतांना दिसून येत नाही.
त्यांनी तशी स्वतःची राजकीय भूमिका जर घेतली तर निश्चितच आंबेडकरी समाजाला सत्तेपर्यंत
जाण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही.
त्याखालोखाल
समाजातला एक मोठा वर्ग नौकरदार लोकांचा वर्ग राजकीय भूमिकेपासून अलिप्त आहे. प्रत्यक्ष
राजकारण करण्याचे बंधन असले तरी राजकीय भूमिका, राजकीय पक्ष आणि राजकीय नेता निर्धारित
करण्याचे बंधन त्यांच्यावर नाही. तरीही हा वर्ग स्वतःला राजकारणापासून अलिप्त ठेवतो.
ही आंबेडकरी समाजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने
प्रशासकीय सेवेत-व्यवस्थेत गेलेला वर्गच आज आंबेडकरी
भूमिकेशी प्रताडणा करीत आहे. नौकरदार वर्गाला देखील समाजात मानाचे स्थान प्राप्त झालेले
आहे. परंतु हाच वर्ग आज आंबेडकरी समाजाच्या फाटाफुटीला, राजकीय अपयशाला शिव्या मारतांना
दिसून येतो. RPI च्या नेत्यांना आणि पक्षाच्या दुरावस्थेला शिव्या मारण्यात हा वर्ग
प्रथम क्रमांकावर आहे. जे कधीच समाजासमोर आपली एक राजकीय भूमिका घेऊन गेले नाही. ज्यांनी
कधी आंबेडकरी समाजाचा हा पक्ष व हा नेताच असू शकतो. असे स्पष्टपणे सांगितले नाही. ज्यांनी
कधीही आंबेडकरी चळवळीत व आंबेडकरी राजकारणात योगदान दिलेले नाही. आंबेडकरी पक्ष, उमेदवारांना
मत न देता स्वतःची मते विकणारा हाच वर्ग समाजात आंबेडकरी नेते व पक्ष यांच्याविषयी
द्वेष निर्माण करतांना दिसतो. यातला
एक मोठा वर्ग असाही आहे ज्यांनी बाबासाहेबांचे काम करणा-या पक्ष, संघटना व नेत्यांना
आर्थिक मदत न करता प्रतीक्रांतीवादी हस्तकांना मोठे केले. महिन्याकाठी त्यांना पैसा
पुरविला. परंतु त्यांच्या भूमिका, निष्ठा तपासून पहिल्या नाही. समाजात असणा-या या ३०
% वर्गाने तरी आता आपली राजकीय भूमिका निर्धारित करावी. आपला राजकीय पक्ष कोणता ? आणि
आपला नेता कोण ? हे ठरवावे. आणि समाजासमोर ते उघडपणे मांडावे. जेणेकरून समाजात त्यांच्या
अवतीभवती असणारा वर्ग, त्यांचा सन्मान करणारा वर्ग स्वतःची एक निश्चित अशी राजकीय भूमिका
घ्यायला बाध्य होईल.
समाजातला तरुण व विध्यार्थी वर्ग हा सुद्धा कुठल्याही
समाजासाठी मैलाचा दगड ठरीत असतो. त्या समाजाच्या वर्तमानापासून तर भविष्यापर्यंतची
जबाबदारी पेलून धरणारा व समाजावर येणा-या आक्रमणांचा सामना करणारा हा वर्ग असतो. तरुण,
सुशिक्षित व विद्यार्थी वर्ग हा त्या समाजाच्या उद्याच्या भविष्याचा वाहक असतो. या
वर्गावर सामाजिक संस्कार ज्याप्रमाणे होतील त्याप्रमाणे तो वर्ग घडत जातो. आधीच्या
पिढीचे अनुकरण करणारा हा वर्ग असतो जो वर्तमान आणि भविष्याची सांगड घालणारा मध्यस्तीची
भूमिका बजावीत असतो. आंबेडकरी समाजातील मध्यंतरीची पिढी भरकटली. त्याला कारणीभूत
तत्कालीन साहित्यिक आणि नौकरदार वर्ग होता. त्याचा परिणाम वर्तमानातील पिढीवर
आहे. वर्तमानातील पिढी संभ्रमावस्थेत आहे. सामाजिक हितापेक्षा व्यक्तिगत हिताला महत्व
देणारी आहे. या पिढीच्या खांद्यावरच नवी पिढीही उदयाला येत आहे. जी पहिल्या दोन पिढ्यांच्या
भरकटलेपणामुळे आणि वर्तमानातील पिढीच्या संभ्रमावस्थेमुळे हवालदिल होऊन त्यातून मार्ग
काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु काय खरे आणि काय खोटे ? समाजकारण करावे कि राजकारण
करावे ? या पक्षात जावे कि त्या पक्षात जावे ? याला नेता मानावे कि त्याला नेता मानावे
? हे ठरवितांना त्यांचा गोंधळ उडतो आहे. एकंदरीतच सामाजिक गोंधळ त्यांच्या दृष्टीक्षेपात
असतांना जर या पिढीला सावरता आले नाही. तर आंबेडकरी चळवळीला येणा-या काळात समर्थ खांद्यावर
पेलून धरणारी पिढी मिळणार नाही. हा अतिशय गांभीर्याचा मुद्दा आज आंबेडकरी समाजासमोर
उभा झाला आहे.
निदान
याचा विचार करून पहिल्या पिढीपासून तर वर्तमान पिढीपर्यंत साहित्यिक, विचारवंत, लेखक,
नौकरदार, अधिकारी म्हणून समाजात वावरणा-या मंडळींनी स्वतःच्या राजकीय भूमिकेला निश्चित
करावे. अधिकारी म्हणून, साहित्यिक-विचारवंत म्हणून व लेखक म्हणून समाजाचे वैचारिक नायकत्व
करणा-यांनी आपला राजकीय नायक निवडावा. राजकीय नायकाविना समाज विस्कळीत होतो. हे आतापर्यंतच्या
५७ वर्षांच्या कालखंडात अनुभवायला आलेले आहे. त्यामुळे आमचेच नायकत्व या समाजाने स्वीकारावे
या तो-यात मिरविण्यापेक्षा समाजाला तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून, तत्कालीन नेतृत्वाचा
अभ्यास करून, राजकीय नायकाचा पर्याय मांडावा. तेव्हाच नव्या पिढीसमोर काहीतरी आदर्श
निर्माण करता येईल. व नव्या पिढीला कणखर, स्वाभिमानी व आंबेडकरी विचारांचा राजकीय नायक
देता येईल. ज्या राजकीय नायकाचे नायकत्व स्वीकारून नवी पिढी आंबेडकरी समाजाची धुरा
भविष्यकाळात वाहून नेईल. व स्वतःतूनच काळानुरूप नवे राजकीय नायक निर्माण करतील.
समाजव्यवस्था
कुठलीही एक भूमिका घेऊन उभी राहू शकत नाही. किंवा कुठलीही व्यक्ती समाजव्यवस्थेत जगत
असतांना एक भूमिका घेऊन जगू शकत नाही. कारण समाजव्यवस्थेशी निगडीत असणा-या प्रत्येक
क्षेत्राची भूमिका घेणे ही व्यक्तीसाठी आवश्यकच ठरते. सामाजिक, आर्थिक, धार्मिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय असे हे समाजव्यवस्थेशी निगडीत क्षेत्र
आहेत. त्या प्रत्येक क्षेत्राशी प्रत्येक माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यात जुडलेला
आहे. त्यामुळे कुणीही फक्त असे म्हणणे कि 'मी फक्त एका विशिष्ट क्षेत्राशी जुडलेला
आहे. त्यामुळे मी तीच भूमिका घेणार. इतर भूमिकांशी माझे काही घेणे देणे नाही.' हा समाजव्यवस्थेशी
केलेला द्रोह आहे. ती समाजव्यवस्थेची प्रताडना होय. आंबेडकरी समाजाने याचा गांभीर्याने
विचार करावा. समर्पक व सर्वकष भूमिका न घेता एकेरी भूमिका घेणारे प्रत्येकच व्यक्ती
व समूह आंबेडकरी चळवळीच्या आजच्या दुरवस्थेला आणि आंबेडकरी राजकारणाच्या अपयशाला जबाबदार
आहेत.
फक्त
राजकीय नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांना दोष देऊन चालणार नाही. तर आपली जबाबदारी, आपले
अपयश आणि आतापर्यंत आपण केलेल्या चुका आपल्याला स्वीकाराव्या लागतील. आणि प्रत्येक
क्षेत्राशी निगडीत विशिष्ट एक भूमिका घेऊन समाजासमोर त्या भूमिकेला मांडावे लागेल.
ही भूमिका घेण्याची व मांडण्याची सुरवात जरी आज आम्ही करू शकलो. तर बाबासाहेबांच्या
'शासनकर्ती जमात' या संकल्पनेला वास्तवात उतरायला वेळ लागणार नाही. आंबेडकरी समाजाला
सत्ताधारी बनायला वेळ लागणार नाही. कारण भारतीय समाजातील अन्य वर्गापेक्षा आंबेडकरी
समाज समूह कल्याणाला अधिक चांगला न्याय देऊ शकतो. फक्त त्यावर आम्ही स्वतःच स्वतःवर
विश्वास निर्माण करून भूमिका घेतल्या पाहिजेत.
फक्त
एक गोष्ट याठिकाणी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. ती ही कि, आंबेडकरी समाजाने राजकीय
भूमिका घेत असतांना भावनिक, श्रद्धाळू न होता तत्कालीन व्यवस्थेचा अभ्यास करून ती व्यवस्था
कुठल्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. याचा सारासार विचार करावा. आधुनिक पिढीची मानसिकता
लक्षात घ्यावी. सामाजिक गतिशीलता आणि वैचारिक प्रगल्भता लक्षात घ्यावी. एकंदरीतच भारतातील
राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व्यवस्थेचा कल लक्षात घेऊन आंबेडकरी विचारांचा अभ्यास
करून व्यावहारिक आंबेडकरवाद (Applied Ambedkarism) समाजव्यवस्थेसमोर ठेवावा. आणि त्यावर
आधारित आंबेडकरी विचारांच्या कार्यक्षेत्रात येणारे आंबेडकरी पक्ष व त्या पक्षाच्या
नेतृत्वाचा अभ्यास करावा. त्या पक्षाची ध्येयधोरणे व नेतृत्व वर्तमानकाळात आणि भविष्यकाळात
आंबेडकरी समाजाला दिशा देऊ शकतात कि नाही ? याचा अभ्यास करावा. फक्त PM / CM किंवा
सत्ता त्या पक्षाच्या हातात येणार कि नाही ? एवढेच पाहू नये. तर तो पक्ष व नेतृत्व
आंबेडकरी विचारांना अभिप्रेत सामाजिक कल्याणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सक्षम
आहे कि नाही ? हे तपासून पाहावे. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित व्यवस्था निर्माण
करण्यास सक्षम आहे कि नाही ? हेही पाहावे लागेल.
इ.
सर्व गोष्टी काटेकोर पाळून जर आंबेडकरी समाजाने राजकीय भूमिका घेतली तर आंबेडकरवाद
भारतीय जनमानसात आणि व्यवस्थेत सत्तेच्या माध्यमातून रुजवायला वेळ लागणार नाही. राजकीय
भूमिकेच्या अभावी खितपत पडलेली आंबेडकरी चळवळ पुनःश्च गतिमान करण्यासाठी आता आपल्या
वर्तमानातील निष्ठा, श्रद्धा, भावनिकता, आपुलकी बाजूला सारून याच आधारावर
खंबीर अशी राजकीय भूमिका घेऊन एक पक्ष, एक नेतृत्व स्वीकाराची भूमिका घ्यावी. त्या
पक्षाभोवती आणि पक्षाच्या नेतृत्वाभोवती आपल्या निष्ठा, श्रद्धा, भावनिकता, आपुलकी
निर्माण करावी लागेल. आता आंबेडकरी समाजाची राजकीय भूमिका ही फक्त एक पक्ष, एक
नेतृत्व मानणारी आणि स्वीकारणारी तयार होणे यातच आंबेडकरी राजकारणाचे भवितव्य आहे.
ôôôôôôô
डॉ. संदीप नंदेश्वर,
नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५