Saturday, 18 February 2012

लोकशाही विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थी


लोकशाही विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थी
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

व्यवस्थेच्या परिघातून जातांना प्रत्येकालाच अग्निदिव्याचा सामना करावा लागतो. यश किंवा अपयश याशिवाय दुसरे कुठलेही निकाल त्यातून मिळत नाही. भारतीय व्यवस्थेच्या संदर्भाने बोलायचे म्हटले तर मात्र यशापयशाच्या पातळ्या विरघडून पडतात. कारण एकीकडे व्यवस्था यशस्वी ठरली असा जागतिक अनुमान लावला जातो तर दुसरीकडे स्वकियांकडून व्यवस्थाच कोलमडली आहे अशी आगडोंब ठोकली जात आहे. प्रश्न काहीही असो उत्तर एकाच आणि अनेक उत्तरांचा एकाच प्रश्न अशी विचित्र परिस्थिती आज देशांतर्गत हालचालींवरून दिसून येत आहे. संविधानाच्या रूपाने देशांतर्गत व्यवस्थेला नावारूपास आलेला अभ्यासक्रम बहाल करण्यात आला असला तरीही भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यापिठातून कल्याणकारी लोकशाहीचा अभ्यासक्रम चालविला जात नाही हि खरी या देशाची शोकांतिका आहे.
                                                                               
माणूस मोठा व्हावा. माणसांचे कल्याण व्हावे. माणूस म्हणून माणसांची ओळख निर्माण व्हावी. प्रत्येकाला न्याय मिळावा. प्रत्येकाचा सन्मान व्हावा. संधी पासून कुणीही अलिप्त राहू नये. या ध्येय आणि उद्धीष्टांना अनुसरून उभी झालेली भारतीय लोकशाही या विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थ्यांनी मोडीत काढली आहे. व्यवस्थेचे यशापयश हे ती व्यवस्था चालविण-यांवर अवलंबून असते. व्यवस्थेवर नाही. हे साधे सोपे सूत्र अवगत असतांनाही आम्ही वारंवार लोकशाही विश्वविद्यालयाच्या कल्याणकारी अभ्यासक्रमात अनुतीर्ण का होत आहोत ? याचा शोध आता प्रत्येकाने घ्यायचा आहे.

भारतीय लोकशाही ख-या अर्थाने एक विश्वविद्यालय आहे. परंतु हे विश्वविद्यालय ज्यांच्या माध्यमातून चालविले जाते ते कर्मचारीरूपी भ्रष्टाचारी वर्ग आणि निर्णय निर्धारण प्रक्रियेत सहभागी असणारे उमेदवाररुपी राजकारणाचे ठेकेदार आणि या ठेकेदारांना निविदा काढून निवडून देणारे निवड समितीरुपी भारतीय नागरिक हे कुठल्या आधारावर निवड करत आहेत. याचा गोषवारा घेणे आवश्यक ठरले आहे. जातीचा निकस हा तर यांच्या विषारी रक्ताचाच नमुना आहे. एडस सारखा महाभयंकर विषारी रोग जरी यांच्या रक्तात असला तरी उमेदवार हा जातीचा आहे म्हणून त्याला पहिली पसंती दिली जाईल. इतकी कुबुद्धी भारतीय नागरिकांमध्ये जीवाणू पसरावे तशी यांच्या रक्तातून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यालयात फक्त काही नवे वगळली तर ९९ % विद्यार्थी अनुतीर्णच झालेली आहेत. इथे पास होण्यासाठी वशिला दिला जातो. जात आणि धर्म हा पहिला हप्ता असतो पण ऐन निवडीच्या दिवशी खोके पोहचविले जातात. खोके देणारा देतो घेणारा घेतो. मग खोके देणारा पुढील ५ वर्ष खोके जमा करतो आणि घेणारा गप्प बसतो. इथे शिक्षण, योग्यता, कार्यक्षमता कशाचाच निकष लागत नाही. त्यामुळे अडाणी विद्यार्थी कल्याणकारी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत प्रवेश करतात आणि होत्याचे नव्हते करून टाकतात.

भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यालयात आजपर्यंत प्रत्येकच (अपवाद वगळून) अनुतीर्ण होत आला आहे. असे का होते ? संविधानाच्या रूपातील अभ्यासक्रम पेलविला जात नाही की तो अभ्यासक्रम समजून घेऊन अग्निपरीक्षा देण्याची कुवत आमच्या उमेदवार विद्यार्थ्यांमध्ये नाही. जातीच्या आणि खोक्याच्या निकषाने यांनी यांची कुवतच घालवून टाकली आहे. पण त्यासोबतच मताच्या बीजगणितात आम्ही आमचे सर्व विषय गमावून बसलेलो आहोत. मतांच्या बीजगणितापेक्षा कल्याणाचे भूगोल, संधीचे समाजशास्त्र, समानतेचे भाषाशास्त्र आणि विकासाचा इतिहास आम्ही जास्त लक्षात घेणे गरजेचे होते. परंतु या विषयांकडे इथल्या नागरिकांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे आमचे उमेदवाररुपी विद्यार्थी या विषयापासून वंचितच राहिले आणि मतांच्या बीजगणितात सरस ठरले. त्यामुळे महत्वाचे विषय मागे पडत जाऊन त्यात संपूर्ण समाजच भरडत गेला.

राजकीय पक्षाचे वारूळ आज इतके फोफावत चालले आहे की त्यामुळे लोकशाहीचे शिक्षण घेतले नाही तरी चालेल, संविधानाचे अभ्यासक्रम पूर्ण केले नाही तरी चालेल, मात्र पैसा, जात आणि धर्म या तीन पदव्या ज्यांच्या जवळ आहेत तोच खरा लोकशाही विश्वविद्यालयाचा उमेदवार अशी जणू परंपराच आम्ही निर्माण करून टाकली आहे. भारतीय सामाजिक परिस्थिती आणि एकंदर सामाजिक वातावरण लक्षात घेतले तर ही परंपरा कितपत योग्य आहे ? याचा शोध आणि बोध घेतला जाऊ शकतो. राजकीय पक्षांचे हे बुजगावणे या व्यवस्थेला गिळंकृत करतील अशी पुसटशी कल्पनासुद्धा संविधानकारांनी केली नसावी. स्वतंत्र, स्वयंभू, सर्वसंपन्न, सर्वमान्य, सर्वश्रुत, सार्वकालिक संविधानाची मांडणी करतांना जगातील लोकशाही व्यवस्थांचे हे नंदनवन व्हावे अशी स्वप्ने संविधानकरांनी पाहीली होती. परंतु लोकशाही व्यवस्थेचे हे विश्वविद्यालय अनुतीर्णांचे कारखाने आम्ही कसे बनविले ? याचा विचार करण्याची गरज आता भारतीय नागरिकांवर येऊन पडलेली आहे.

भारतीय लोकशाही विश्वविद्यालयाचे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी जशी इथल्या कर्मचा-यांची आणि सत्ताधा-यांची होती तशीच हे कर्मचारी आणि सत्ताधा-यांची निवड करणा-या इथल्या जनतेची सुद्धा होती. कारण आम्हीच त्यांची निवड केली होती. फक्त या अनाडी आणि अनुतीर्ण सत्ताधा-यांना दोष देऊन चालणार नाही तर अपयशाची नैतिक जबाबदारी ही आम्हाला सुद्धा घ्यावी लागणार आहे. "दाताने ओठ चावला गेला तर दोष कुणाला द्यायचा "? तो दोष आमचा आहे. तो दोष आमच्यात नसलेल्या कुवतीचा आहे. तो दोष आम्ही केलेल्या कृतीचा आहे. तो दोष आमच्यामधल्या अज्ञानाचा आहे. आमच्यामध्ये निवड क्षमता नाही याचा तो दोष आहे. अन्यथा या विश्वविद्यालयातील उमेदवाररुपी प्रत्येकच विद्यार्थी जगाचा आदर्श बनला असता. मागील 60-70 वर्षात काय मिळविले ? आणि काय गमाविले ? याचा मागोवा घेण्यात व्यस्त राहून भविष्याला ताटकळत उभे ठेवण्यात वर्तमानासोबत भविष्यालाही आम्ही संपविणार आहोत. आता गरज आहे की आम्ही आमचे उमेदवार कुठल्या प्रक्रियेद्वारे निवडतो ? कुठल्या निकषावर आम्ही त्यांची निवड करतो ? भारतीय नागरिक म्हणून भारतीय लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवार निवड समितीचा सदस्य अशी भूमिका बजावतांना आम्ही कुठली भूमिका घेता आणि कुठले निर्णय घेतो त्यावर आपल्या लोकशाही विश्वविद्यालयाचे भविष्य निर्धारित होणार आहे.

भारतीय लोकशाही विश्वविद्यालयात प्रवेश करून राष्ट्रपती, पंतप्रधान पदाची स्वप्ने बघणारे हजारो लाखो विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात. काही उत्तीर्ण होतात तर काही अनुतीर्ण परंतु नैतिक सत्तेच्या परिपाठात सारेच नापास ! कारण निवडीच्या कसोट्या पूर्ण करणारा कधी आम्ही निवडला नाही आणि कुठल्याच कसोटीत न बसणारा  आम्ही कधी निवडीपासून दूर ठेवला नाही. त्यामुळे कुवत असणारा कमकुवत तर झालाच पण त्यासोबत कुवत नसणा-याने आम्हालाही कमकुवत बनवून टाकले आहे. ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. आमच्या निवडीचे निर्णय आम्हालाच बदलावे लागणार आहे. "Power corrupt man but absolute power corrupt system" हे आम्हाला चांगल्याने अवगत आहे. त्यामुळेच आम्ही  बंदराच्या हातात कोलीत देऊन आम्ही स्वतःच्या पार्श्वभागावर आग लावून घेतली आहे. म्हणून जळतो कोण ? आणि जळतो कोण ? हे सांगण्याचे धाडसही आमच्यात राहिलेले नाही. त्यापेक्षा Resposibility makes the Acountability and Acountability makes the society याला आम्ही का महत्व देत नाही. आमचे विद्यार्थी हे उत्तरदायी का नाहीत ? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
 
आज दिवसागणिक भारतीय लोकशाही विश्वविद्यालयाचे वर्गरूपी राजकीय पक्ष निर्माण होत आहेत. बंदरांची पिलावळ रानमेवा सोडून शहरी सुखामेवा खाण्यासाठी इकडून तिकडे वारंवार कोलांडउड्या मारीत आहेत. सत्ता माणसाला भ्रष्ट करते परंतु निरंकुश सत्ता व्यवस्थेला भ्रष्ट करते. आम्ही काहींच्या हातात अशीच निरंकुश सत्ता सोपविल्याने संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट बनली. राजकीय शहाणपण आणि राजकीय समज यांच्या अभावाने भारतीय समाज पुरता पोखरला गेला आहे. भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही आणि त्यासाठी करावे लागणारे राजकारण यांची सांगड घालतांना कुठेतरी भारतीय समाज अयशस्वी ठरत आहे. समाजशील राजकारण आणि सत्ताकेंद्री, सत्ताप्रभावी राजकारण यांची योग्य सांगड आणि मांडणी करण्यात सध्याच्या संविधानाच्या अभ्यासकापासून तर राजकारणाच्या सारीपाटाचे  मोहरे चालविणा-या राजकारण्यांपर्यंत सारेच अनुतीर्ण झाले आहेत.

फक्त सत्तावादी राजकारण या समीकरणातून बाहेर पडून सहभागीत्वाचे राजकारण, समाजशील राजकारणाची संकल्पना तळागाळातल्या समाजापर्यंत, माणसांपर्यंत कशी रुजविता येईल याच विचा अजूनही समाजासमोर मांडला जात नाही. तो मांडला गेला पाहिजे. संविधानाने मतदानाचा हक्क दिला म्हणून तो बजावायचा किंवा सत्तेच्या मोहमालेत कुणाला तरी सारथी करून त्या बळावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे ही राजकीय गलथानपणाची मांडणी दूर सारून निवडणुका व त्याचे राजकारण याकडे बघण्याची दृष्टी जोपर्यंत भारतीय माणसाला लागत नाही तोपर्यंत भारतीय लोकशाहीचे हे विश्वविद्यालय आपल्या अंतिम उद्दिष्ठापर्यंत पोहचू शकणार नाही.  भारतीय नागरिक म्हणून आपले हक्क बजावतांना आम्ही कुठल्या आधारावर आपला प्रतिनिधी निवडतो हे सर्वश्रुत आहे. या सर्वश्रुत प्रक्रियेला जोपर्यंत आम्ही बदलणार नाही तोपर्यंत आमच्या लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवार (विद्यार्थी) उत्तीर्ण होण्याच्या सीमारेषेपर्यंत पोहचू शकणार नाही. निवडून येणे म्हणजे उत्तीर्ण होणे. किंवा सत्तेवर येणे म्हणजे सीमारेषा ओलांडणे होत नाही. म्हणून वेळ आपली आहे. वेळ आपल्याच हातात आहे. आणि उद्याचा काळही आपल्याच हातात राहणार आहे. निर्भर आहे की आपण वर्तमानात काय निर्णय घेणार आहोत आणि भविष्याचे मार्ग कसे निश्चित करणार आहोत. लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवारांचे (विद्यार्थ्यांचे) भवितव्य त्यावरच निर्भर राहणार आहे.
 
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१
 






Thursday, 16 February 2012

तू आलीस तेव्हा...............

तू आलीस तेव्हा...............

सूर्य मावळतांना तू आलीस तेव्हा
परिक्रमा थांबून दिशा बदलून गेल्या
मावळतीचा सूर्य अचानक उगवायला निघाला
चटके देणारी उन्ह कोवळी वाटायला लागली
तू आलीस तेव्हा...............

पक्षांची किलबिल क्षणात शांत झाली
कोंबड्यांची बांग गाव जागवू लागली
गावातली हलचल रस्त्यावर येऊ लागली
जणू तुझ्या स्वागतासाठी गावाची कूस भरू लागली
तू आलीस तेव्हा...............

गायीचे वासरू ममतेसाठी पळू लागले
तुला पाहून गायीचा पान्हाही दाटू लागला
गावाच्या शिवारावर नगारा वाजू लागला
मुक्काम पोस्ट आता हेच म्हणू लागला
तू आलीस तेव्हा...............
----डॉ. संदीप 

Sunday, 12 February 2012

रिपब्लिक नावाचा राजकीय बोधिवृक्ष…


रिपब्लिक नावाचा राजकीय बोधिवृक्ष…
---डॉ. संदीप नंदेश्वर.

अविचाराने विचार संपतात पण विचाराने विचार प्रगल्भ होतात. वैचारिक आंदोलनाच्या नावाने अविचाराने काही संस्था संघटनांनी अन्य (ओबीसी) समाजापर्यंत विचार पोहविणे गरजेचे आहे असे सांगून विचारात संभ्रम निर्माण केला. आणि आजही काही संस्था संघटना अश्याच प्रकारची बतावणी करून अविचाराने विचार संपविण्याच्या प्रयत्नात आहे. काहींनी तर स्वतःला विकून आपली दुकाने(राजकीय पक्ष) मांडली. काहींची दुकाने चालली आणि काहींची बंद पडली. तर काहींना ग्राहक भेटत नाही अशी अवस्था निर्माण झाली. ज्यांची दुकाने (राजकीय पक्ष) चालली त्यांनी तर स्वतःला विचारांचा कारखानाच बनवून टाकला. ग्राहकांची वर्गवारी करून त्यांना खुश करण्यासाठी विचारांचे वेगवेगळे विकावू साहित्य आणि विचारांचे जन्मदाते निर्माण केले. असे म्हणा कि त्यांचे नामकरण यांनीच केले. आणि ज्यांची दुकाने (राजकीय पक्ष) चालली नाही त्यांनी आपल्या जुन्याच वस्तू (एकच विचार) वेगवेगळ्या बाजारात नेऊन भाव वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही प्रकारची दुकाने आणि दुकानदार विचारांना अपेक्षित कृती कार्यक्रम देऊ न शकल्याने सामाजिक आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेत अयशस्वी ठरलेत.

ज्यांची दुकाने (राजकीय पक्ष) चालली त्यांनी तर ज्या विचारांवर आपली दुकान थाटली आहे अशी बतावणी केली होती ते विचार बाजूला सारून सत्तेच्या सारीपाटात नवनव्या वस्तू वाटाव्या तसे नवनव्या विचारांचा धंदा करू लागले. हे विचार मांडणारे (पोखरून काढलेले) तर यांच्यासाठी भांडवलच बनले. निदान ज्यांचे दुकान चालले नाही त्यांनी तरी "जुने ते सोने" म्हणून एकाच विचारांना धरून राहिले. जरी त्यांचे बाजार बदलत राहिले असले तरी. म्हणून त्यांचे धन्यवादच मानावे लागतील. पण धन्यवाद मानून त्यांना मोकळे सोडता येणार नाही तर आता त्यांच्या अंगावरची गेंड्याची साल सोलून आपल्या विचारांना साजेशी दुकान सजवून, थाटामाटाने बदललेल्या बजारात उतरावे लागणार आहे.
  
विचारांच्या शुद्ध कृतीकार्यक्रमातून विचारांना जे बळ प्राप्त होते ते बळ ज्यांनी वैचारिक आंदोलने चालवली आणि नंतर त्याचीच दुकाने बनविली त्यांच्या वैचारिक आंदोलनाला कधीच आले नाही. कुठलेही विचार तोपर्यंतच दीर्घायुषी ठरत नाही जोपर्यंत त्या विचारांना साजेशी आणि पूरक वैचारिक कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात येत नाही. मात्र यांच्या अविचारी वैचारिक आंदोलनात वेळ वाया गेला. शक्ती वाया गेली. पैसा वाया गेला. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ३ ते ४ पिढ्या वाया गेल्या. चक्क बरबाद झाल्या. तरीही आश्चर्य हे आहे कि आजच्या आधुनिक जगातल्या काही पिढ्यासुद्धा त्याच अविचारी वैचारिक आंदोलनात बरबाद होऊ पाहत आहेत. आणखी किती बरबाद व्हायचे आणि किती बरबाद करायचे ? हा प्रश्न तुमच्या आमच्यावर येऊन पडला आहे. निव्वळ विचार पेरून परिवर्तन होईल कि त्यासाठी काही कृती कार्यक्रमाची आखणी करावी लागेल ? निव्वळ विचार पेरून, विचार सांगून भूक भागेल का ? विचार जगण्याचा आधार जरी असला तरी सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या विचारांच्या आधारावर जीवनाच्या दैनंदिन गरजा भागविणारी साधने उपलब्ध झाली पाहिजे. निदान सर्वसामान्य माणसांपर्यंत ती साधने पोहचविण्याची यंत्रणा तरी उभी झाली पाहिजे. आणि त्यासाठीच कृती कार्यक्रमाची आखणी होणे गरजेचे आहे.

आधुनिक पिढी विचारांच्या कृती कार्यक्रमावर कितपत अंमलबजावणी करते त्यावरच आंबेडकरी विचाराची घरेलू बाजारपेठ निर्भर राहणार आहे. कारण परदेशी बाजारपेठेत आंबेडकरी विचार अनमोल आहेत. हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. अमेरिका, इंग्लंड सारख्या विकसित देश्यात आंबेडकरी विचार विद्यापीठीय स्तरावरून शिकले आणि शिकविले जातात. यापेक्षा दुसरा पुरावा त्यासाठी द्यावा लागू नये. आम्हाला आमची विस्कटलेली घरेलू बाजारपेठ सावरावी लागणार आहे. थाटलेली आपापली दुकाने बंद पाडून त्याऐवजी शॉपिंग माल उभे करावे लागणार आहे. जिथे आंबेडकरी विचारांना, आंबेडकरी विचारांच्या कारखान्यात तयार होणारे वेगवेगळे प्रोडक्ट अगदी सहजरीत्या ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता येईल. जग बदललेले आहे. पिढी बदलली आहे. यंत्रणा बदलली आहे. प्रक्रिया बदलली आहे. वेळ बदलला. काळ बदलला. मात्र परिस्थिती आणि गरज जशीच्या तशीच आहे. याच परिस्थितीच्या आणि गरजेच्या पोटी आंबेडकरी विचारांचा ग्राहक प्रोडक्ट मिळविण्यासाठी भटकत आहे. कधी या दुकानात तर कधी त्या दुकानात.

इथे फक्त ग्राहकच भटकत नाही तर आंबेडकरी विचारांची दुकान चालविणारेसुद्धा भटकत आहेत. कधी या बाजारपेठेत तर कधी त्या बाजारपेठेत. त्यांची ही पायपीट मुलभूत आहे. त्याला ती करावीच लागणार आहे. कारण आंबेडकरी विचारांच्या प्रोडक्ट शिवाय तो जगूच शकत नाही. याला त्याची लाचारी म्हणायची ? की ती त्याची निकड ? त्यापेक्षा आंबेडकरी विचारांचे शॉपिंग माल का उभारले जात नाही.

अगदी अवकळा आलेल्या दुकानासारखी परिस्थिती झालेली आहे. अशी टीका मी करणार नाही आणि तशी टीका करण्याचा अधिकार तुम्हालाही नाही. इतकेच काय कुणालाच नाही. दुकान कसे चालवायचे, ते कसे सुशोभित करायचे हा व्यक्तिगत मुद्दा असू शकतो. परंतु आंबेडकरी विचार जिथेही आहेत तिथे मात्र परिवर्तन आहे. तिथे विकास आहे. तिथे जीवनाच्या संघर्षावर मात करण्याची ताकत आहे. नव्या उमेदीने अपयशाला पायदळी तुडवून नव्या यशाच्या शिखरावर चढण्याची जिद्द आहे. नवी वाट आहे. नवी पहाट आहे. नवा सूर्य आहे. नवा प्रकाश आहे. जीवनाचा यशस्वी मार्ग म्हणजे आंबेडकरी विचार आहे. इथे फार निराश होण्यासारखी परिस्थिती नाही. उमेदीने थकून जाऊन पायात बेड्या अडकविण्याची वेळ नाही. हात बांधून यशाकडे पाठ फिरविण्याची वेळ नाही. वेळ आहे ती पायात जखडलेल्या बेड्या तोडून टाकण्याची. वेळ आहे हाताला सैल करून यशाला कवटाळण्याची. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीला आपल्या बाजूने वाकविण्याची. अंगातल्या बळापेक्षा तुमच्या शिर्षभागावरील मेंदूत साठवून ठेवलेल्या आंबेडकरी विचारांना कृतीत उतरविण्याची. सर्वसामान्य, दीनदुबळ्या, गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी एक विकासवेल फुलविण्याची. पालन पोषण करून ठरविलेल्या आराखड्यात उपलब्ध साधने आणि संसाधनाचा वापर करून मानवी कल्याणाचा बगीचा फुलविण्याची.

आंबेडकरी विचार इथल्या बाजारपेठेच्या नेहमीच शिर्षस्थानावर राहिलेले आहेत. आंबेडकरी विचारांचे भांडवलदार, दलाल आणि व्यापारीसुद्धा नेहमीच वरचढ ठरले आहेत. कारण या विचारांचे ग्राहक (गरजू , उपभोक्ते, समाज) इतके आहेत की कितीही दुकाने उघडली (राजकीय पक्ष), कितीही व्यापारी आले (नेते), कितीही दलाल आले (कार्यकर्ते), कितीही भांडवलदार आले (राष्ट्रीय नेते), कितीही बाजारपेठा (व्यवस्था) नव्याने उघडल्या तरी आंबेडकरी विचारांची मागणी कमी होणार नाही. आणि पुरवठाही कमी होणार नाही. उलट जसाजसा काळ बदलत जाईल, वेळ बदलत जाईल, समस्या बदलत जातील तसतशी आंबेडकरी विचारांची मागणीही वाढत जाईल. हेच आंबेडकरी विचारांचे सामर्थ्य आहे. कारण हे विचार बुद्धाच्या मजबूत पायावर (base) उभे आहेत.

भांडवलदार, व्यापारी आणि दलाल यांच्यातल्या स्पर्धेने सर्वसामान्य आंबेडकरी विचारांचा उपभोक्ता हवालदिल झाला आहे. त्यात काहींनी तर कहरच केला आहे. आम्ही सांगतो तेच आंबेडकरी विचार. आम्ही करतो तेच समाजकार्य. आम्ही करतो तीच कल्याणकारी आंदोलने. आणि आम्ही करतो तेच यशस्वी राजकारण. विचार असले काय आणि नसले काय ? त्याचे या लोकांना काहीही देणेघेणे नाही. सत्ता असली की सर्व सोयी सुविधा विकत घेता येतील. माणसांच्या भावनिक व वैचारिक गरजा भागविता येतील. सत्तेने धम्म गतिमान होईल. माफ करा यांच्या डोक्यात धम्म कधीच येत नाही. यांचा धर्म सत्तेशिवाय गतीमानच होत नाही. बरे सत्ता मिळाली तरी ती त्यांना अमर्याद सत्ता हवी आहे. थोड्याश्या सत्तेने यांचे भागत नाही. बाजारात मंदी भरल्याशिवाय जसे भाव उतरत नाही. तसेच अवास्तव, अमर्याद सत्ता मिळाल्याशिवाय यांना धर्म आठवतच नाही आणि आठवणार नाही. इतकेच नाही तर आंबेडकरी विचारांच्या आधारावर कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे भरण पोषणाचे  टानिक बुद्धाच्या धम्माला यांना मुळात अन्गीकारायचे नाही. यांना बुद्ध आणि बाबासाहेबांच्या नावाने आपली दुकानदारी चालवायची आहे. भांडवल तयार करायचे आहे. बाजार्पेठेचेसुद्धा काही नियम असतात. सिद्धांत असतात. तत्व असतात. परंतु यांच्या राजकारणाचे कुठलेही तत्व नाही. सिद्धांत नाही. आणि नियमही नाही. कारण यांना राजकारणाच्या नावाने सत्तेसाठी सर्वसामान्न्यांना धारेवर धरून विचारांसाठी ताटकळत ठेवायचे आहे.

आंबेडकरी विचार जे देश्याच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रभागी आहेत. जे विचार अंगीकारण्यासाठी व्यवस्था आतुरलेल्या आहेत. आधुनिक जगाची मांडणी करतांना ज्यांना आंबेडकरी विचारांना किनारा (overtake) करता येत नाही. नवनिर्मितीच्या, मानवी कल्याणाच्या योजना आंबेडकरी परीदृश्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्याच आंबेडकरी विचारांची स्वगृही होणारी घुसमट आणि स्वगृही आंबेडकरी विचारांची दिवसेंदिवस घसरत जाणारी किंमत आधुनिक पिढीला कशी पाहवली जात आहे ? हाच माझ्या पिढीचा प्रश्न आहे ? आंबेडकरी विचारांचा आम्ही आणखी किती बाजार करणार आहोत ? आणखी किती बाजार मांडणार आहोत ? विचारांसाठी आंबेडकरी माणसांना आणखी किती पायपीट करायला लावणार आहोत ? एकच आंबेडकरी विचार आम्ही आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भावात आणखी किती विक्रीला मांडणार आहोत ? गारद झालेल्या पिढीकडून या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा नाही परंतु माझ्या पिढीच्या, यापुढे आंबेडकरी विचार ज्यांच्या खांद्यावर विसावणार आहे. त्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागणार आहे.

इथे चिंता आंबेडकरी विचारांना विक्रीस काढणा-या भांडवलदार, व्यापारी, दलाल यांची नाही. चिंता आहे ती आंबेडकरी विचार प्रमाण मानणा-या माणसांची, आंबेडकरी राजकारणाच्या वाताहतीत हवालदिल झालेल्या ख-या भारतीय नागरिकांची, रिपब्लिक नावाच्या बिग बाजाराची, आणि रिपब्लिकन नावाच्या ग्राहकाची. आम्ही आजही आमची एकच दुकान (शॉपिंग माल) रिपब्लिक नावाने का बनवू शकत नाही ? रिपब्लिकन म्हणून खरे भारतीय असण्याचा स्वाभिमान जागृत करून आंबेडकरी विचारांच्या सर्व स्वगृही बाजारपेठा बंद पडण्यासाठी ताळेबंद, हरताळ का पुकारला जात नाही ? दर ५ वर्षांनी ग्रामपंचायत पासून तर दिल्लीच्या तख्तासाठी आठवडी बाजार भरतो तेव्हा रिपब्लिक नावाचा ग्राहक वेगवेगळ्या दुकानात (राजकीय पक्षात) आंबेडकरी विचार मिळेल, न्यायाचा, कल्याणाचा मार्ग मिळेल. या आशेने ओढला जात असतो. त्या रिपब्लिकन ग्राहकाने आता कुठल्याही एका रिपब्लिकन दुकानाकडे (राजकीय पक्षाकडे) वळण्याची गरज आहे.

एकच व्यापारी, एकच वस्तू, एकच सिद्धांत आणि एकच विचार जेव्हा बाजारपेठेत असतो तेव्हा ग्राहक कुठे इतरत्र भटकत नाही. स्पर्धेचा तिथे अभाव असतो. या बाजार नियमाप्रमाणे आंबेडकरी विचार आम्ही का पुरवीत नाही. इथे कुठल्याही अनुषंगाने वस्तूच्या बाजारपेठेचा नियम लावला जाणार नाही व तसा प्रयत्न मी करणार नाही आणि तुम्हीही करू नका ! आंबेडकरी विचारांच्या कल्याणकारी नितीनियमासाठी आम्ही आता एकत्र येणे काळाची गरज आहे. रिपब्लिक नावाचा राजकीय बोधिवृक्ष आम्ही फुलाविणार आहोत की नाही ? या प्रश्नाच्या उत्तरावरच उद्याच्या बाजारपेठेतील आंबेडकरी विचारांची मागणी, पुरवठा अवलंबून  राहणार आहे. माझ्या पिढीच्या, आधुनिक जगाशी नाळ ठेऊन जागतिक स्पर्धेचा सामना करणा-यांच्या आंबेडकरी कृती कार्यक्रमावर उद्याचे भवितव्य ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका आणि काही राज्याच्या विधिमंडळाच्या बाजारपेठा तुमची खरेदी विक्री करायला सज्ज झालेल्या आहेत. तुम्ही विकणार आहात की स्वाभिमानाने रिपब्लिक बोधीवृक्ष्याच्या छत्रछायेखाली विसावणार आहात यावर आंबेडकरी माणसांचा उद्याचा दर ठरणार आहे. आता  विचार तुम्हाला करायचा आहे.
 
---डॉ. संदीप नंदेश्वर.

Tuesday, 7 February 2012

भारतीय मिडिया का निषेध ! निषेध ! निषेध !

भारतीय मिडिया का सोशल नेट्वर्किंग मनुवाद ?

भारतीय मिडिया का निषेध ! निषेध ! निषेध !

रोज भारतीय मिडिया द्वारा फेसबुक पर चलनेवाली गतीविधियो का ब्योरा लिया जाता है !
पर युवा के नाम से, इस पीढ़ी के नाम से सिर्फ गैर-बुद्धिस्ट और गैर-आंबेडकरी ग्रुप को और लोगो को ध्यान में लिया जाता है !
जबकि सच्चाई यह है की फेसबुक पर सबसे ज्यादा आंबेडकरी और बुद्धिस्ट लोग इस देश में चलनेवाली हर गतिविधियों पर अपनी प्रतिक्रिया देते रहते है !
ये लोग इस भारतीय मिडिया के नजर में क्यों नहीं आते ?
क्या भारतीय मिडिया यहाँ भी वर्णवाद चलता है ?
क्या ऐसे मिडिया को लोकतंत्र का मिडिया कह सकते है ?
ऐसे मिडिया को देश से ख़त्म करने के लिए हमें आगे बढ़ना
होगा !
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

Monday, 6 February 2012

रमाई


माता रमाईच्या त्यागाने उजळल्या दाही दिशा !!
बाबासाहेबांच्या रूपाने पालटल्या दुःखितांच्या दशा !!

माता रमाईच्या जन्मदिनी त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन !!!



रमाई

या देशाची आई
या मातीची कमाई
तुमच्या आमच्या सर्वांची पुण्याई
माझी माता रमाई...माझी माता रमाई

बाबांची सावली माता रमाई
शेणा-मातीच्या कमाईने
बाबासाहेबांची विद्वत्ता पाहिली
दुःख सोसून जगली,
कष्ट करूनही कधी ना थकली
अशी माझी माता रमाई...माझी माता रमाई

भुकेल्या पोटी लेकरांची भूक बनली
सुखलेल्या ओठांची तहान बनली
फाटक्या कपड्यात अशी थाटात जगली
झोपलेल्या समाजाला जागविणाऱ्या
बाबासाहेबांची रामू बनली
अशी माझी माता रमाई...माझी माता रमाई
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर 

Monday, 9 January 2012

संघटनेची गरज काय ? : एक ऐतिहासिक अवलोकन


संघटनेची गरज काय ? : एक ऐतिहासिक अवलोकन
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१


संघटना मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रत्येकच माणूस त्याच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या संघटनेशी जुडलेला असतो. पण संघटन हे कृतीशील जीवनाचे द्योतक म्हणूनही ओळखले जाते. इतकेच काय तर मानवी जीवन प्रवाहित करण्याचे ते एक साधन आहे. मानवी इतिहास सुद्धा संघटनेच्या नैतिक आधारावरच लिहिला गेला आहे. मानवी उत्कर्षाच्या काळात संघटन हेच मानवी विकासाला प्रेरणा देणारे संजीवन ठरले होते. मानवी विकासाचा, उत्कर्षाचा, संघर्षाचा, यशाचा, धेय्यप्राप्तीचा, विजयाचा इतिहास संघटनेतूनच लिहिला गेला आहे. हे नाकारता येत नाही. पण हा फक्त एक इतिहास आहे हे सुद्धा विसरता येत नाही. तोही अश्या काळातला इतिहास जेव्हा कुठल्याही विचारांची, तत्वज्ञानाची, संकल्पनेची, विचारधारेंची, व्यवस्थेची नीटशी चौकटही बसविल्या गेली नव्हती. भावनिक गरजा आणि मानवी संघटीत जीवनाची गरज यातून इतिहासातील अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. समाज, संस्कृती, व्यवस्था अश्या कुठल्याही संकल्पनेच्या अभावी अनेक संघटना तयार झाल्या. पुढे याच संघटनांनी समाज, धर्म, जात, विचार, तत्वज्ञान, असे नाव धारण केले. त्यातूनच जातींचे विभाजन, धर्माचे विभाजन, विचारांचे विभाजन, तत्वज्ञानाचे विभाजन हे सुद्धा होत गेल्याचा इतिहास आहे. प्रत्येक धर्माच्या तत्वज्ञानात्मक संघटनेतून फुटीरवादी बाहेर पडून त्याच संघटनेचा दुसरा प्रवाह सुरु झाला हे निर्विवाद सत्य कुणालाही नाकारता येत नाही. त्याचीच पाळेमुळे आजतागायत आपणही पालन पोषण करीत आहोत. अजूनही ती मुळे आपण जोपासत आहोतच. त्यामुळेच फुटीरवादी रोपटे दर दिवशी नव्या संघटनेच्या नावाने तनासारखे मानवी शोषणाच्या शिवारावर उगवत चाललेले आहे.

प्राचीन काळात धार्मिक फुटीरतावादाने प्रत्येक धर्माचे दोन पंथ तयार केले. शिया-सुन्नी, हीनयान-महायान, दिगांबर-श्वेतांबर, शैव, वैष्णव इ. अनेक पंथ संघटनेची नावे घेता येतील. तेही एक संघटनच होते. संघटन म्हणूनच उदयास आले आणि आजही एकाच धार्मिक अधिष्ठानावर अधिष्ठित वेगळे संघटन यापेक्षा वेगळे स्वरूप त्याला कदापीही नाही. प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या मधल्या कालखंडात हा सर्व ससेमिरा राबविला गेला. आणि आजही तो तसाच पाळला जातो. मध्ययुगीन काळात विचार आणि तत्वज्ञानाचे मोठे प्राबल्य निर्माण झाले. परंतु याही आधी व्यावसायिक प्रेरणेने जगाला घातलेली भुरळ आणि त्यातून विचाररुपी आर्थिक धोरणावर आधारित संघटन भांडवलदार आणि मजूर, पुंजीवादी आणि श्रमिक, व्यावसायिक आणि ग्राहक, विक्रेता आणि खरेदीदार अश्या नावाने समोर येऊ लागले. याच काळात व्यावसायिक वसाहतवादाने क्रांतिकारी रूप धारण केल्याने स्वःसंरक्षणाच्या नावाने अतिरेकी संघटनाही विचारांचे नवे दालन घेऊन जगाच्या पटलावर उभ्या राहिल्या. परंतु याही संघटनांमध्ये कधीही कुठल्याही आधारावर एकवाक्यता दिसून आली नाही. गाजर गवतासारखे याही संघटना उदयास आल्या आणि काळाच्या ओघात लुप्त झाल्या. मात्र माणूस नावाचा भावनाशील माणूस इथेही कधीच संघटीत राहिला नाही. तो सतत विभाजत राहिला. तुटत राहिला. विखुरत राहिला. फक्त आणि फक्त संघटनेच्या नावाने.

मध्ययुगीन कालखंडाच्या शेवटी आणि आधुनिक कालखंडाच्या सुरवातीलाच जग नावाचे एक विशालकाय मानवी संघटन दृष्टीक्षेपात येऊ लागले. जे खंडात विभागले होते. संस्कृतीत विभागले होते. परिस्थितीने विभक्त होते. माणूस हा एकच समान धागा फक्त शिल्लक होता. पण इथेही व्यवसाय आणि वसाहतवाद जगाला २ भागात विभागून गेला. एक भाग पुंजीवादाकडे (भांडवलदार) तर दुसरा भाग श्रमिक (मजूर) म्हणून ओळखला गेला. फासिझम, नाझीझम नावाचे वैचारिक उग्रवाद त्यातूनच जगाने अनुभवले. मुसोलिनी, हिटलर नावाचे उग्रवादाकडून मानवी कल्याणाकडे जाणारे फासिझम, नाझीझम हे सुद्धा संघटनच होते. किती काळ चालले आणि आज त्यांचे अस्तित्व आणि तुकडे किती हे वेगळे सांगण्याची गरज भासू नये. याच धाग्याला पकडून जगाचे २ भागात विभाजन करणारा आणि हेगेल च्या आदर्शावादापासून प्रेरणा घेऊन आलेला मार्क्स हा सुद्धा वैचारिक संघटन घेऊन जगाच्या यशोशिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करू लागला. पुंजीवाद आणि श्रमिक असा भावनिक पण तितकाच व्यवहारिक प्रश्न घेऊन जगाला भन्नावून सोडणारा मार्क्सवाद आज आपल्याच विचाराच्या गलक्यात इतका पिचला गेला आहे की मार्क्सवादाचे  नेमके संघटन कोणते हे ओळखणे दुरापास्त झालेले आहे.

या सर्व विवेचनात तत्कालीन समस्यांच्या पलीकडे कधीच कुठले संघटन गेलेले नाही. इतकेच नाही तर काही संघटनांचा ज्वाला तर अल्पावधीतच संपुष्टात आला. कालबाह्य विचार आणि संघटन झाले असतांना त्यांची धार कमी होणे शक्य होतेच पण त्यासोबतच ते तिथेच संपनेही तितकेच महत्वाचे होते. पण तसे झाले नाही. संघटन आजही आहेत आणि उद्याही राहणार आहेत. लेनिन, स्टालिन, माओ ही परंपरा जर मार्क्सवादाला लाभली नसती तर मार्क्सवाद सुद्धा गर्भावस्थेतच लुप्त झाला असता. मार्क्सवादी विचारप्रणाली व्यावहारिक पातळीवर असल्याने थोडाफार जागतिक प्रभाव पाडण्यात तो यशस्वी ठरला हे म्हणणे जितके धाडसाचे आहे. तितकेच मार्क्सवादाचा विपर्यास झाला असे म्हणणे सोपे जाते. श्रमिक संघटनेच्या नावाखाली झालेली खुद्द श्रमिकांची गळचेपी आणि सोबतच भांडवलदारांवर ओढवलेले संकट यातून मार्क्सवादी संघटनेची झालेली फाटाफूट जगानेच अनुभवलेली आहे. यावरून एक समान धागा मात्र हाच दिसून येतो की कुठेही समाज नावाची एकत्र संघटना प्रदर्शित होतांना किंवा टिकून राहतांना दिसून आली नाही. इतकेच काय वैचारिक पातळीवरील एकताही कधीच दिसून आली नाही. समाज नावाची संघटीत आणि एकत्र संघटना सतत विभाजित करण्याला या धार्मिक अधिष्ठान असलेल्या, वैचारिक अधिष्ठान असलेल्या व व्यावहारिक अधिष्ठान असलेल्या सर्व संघटना जबाबदार ठरल्या आहेत. एवढे म्हणण्याचे धारिष्ट्य मात्र निच्छितच करता येईल. एकत्र-सर्वसमावेशक समाजाची, सामाजिक आंदोलनाची, लढ्याची व्याख्या या संघटनेच्या माध्यमातून कधीही होतांना दिसून आली नाही. ती का केली गेली नाही ? हा आज तुमच्या आणि माझ्यासमोरचा प्रश्न आहे.

२० व्या शतकात कुठेतरी थोडासा दिलासा मिळतो तो असा की, मानवतावादाची जागतिक मुहूर्तमेढ या काळात रोवण्याचा प्रयत्न झाला. मानवी कल्याणाचे वैचारिक वादळ निर्माण झाले. स्थितीस्थापत्य वादाकडून मानवी समाज दूर होऊ लागला. नैतिक आचरण आणि समान न्यायाच्या संकल्पनेने संघटनेची पाळेमुळे ढीसूळ होऊन समाजाचे संघटन आणि न्यायासाठीचा लढा देण्याचा हा काळ ठरला. परंतु याही काळात काहींनी न्यायाच्या लढ्यासाठी काही संघटना निर्माण केल्या. आणि त्या संघटनेच्या छत्रछायेखाली समाजाचे संघटन घडवून आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला. भारतात तर पुनरुत्थानाच्या काळात अश्या अनेक संघटना जन्माला आल्या. स्वातंत्र्यापूर्वी पर्यंत या संघटनांनी समाजावर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण नंतरच्या काळात मात्र या संघटना विस्कळीत झाल्या. समाजाचे संघटन आणि राजकारण या गर्तेत भारतातील अनेक सामाजिक संघटना सापडल्याने अनेकांनी वेगळी वाट धरली आणि हळूहळू भारतात संघटनांचे महापूर येऊ लागले. आज तर गल्लीबोळात संघटना आणि त्यांच्या नेत्यांचे मोठमोठे ब्यानर रस्त्यारस्त्यात झळकतांना दिसून येतात. पण समाजाचे संघटन कधीही यांच्या पाठीशी नसते. कारण संघटनेतील नेतृत्वाच्या कलहाने समाजाचे संघटन कसे विस्कळीत झाले हा इतिहास समाजाला माहित आहे. गल्ली पासून तर दिल्लीपर्यंत आणि पृथ्वीवरील सर्वच देशांमध्ये एका संघटनेतून अनेक संघटना निर्माण झाल्या आहेत. कुठेही सामाजिक संघटन होतांना दिसून आले नाही.

इथे मी संघटनेला बाजूला सारून सामाजिक संघटन (एकत्रीकरण) याला अधिक महत्व देत असतांना अनेक प्रशासनिक अभ्यासक असे म्हणतात की, व्यवहारात संघटनेशिवाय, त्याच्या विशिष्ट नेतृत्वाशिवाय कुठलाही लढा व आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. प्रशासकीयदृष्ट्या त्यांची मते योग्य असली तरी समाजाच्या संघटीतपणा इथे दुर्लक्षित केला जातो आहे. आजपर्यंत संघटना अनेक झाल्या. परंतु समाजाचे संघटन होऊ शकले नाही. हे मी वारंवार या ठिकाणी सांगत आहे. आंबेडकरी चळवळीत बाबासाहेबांच्या नेतृत्वात ज्या संस्था संघटना निर्माण झाल्या. त्यांनी समाजाचे संघटन (एकत्रीकरण) समान कृती कार्यक्रमाच्या आधारे घडवून आणले. परंतु बाबासाहेबांचे नेतृत्व आणि परिस्थिती आणि आजचे नेतृत्व आणि परिस्थिती यात फार मोठी तफावत आहे. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीत संस्था संघटनांचे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. समाज एकत्रित का राहू शकला नाही ? फाटाफूट का झाल्या ? अनेक नेते, अनेक गट, अनेक संस्था, अनेक संघटना का निर्माण झाल्या ? समाजाची संघटीत शक्ती का विभागल्या गेली ? समाजात आपआपसात फुट का पडली ? समान कृती कार्यक्रमात अंतर्गत भेद का निर्माण झाले ? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे. वेगवेगळ्या संघटना आणि त्यांचे नेतृत्व त्याला जबाबदार ठरले. 

आणखी किती दिवस आम्ही या संघटना निर्माण करण्यात आणि त्यांचे अध्यक्षरुपी नेतृत्व  निवडण्यात घालविणार आहोत. समान ध्येयाने, समान उद्धिष्टाने, समान कृतीकार्यक्रमाणे आम्ही कुठलेही संघटन निर्माण न करता समाजाला एकत्र करू शकणार नाही का ? आज आंबेडकरी चळवळीमध्ये सर्वांना भेडसावणा-या समस्या समान आहेत. आंबेडकरी विचार, तत्वज्ञान आणि लढा सर्वांचा समान असतांना उत्स्फूर्तपणे समाज एकत्र येणार नाही का ? जिथे पदाचा कुठलाही संघर्ष राहणार नाही. आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचार हा धागा पकडून आंबेडकरी तरुणांचे, आंबेडकरी समाजाचे एकत्रीकरण होऊ शकणार नाही का ? आंबेडकरी विचारांना मानणारा प्रत्येक माणूस त्यात स्वतःला समाविष्ठ करून घेईल. त्यासाठी समाजासमोर जे काही ध्येय व उद्धिष्ट मांडायचे ते सर्व वैयक्तिक पातळीवरचे नसून समाज पातळीवरचे राहतील. आम्ही अजूनही का त्या इतिहासातील संघटनांचेच वलय ठेवून पुन्हा एकदा समाजाच्या संघटीत शक्तीला कुठल्या तरी संघटनेत विभागू पाहत आहोत ? संघटनेचा हेका तीच माणसे धरतात ज्यांच्यात नेतृत्वाचा स्वार्थ पराकोटीचा असतो. आणि अशी माणसे कधीही समाजाचे वर्तमान आणि भविष्य निर्धारित करू शकत नाही. समाजाने अश्या माणसांपासून सावध राहण्याची गरज आहे. 

कायदा जेव्हा व्यवस्थेच्या मुळाशी असतो तिथे संघटनेला नाही तर समाजाला केंद्रित केले जाते. आज आंबेडकरी समाजाजवळ कायदा आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संस्था-संघटना सुद्धा आहेत. व्यवस्थेचे रूप धारण करू शकणारे वैश्विक विचार आणि तत्वज्ञान सोबत आहे. सर्व असले तरी समाज दुभंगला आहे. तो एकत्रित नाही. संघटीत नाही. त्यामुळे अनेक पातळ्यांवर आंबेडकरवाद्यांची पीछेहाट सुरु झालेली आपण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. समाज संघटीत नसल्याने हे सर्व होत आहे. समाजाकडे त्याचे संघटीत नैतिक पाठबळ नसल्याने व्यवस्थेवर आंबेडकरवाद्यांचा दबाव निर्माण होऊ शकत नाही. आज तर इतकी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की, कुठलेही विधायक कार्य हाती घेतांना समाजाचे नैतिक पाठबळ त्या आंदोलनाला, लढ्याला मिळेल की नाही अशी शंका घेतली जाते. ही नकारात्मक मानसिकता सुद्धा संघटनांच्या फाटाफुटीमुळेच निर्माण झालेली आहे. आज आंबेडकरी चळवळीला निवडणुकीपेक्षा समाजाच्या एकत्रीकरणावर भर देणे गरजेचे झाले आहे. समाज एकसंघ राहिला, संघटीत राहिला तर निश्चितच वास्तवात असलेल्या आणि बाबासाहेबांनी दिलेल्या मुलभूत आंबेडकरी संस्था संघटना मजबूत होतील. आज कुठल्याही संघटनेची गरज नाही तर समाजाच्या एकसंघतेची गरज निर्माण झालेली आहे. आपसातील मतभेद विसरून प्रत्येकाने आंबेडकरी या नात्याने एकत्र येऊन एकसूत्री कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आणि तीच भविष्याच्या निर्मितीची पायाभूत भूमिका ठरेल. 

----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१